Social Welfare
मेरा युवा भारत
युवा सक्षमीकरण आणि राष्ट्रीय परिवर्तनाचे डिजिटल इंजिन
Posted On:
31 OCT 2025 10:24AM
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2025
|
महत्त्वाचे मुद्दे
|
- लाखो युवकांचे सक्षमीकरण: शिक्षण, नेतृत्व आणि सेवेसाठी एकात्मिक डिजिटल परिसंस्थेशी 2 कोटींहून अधिक तरुण आणि 1.2 लाख संस्था जोडल्या गेल्या आहेत.
-
- भागीदारीतून विकासाला चालना: डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन आणि सोल (SOUL) यांच्याशी झालेले सामंजस्य करार कृत्रिम बुद्धिमत्ता साधने, मार्गदर्शन आणि नेतृत्व प्रशिक्षणाद्वारे ‘माय भारत 2.0 लाख बळकट करतात.
-
- विकसित भारत 2047 च्या दिशेने वाटचाल : माय भारत 2.0 अंतर्गत करिअर मार्गदर्शन, कौशल्य मॅपिंग आणि नवउद्योजकतेला समर्थन पाठबळ या उपक्रमांचा विस्तार होईल, परिणामी युवकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय परिवर्तनाला चालना मिळेल.
|
युवक प्रधान भारताची पायाभरणी
भारत आज आपल्या विकास प्रवासात एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे, जिथे लोकसंख्येचा 65% भाग 35 वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे, आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकारण्याचे उद्दिष्ट आहे. या निर्णायक काळात, मेरा युवा भारत (माय भारत) हा भारत सरकारचा एक ऐतिहासिक उपक्रम म्हणून उदयास आला आहे - जो युवा वर्गाला सक्षम करण्यासाठी आणि त्यांची ऊर्जा राष्ट्र उभारणीसाठी अर्थपूर्ण कृतीत रूपांतरित करण्याकरिता समर्पित एक राष्ट्रीय व्यासपीठ आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘माय भारत’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. माय भारत हे तंत्रज्ञान, प्रशासन आणि सार्वजनिक सहभागाचे गतिमान मिश्रण आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली ही एक स्वायत्त संस्था आहे , जी एक तंत्रज्ञान आधारित संस्थात्मक यंत्रणा प्रदान करते. या माध्यमातून देशातील युवकांना स्वयंसेवा, अनुभव आधारित शिक्षण, नेतृत्व आणि कौशल्य विकासाच्या संधींशी जोडले जाते.
या व्यासपीठाद्वारे, युवकांना विविध सरकारी विभाग, खाजगी संस्था आणि नागरी-समाज भागीदारांमधील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणापासून ते नवोन्मेष, नवउद्योजकता आणि सामाजिक समावेशान अशा विविध क्षेत्रातील वास्तव समस्यांवर उपाय शोधण्यामध्ये ते योगदान देऊ शकतात. राष्ट्रीय युवा धोरणाशी सुसंगत असलेला हा उपक्रम प्रामुख्याने 15 ते 29 वयोगटातील व्यक्तींना लक्ष्य करतो तसेच 10-19 वयोगटातील किशोरांमध्ये लवकर नागरी सहभाग आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करतो.

स्रोत: माय भारत पोर्टल
हा उपक्रम विखुरलेल्या युवा कार्यक्रमांपासून एकात्मिक डिजिटल परिसंस्थेकडे वळण्याचे प्रतीक आहे जिथे आकांक्षा आणि संधींचा संगम घडतो. हा उपक्रम स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर - प्रत्येक स्तरावर सहभागासाठी मार्ग तयार करतो तसेच रोजगारक्षमता आणि नागरी अभिमान वाढवणाऱ्या सत्यापित डिजिटल क्रेडेंशियल्सद्वारे प्रत्येक योगदानाला मान्यता देतो.
