Social Welfare
माय भारत- तरुण भारत आणि डिजीटल भारत यांचा संगम
प्रविष्टि तिथि:
05 JUL 2026 11:03 AM
माय भारत- तरुण भारत आणि डिजीटल भारत यांचा संगम
नवी दिल्ली, 5 जुलै 2026
मेरा युवा भारतच्या केंद्रस्थानी युवक
भारतामध्ये जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या आहे, बहुतांश 65% लोकसंख्या 35 वर्षांखालील वयोगटातील आहे. या लोकसंख्याविषयक लाभांशाची प्रचंड क्षमता ओळखून, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत ऑक्टोबर 2023 मध्ये मेरा भारत (मेरा युवा भारत) या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाचे उद्दीष्ट, स्वयंसेवा, कौशल्य विकास, नेतृत्व आणि नागरी सहभाग यांच्या संधी उपलब्ध करून देत राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत तरुणांना केंद्रस्थानी आणणे असे आहे.

माय भारत हे डिजीटल व्यासपीठ, सरकार, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि उद्योगक्षेत्र यांना परस्परांशी जोडून तरुणांचा अर्थपूर्ण सहभाग सुनिश्चित करते. डिजीटल इंडिया या व्यापक उपक्रमाअंतर्गत, भारताच्या बळकट डिजीटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवर आधारित हे व्यासपीठ लाखो तरूण भारतीयांना शिक्षण आणि राष्ट्रनिर्माणाच्या संधीशी सहजपणे जोडते, तसेच देशभरात अधिक सर्वसमावेशकता, सुलभता आणि सहभाग सुनिश्चित करते. या उपक्रमाद्वारे, तरुण नागरिकांना विकसित भारत@2047 या संकल्पपूर्तीसाठी सक्रिय योगदान देण्यासाठी सक्षम केले जाते.
संधींच्या माध्यमातून अमृत पिढीचे सक्षमीकरण
माय भारत हे एक एकात्मिक डिजीटल व्यासपीठ आहे, ज्याच्यामुळे प्रत्यक्ष सहभाग आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा मेळ घातला जातो. या पोर्टलद्वारे खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत:

डिजीटल स्वयंसेवा
जून 2026 पर्यंत, या व्यासपीठाच्या माध्यमातून स्वच्छता, रक्तदान, क्रीडा, आपत्ती प्रतिसाद आणि समाजसेवा या क्षेत्रांत 1.52 लाखांहून अधिक स्वयंसेवेच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
या माध्यमातून, ऑनलाइन नोंदणी, उपस्थिती, जिओ-टॅगिंग, प्रमाणपत्र मिळवणे आणि प्रभावाचा मागोवा घेणे यांद्वारे संपूर्ण डिजीटल स्वयंसेवा व्यवस्थापन उपलब्ध करून दिले जाते.
वर्गखोल्यांच्या पलीकडील अनुभवाधारित शिक्षण
जुलै 2026 पर्यंत या व्यासपीठाच्या माध्यमातून 24900पेक्षा अधिक अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम (ईएलपी) उपलब्ध असून , ते प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षणाला आणि कार्यबलासाठी सज्जता विकसित करण्यास प्रोत्साहन देतात.
या व्यतिरिक्त, सार्वजनिक आणि खाजगी संस्थांमध्ये अंतर्वासिता(इंटर्नशिप), कार्यस्थळी प्रशिक्षणासाठी अॅप्रेंटिसशिप आणि उद्योग क्षेत्रातील अनुभव यांसारख्या संधीचा समावेश आहे.
प्रश्नमंजुषा आणि स्पर्धांच्या माध्यमातून नागरी नेतृत्वाला हे व्यासपीठ प्रोत्साहन देते, ज्यात तरुणांना केंद्रीय अर्थसंकल्पासारखे राष्ट्रीय मुद्दे समजून घेण्यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
नेतृत्व विकास आणि व्यावसायिक कारकीर्दीसाठी साहाय्य
हे व्यासपीठ, विकसित भारत यूथ पार्लमेंट सारख्या उपक्रमांद्वारे नेतृत्व विकासाची संधी उपलब्ध करून देते, त्यामुळे युवकांना राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्याची आणि नेतृत्व कौशल्य विकसित करण्याची संधी मिळते.
एआय-आधारित रिझ्युमे बिल्डर आणि मार्गदर्शन साहाय्य यामुळे तरुणांना शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकिर्दीच्या संधीसाठी तयार होण्यास मदत मिळते.
प्रशासन, संविधान, नवोन्मेष आणि सार्वजनिक धोरण या विषयांवरील बहुभाषिक डिजीटल प्रश्नमंजुषा यांमुळे शिकण्याची प्रक्रिया संवादात्मक होते.
तरुणांना राष्ट्राशी जोडणारे उपक्रम
तरुणांच्या नेतृत्वाखालील राष्ट्र उभारणी
माय भारत माय वोट या मोहिमेने पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये माहितीपूर्ण मतदान आणि घटनात्मक जाणीव यांबाबत जागरूकता निर्माण केली.
राष्ट्रीय युवा महोत्सव: विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026 मध्ये 50.42 लाख युवकांनी सहभाग नोंदवला, त्यामुळे हा उपक्रम भारतातील तरुणांशी संवाद साधणाऱ्या सर्वांत मोठ्या उपक्रमांपैकी एक ठरला.
विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग (व्हीबीवायएलडी) 2026 ने तरुणांना विकसित भारत 2047 साठीच्या कल्पना आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या उपक्रमाने नेतृत्व, नाविन्य आणि राष्ट्रनिर्मितीमधील अर्थपूर्ण सहभागाला प्रोत्साहन मिळाले.