माय भारत त्याच्या केंद्रस्थानी "युवा शक्ती से जन भागिदारी" ही भावना आहे - जेव्हा भारताचे तरुण विकासात सक्रिय भागीदार असतील तेव्हाच देशाची प्रगती सर्वात प्रभावी असते असा विश्वास यातून व्यक्त केला जातो. हा उपक्रम अमृत काळाचे सार आत्मसात करतो, जिथे प्रत्येक तरुण भारतीयाला केवळ बदलाचा लाभार्थी म्हणून नव्हे तर त्या बदलाचा शिल्पकार म्हणून स्थान मिळते, जो विकसित भारत 2047 घडविण्याचा प्रवासात अग्रणी भूमिका बजावतो.
माय भारत दृष्टिकोन
2023 मध्ये जेव्हा माय भारत उपक्रमाचा प्रारंभ झाला, तेव्हा तो भारताच्या बदलत्या युवा परिदृश्याला योग्य वेळी दिलेला प्रतिसाद होता. विशिष्ट ग्रामीण किंवा शहरी संदर्भांसाठी बनवलेले पारंपारिक युवा कार्यक्रम आता तंत्रज्ञान, गतिशीलता आणि जागतिक अनुभवातून आकार घेतलेल्या पिढीला जोडण्यासाठी पुरेसे वाटत नव्हते. आजच्या भारतातील तरुण नागरिक त्यांच्या आकांक्षा ओळखणारे, त्यांचा आवाज अधिक प्रभावीपणे वाढवणारे तसेच त्यांना शिक्षण आणि नेतृत्वाच्या संधींशी थेट जोडणारे व्यासपीठ शोधत आहेत. माय भारत हा उपक्रम ग्रामीण, शहरी आणि "रुर्बन" ( ग्रामीण - शहरी मिश्र) तरुणांना एकाच राष्ट्रीय व्यासपीठावर एकत्र आणणारी एक एकीकृत, तंत्रज्ञान आधारित परिसंस्था तयार करून ही दरी भरून काढते. या उपक्रमाचा ‘फिजिटल (भौतिक + डिजिटल) दृष्टिकोन म्हणजे प्रत्यक्ष सहभाग आणि डिजिटल उपलब्धता यांचा संगम आहे जो कोणताही तरुण या प्रवाहात समाविष्ट होण्यापासून वंचित राहणार नाही याची खात्री करतो. याच कारणामुळे आज हा उपक्रम अधिक प्रासंगिक बनतो.

डिजिटल परिसंस्था
माय भारतच्या केंद्रस्थानी एक शक्तिशाली डिजिटल परिसंस्था आहे जी लाखो तरुण भारतीयांना विकास आणि सेवेच्या वास्तवकालीन (रिअल-टाइम) संधींशी जोडते. डिजिटल इंडियाच्या आराखड्या अंतर्गत विकसित केलेली ही परिसंस्था अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि समावेशक डिझाईन्स चा समन्वय साधते, जेणेकरून प्रत्येक तरुण, मग तो महानगरातील असो किंवा दुर्गम खेड्यातील, प्रत्येकाला शिक्षण, नेतृत्व आणि स्वयंसेवाच्या संधी मिळवू शकतील ते देखील फक्त एका क्लिकवर!
माय भारत पोर्टल (mybharat.gov.in)
माय भारत पोर्टल हे युवकांसाठी स्वयंसेवा, कौशल्य आणि नेतृत्वाच्या संधींशी जोडणारे एक केंद्रीय डिजिटल प्रवेशद्वार म्हणून काम करते. या पोर्टलद्वारे सुलभ नोंदणी, डिजिटल ओळखपत्र, संधी जुळवणे आणि रिअल-टाइम इम्पॅक्ट डॅशबोर्ड उपलब्ध करून दिला जातो. ऑक्टोबर 2025 पर्यंत, या व्यासपीठावर 2 कोटींहून अधिक तरुण आणि 1.20 लाख संस्था जोडल्या गेल्या आहेत, ज्यामुळे सहकार्य आणि कृतीची एक जीवंत परिसंस्था तयार झाली आहे.
आतापर्यंत 14.5 लाखांहून अधिक स्वयंसेवी संधी निर्माण झाल्यामुळे, माय भारत आता 16,000+ युवा क्लब सदस्य तसेच सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांसह 60,000+ संस्थात्मक भागीदारांच्या विस्तृत नेटवर्कला जोडले आहेत. रिलायन्ससारख्या प्रमुख कॉर्पोरेट भागीदारांसोबतच्या सहकार्याने अनेक प्रभावी कार्यक्रम आणि बूटकॅम्पद्वारे त्याची पोहोच आणखी वाढवली आहे. परिणामी युवकांची ऊर्जा नागरी आणि समुदायिक विकास प्रकल्पांकडे प्रभावीपणे वळवली गेली आहे.
स्केलेबिलिटी, डेटा विश्लेषण आणि राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्मसह एकत्रीकरण या वैशिष्ट्यांसह डिझाइन केलेले, माय भारत हा उपक्रम भारताच्या युवा-नेतृत्वाखालील विकास चळवळीचा तांत्रिक आधार म्हणून उभा आहे.
माय भारत मोबाइल ॲप (ऑक्टोबर 2025 ला लाँच):
युवक सहभाग अधिक मोबाइल आधारित आणि अधिक सुलभ बनवण्यासाठी, माय भारत (MY Bharat) मोबाइल ॲप 1 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू करण्यात आले. या ॲपने पोर्टलच्या सर्व प्रमुख कार्यांचा समावेश अधिक सोयीस्कर पद्धतीने केला आहे. हे ॲप मुख्य कार्यांना अतिरिक्त सोयी आणि पोहोचासह एकत्र आणते. यात बहुभाषिक समर्थन, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅटबॉट्स, व्हॉइस-असिस्ट नेव्हिगेशन आणि स्मार्ट सीव्ही बिल्डर टूल्स आहेत, ज्यामुळे तरुणांना सहज चालता बोलता संधी मिळवता येतील आणि प्रमाणित डिजिटल प्रोफाइल तयार करता येईल. लाँचच्या वेळी, 1.81 कोटींहून अधिक तरुण आणि 1.20 लाख संस्था या प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत होत्या. या ॲपद्वारे युवकांना डिजिटल प्रमाणपत्रे आणि एंगेजमेंट बॅजेस देखील प्रदान केले जातात, जे त्यांच्या राष्ट्रीय आणि सामुदायिक प्रकल्पांतील प्रत्येक सहभागीच्या योगदानाचे प्रतिबिंब दर्शवतात.
माय भारत 2.0 मॉड्युल्स :
अद्ययावत केलेल्या माय भारत 2.0 मध्ये प्रगत डिजिटल मॉड्युल्सचा अंतर्भाव केलेला आहे, यामुळे हे व्यासपीठ नोंदणी पोर्टल म्हणून तर कामी येतच आहे, त्यासोबतच ते युवा सहभागाची एक व्यापक परिसंस्था बनले आहे. यात खाली नमूद घटकांचा समावेश केलेला आहे:
- राष्ट्रीय करिअर सेवा : या घटकाच्या माध्यमातून युवा उद्योग व्यावसायिकांना रोजगार आणि करिअरच्या संधींसोबत जोडले जात आहे.
- मार्गदर्शक केंद्र : या माध्यमातून युवा वर्गाच्या कौशल्य विकासाठी त्यांना उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, नवोन्मेषक आणि विचारवंतांशी जोडले जात आहे.
- अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम : या माध्यमातून जिल्हा आणि राज्य स्तरावरील कामांशी जोडून, प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळवून दिली जात आहे, आणि याद्वारे नागरिक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणिव विकसित केली जात आहे.
- फिट इंडियासोबतचे एकात्मीकरण : या माध्यमातून आरोग्य आणि तंदुरुस्ती विषयक तसेच अन्य सामुदायिक मोहिमांच्या द्वारे युवा वर्गाच्या सर्वांगीण कल्याणाला चालना दिली जात आहे.