युथ फॉर विकसित भारत – माय भारत युथ कन्व्हेन्शन 2026 ने 6000 हून अधिक तरुणांना एकत्र आणले आणि अमृत पिढीच्या आकांक्षा आणि यशाचा उत्सव साजरा झाला.
17 क्षेत्रांमध्ये आयोजित नारी शक्ती युथ पार्लमेंटमध्ये 7000 हून अधिक तरुणींनी संरचित लोकशाही संवाद आणि धोरणात्मक चर्चांमध्ये सहभाग नोंदवला.
स्वयंसेवा आणि सामाजिक कृती
राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), सहभाग आणि निरीक्षण यांच्या सुलभतेसाठी माय भारत व्यासपीठाचा वापर करते.
माय भारत उपक्रमाच्या स्वयंसेवकांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस 2026 च्या निमित्ताने शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणे आणि प्रमुख स्थानांवर योग सत्रांचे आयोजन करून लाखो तरुणांना त्यात सहभागी करून घेतले.
नशा मुक्त भारत मोहिमेद्वारे, तरुण स्वयंसेवकांनी अमली पदार्थमुक्त भारतासाठी जनजागृती मोहीम, पुनर्वसन उपक्रम आणि समुदाय संपर्क उपक्रमांना पाठिंबा दिला.
माय भारत उपक्रमाद्वारे, देशभरात नागरिक सहभाग आणि जन भागीदारी बळकट करण्यासाठी पदयात्रा, स्वच्छता मोहिमा आणि समाजसेवेचे उपक्रम आयोजित केले जातात.
सीमावर्ती भागातील तरुणांचा आवाज
विकसित व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमामुळे तरुणांना देशातील सीमावर्ती गावांमधील जीवन अनुभवण्याची संधी मिळाली, त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि तळागाळातील सहभागाला चालनाही मिळाली.
माय भारत पॉडकास्ट मालिका 21 मार्च 2026 रोजी सुरू झाला, त्यात नागरिकांच्या सक्रियतेला प्रोत्साहन देणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि समाज परिवर्तन करणाऱ्या लोकांशी संवाद साधला जातो.
माय भारत उपक्रमामुळे, संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या (ईसीओएसओसी) युथ फोरम 2026 मध्ये भारतातील तरुणांना सहभाग घेणे शक्य झाले. यामुळे तरुण नेतृत्वाला जागतिक धोरणात्मक चर्चांमध्ये भारताचा दृष्टीकोन मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले.
माय भारत - डिजीटल इंडियाच्या संकल्पाला पुढे नेणारा दृष्टीकोन
माय भारत व्यासपीठाच्या माध्यमातून तंत्रज्ञानामुळे देशभरातली तरुणांचा सहभाग कसा अधिक सुलभ, मान्यताप्राप्त आणि भविष्यवेधी झाला आहे ते अधोरेखित होते.
सहभाग आणि अधिकृत मान्यता
माय भारत व्यासपीठाने, 04 जून 2026 रोजी 'एका आठवड्यात ऑनलाइन प्रश्नमंजुषेत सर्वाधिक सहभाग' या श्रेणीत 390,812 सत्यापित सहभागींसह गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा किताब मिळवला.
हे पोर्टल स्वयंसेवा, शिक्षण कार्यक्रम आणि नागरी सहभाग यांची दखल घेणारे डिजीटल बॅजेस, प्रमाणपत्रे आणि सहभागाच्या सत्यापित नोंदी उपलब्ध करून देते.
डिजीटल प्रशासन तुमच्या खिशात
22 भाषांत उपलब्ध असणाऱ्या माय भारत मोबाइल अॅप्लिकेशनने 2 जुलै 2026 पर्यंत 1लाखांहून अधिक डाउनलोडस् चा टप्पा गाठला आहे.
एका नोंदणीद्वारे, देशभरातली विविध संधी, शैक्षणिक संसाधने, डिजीटल प्रमाणपत्रे आणि सरकारी उपक्रमांचा सहज लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध होते.
भविष्यावेधी व्यासपीठ
'माय भारत 2.0' हे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), बहुभाषिक तंत्रज्ञान, ओपन एपीआय आणि डिजीटल क्रेडेन्शियल्सच्या माध्यमातून तरुणांचा सहभाग वाढवून त्यांच्या सहभागाचे स्वरूप बदलते आहे.
हे प्लॅटफॉर्म विकसित भारत 2047 च्या ध्येयाशी सुसंगत अशा तंत्रज्ञान आधारित प्रशासनाद्वारे 10 कोटींहून अधिक तरुणांना सक्षम करण्याच्या देशाच्या दृष्टीकोनाचे प्रतिनिधित्व करते.
भविष्यवेधी मेरा युवा भारताची उभारणी
डिजीटल इंडियाच्या पायावर उभारलेले, माय भारत हे व्यासपीठ अमृत पिढीला राष्ट्रउभारणीत सहभागी होण्यासाठी आणि विकसित, सर्वसमावेशक व आत्मनिर्भर राष्ट्र निर्माणाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी सक्षम करत आहे.
देश विकसित भारत 2047 च्या दिशेने वाटचाल करत असताना, तरुणांसाठी माय भारत हे सर्वांत मोठे डिजीटल सार्वजनिक पायभूत सुविधा व्यासपीठ होण्याच्या मार्गावर आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बहुभाषिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हे व्यासपीठ स्वयंसेवा आणि अनुभवाधारित ज्ञानार्जनाच्या संधींचा विस्तार करत राहील.
References
MY Bharat Portal
Ministry of Youth Affairs and Sports
पीडीएफ येथे पाहता येईल
आशिष सांगले/विजयालक्ष्मी साळवी - साने/प्रिती मालंडकर
(तथ्य सामग्री आईडी: 150755)
आगंतुक पटल : 13
Provide suggestions / comments