या व्यासपीठाअंतर्गत सुलभता आणि सर्वसमावेशकतेत वृद्धी घडवून आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ध्वनी आधारित नॅव्हिगेशन, स्मार्ट सीव्ही (वैयक्तिक व्यावसायिक तपशील) तयार करणे आणि ते बहुभाषिक वर्गापर्यंत पोहचवण्याची सोय उपलब्ध करून दिली गेली आहे.
अगदी शेवटच्या पातळीपर्यंत पोहोचता यावे यासाठी सामायिक सेवा केंद्र (CSC) भागीदारी:
डिजिटल दरी कमी करण्यासाठी आणि हे व्यासपीठ प्रत्येकाला उपलब्ध असेल याची सुनिश्चित करण्यासाठी, माय भारत अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत सामायिक सेवा केंद्रांच्या (CSC) विस्तारलेल्या जाळ्यासोबत भागीदारी केली गेली आहे. ही सहकार्यपूर्ण भागिदारी देशभरातील 5 लाखांपेक्षा जास्त ग्रामस्तरीय उद्योजकांना ग्रामीण, आदिवासी आणि आकांक्षित जिल्ह्यांमधील युवा वर्गाला माय भारत द्वारा उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांसाठी नोंदणी करण्याकरता, आणि त्यासाठी सहाय्यासाठी मोठी मदतीची ठरली आहे. या भौतिक स्वरुपातील डिजिटल मॉडेलच्या माध्यमातून, कोणत्याही भौगोलिक प्रदेशात वसलेल्या प्रत्येक युवाला, त्यांच्या जवळच्या सामायिक सेवा केंद्रांच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्यक्रम, नेतृत्वाच्या संधी आणि सामुदायिक प्रकल्पांशी जोडून घेणे शक्य झाले आहे.
कृतीशील युवा वर्ग : गाथा बदलांच्या
विकसित भारत 2047 च्या प्रत्येक यशदायी टप्प्यासोबत एका अशा युवा भारतीयांची गाथा जोडलेली आहे, जे आता बदलांची वाट पाहत नसून, प्रत्यक्षात स्वतः ते बदल घडवून आणत आहेत. MY Bharat द्वारे या गाथांना प्रत्यक्ष मूर्त रुप मिळाले असून, या गाथा म्हणजे भारताच्या युवा वर्गाचे सक्षमीकरण केले, त्यांना योग्य संधींशी जोडून प्रेरणा दिली तर ते अगदी सामान्य वाटणाऱ्या गोष्टींना राष्ट्रासाठी महत्त्वाच्या ठरतील अशा चळवळीत रूपांतरीत करू शकतात, याचाच पुरावा ठरल्या आहेत. वर्गखोल्यांपासून ते सीमांवरील चौक्यांपर्यंत, गावांपासून ते जागतिक स्तरापर्यंत आज देशभरातील युवा वर्ग आपल्या डिजिटल सहभागाला, सामूहिक कृतीमध्ये रूपांतरित करत असून, देशाच्या विकास गाथेत स्वतःची अमिट छाप सोडू लागले आहेत.
|
विकसित भारत रन 2025 : वसुधैव कुटुंबकम्
- विकसित भारत रन 2025 म्हणजे भारताच्या युवा वर्गासाठी आपल्या एकतेची भावना आणि ध्येय उद्दिष्टांच्या अभिव्यक्तीसाठीचे जागतिक व्यासपीठ बनले आहे. 91 देशांमधील 150 आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये हा उपक्रम आयोजित केला गेला. या उपक्रमाअंतर्गत युवा भारतीय आणि परदेशस्थ भारतीयांनी एकत्र येत भारताच्या प्रगतीचा उत्सव साजरा केला, तसेच 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यामध्ये आपण बजावणार असलेल्या भूमिकेबद्दलची शपथही घेतली. या उपक्रमाच्या निमित्ताने सिडनीपासून ते सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत, पडलेले प्रत्येक पाऊल म्हणजे युवा वर्गाच्या आशावादाचे, आणि विकासाला सीमांची मर्यादा नसते, या परस्पर सामायिक विश्वासाचेच प्रतीक होते. हा उपक्रम युवा शक्तीची चळवळ बनली असून, तो भारताचा युवा वर्ग, कुठेही वसलेला असला तरी, एक आत्मा, एक दृष्टी आणि राष्ट्र उभारणीच्या एका ध्येयाने बांधलेला असल्याचे स्मरण करून देणारा उपक्रम ठरला आहे.
|
|
राष्ट्रीय ध्वज प्रश्नमंजुषा : क्विझ से सियाचीन तक!
- माय भारत अंतर्गत आयोजित राष्ट्रीय ध्वज प्रश्नमंजुषा हा उपक्रम, ज्ञानाच्या चाचणीपेक्षाही अधिक काही साध्य करणारा ठरला. हा उपक्रम म्हणजे भारताच्या युवा वर्गासाठी अभिमान आणि उद्दिष्टाची एक अविस्मरणीय यात्राच ठरली. या प्रश्नमंजुषेत सहभागी झालेल्या हजारो सहभागींनी, केवळ प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच नव्हे, तर तिरंग्याचा अर्थ आणि तो दर्शवणारी मूल्ये पुन्हा आत्मसात करण्यासाठी सहभाग घेतला होता. यातून निवडलेल्या काही अपवादात्मक स्वयंसेवकांना जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी असलेल्या सियाचीन इथे भेट देण्याची संधी मिळाली. या भेटीमुळे त्यांना भारताचे शौर्य आणि एकतेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानाच्या माध्यमातून देशभक्तीची ज्योत प्रज्वलित केली, त्यासोबतच जेव्हा ज्ञान आणि भावनांची एकत्रित जडणघडण होते, त्यावेळी राष्ट्राचा ध्वज आधीपेक्षा जास्त उंचावर पोहोचतो याची जाणिवही नागरिकांना करून दिली.
|
|
नशा मुक्त भारताच्या दिशेने वाटचाल
- जुलै 2025 मध्ये वाराणसी इथून विकसित भारतासाठी नशा मुक्त युवा या उपक्रमाचा प्रारंभ केला गेला होता. या उपक्रमाअंतर्गत सहभागी झालेल्या 100 पेक्षा जास्त आध्यात्मिक संस्था आणि हजारो युवांनी नशामुक्त देशाच्या जडणघडणीसाठी एकत्र येत शपथ घेतली. काशी जाहीरनाम्याचा स्वीकार हा या उपक्रमाचा एक महत्त्वाचा क्षण ठरला. या जाहिरनाम्याच्या माध्यमातून युवा वर्गाला जागृती, सहानुभूती आणि सामुदायिक कृतींच्या माध्यमातून व्यसनाधीनतेविरुद्धच्या भारताच्या लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी अधिक सक्षम केले आहे. अल्पावधीतच ही चळवळ देशभर विस्तारली. त्यानंतर तर सप्टेंबर 21, 2025 रोजी देशभरात आयोजित केलेल्या 2,000 पेक्षा जास्त कार्यक्रमांमध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त युवा प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. एका आध्यात्मिक परिषदेच्या स्वरुपात सुरु झालेली या मोहीमेचे युवा वर्गाच्या नेतृत्वाखाली लोकचळवळीत रूपांतर झाले. युवा शक्तीने निर्धार केला तर, हाती घेतलेल्या संकल्पाला सातत्यपूर्ण सामाजिक बदलांचे रुप दिले जाऊ शकते हेच या उपक्रमाने सिद्ध करून दाखवले आहे.
|
|
विकसित भारत युवा नेतृत्वाचा संवाद (Viksit Bharat Young Leaders Dialogue - VBYLD)
- विकसित भारत युवा नेतृत्वाचा संवाद (VBYLD) या उपक्रमाच्या माध्यमातून विकसित भारत 2047 च्या राष्ट्रीय संकल्पाला, कृतीयोग्य कल्पनांमध्ये रूपांतर करण्याच्या उद्देशाने भारतातील बुद्धिमान युवा नेते एकत्र आले होते. या उपक्रमाअंतर्गत शाश्वतता आणि नवोन्मेषापासून ते युवा सक्षमीकरण आणि स्टार्टअप्स पर्यंतच्या 10 मुद्यांवर विषयानुसार आणि संकल्पनाधारीत चर्चासत्रांचे आयोजन केले गेले होते. या चर्चासत्रांमध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी भारताच्या भविष्यासाठीच्या धाडसी उपाययोजनांवर विचारमंथन केले. या कार्यक्रमातून देशाच्या युवा शक्तीची खरी ओळख असलेल्या परस्पर सहकार्य, आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेची भावना व्यक्त केली गेली. त्यामुळेच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युवा वर्गाच्या प्रयत्नांचेही कौतुक केले होते. “अशा प्रतिभावान युवा शक्तीचे वरदान भारताला खऱ्या अर्थाने लाभले आहे” असल्याची भावना त्यांनी आपल्या प्रशंसापर शब्दांतून व्यक्त केली होती. पंतप्रधानांच्या या शब्दांमधून देशाच्या विकास यात्रेत युवा नेतृत्वाच्या भूमिकेचे महत्वही पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
|
आतापर्यंतची वाटचाल आणि पुढची दिशा
माय भारत या उपक्रमाचा प्रारंभ झाल्यापासून अगदी दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीतच, तो युवा वर्गाच्या सहभागासंबंधीचे भारताचे सर्वात मोठे डिजिटल व्यासपीठ बनला आहे. या व्यासपीठाअंतर्गत आत्तापर्यंत 2 कोटींपेक्षा जास्त युवा प्रतिनिधी आणि 1.20 लाखापेक्षा जास्त भागीदार संस्थां जोडल्या गेल्या आहेत. या व्यासपीठाच्या माध्यमातून स्वयंसेवा, नेतृत्व आणि कौशल्य विकासासाठी नव्या मार्ग आखता आले आहेत. यासोबतच भारतीच्या युवा वर्गाला देशासाठी प्राधान्यक्रमावर असलेल्या गोष्टींमध्ये स्वतःचे थेट योगदान देण्यासाठी सक्षम करता आले आहे. काही महत्त्वाच्या भागीदारी आणि सामंजस्य करारांमुळे (MoUs) या व्यासपीठाचे यश अधिक दृढ झाले आहे. यामुळे या व्यासपीठाचा डिजिटल आणि संस्थात्मक विस्तारही वाढला आहे.
जून 30, 2025 रोजी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (MeitY) मध्ये एक ऐतिहासिक सामंजस्य करार झाला. या करारामुळे MY Bharat 2.0 च्या विकासाचा मार्ग अधिक प्रशस्तर झाला, आणि हे व्यासपीठ भविष्यातील काळाचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाधारीत, बहुभाषिक व्यासपीठ बनले. यासोबतच या व्यासपीठाला ध्वनी आधारित नॅव्हिगेशन, स्मार्ट सीव्ही (वैयक्तिक व्यावसायिक तपशील) तयार करणे आणि ते बहुभाषिक वर्गापर्यंत पोहचवण्याची सोय, मार्गदर्शकांचे विस्तारीत जाळे आणि अनुभवाधारित शिक्षण मॉड्युल्स सारख्या वैशिष्ट्यांची एकात्मिक जोडही देता आली. आगामी three वर्षांत विविध पार्श्वभूमीच्या one lakh युवा नेत्यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने, ऑगस्ट 13, 2025 रोजी स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप फाउंडेशन (SOUL) सोबतही सहकार्यपूर्ण भागिदारीला औपचारिक रुप दिले गेले. या भागीदारीच्या माध्यमातून तंत्रज्ञान आणि क्षमता निर्माणाचे एकात्मिकीकरण घडून आणण्याच्या MY Bharat च्या ध्येय उद्दिष्टा ठळकपणे दिसून आले. त्यामुळेच आता युवा वर्गाचा सहभाग अधिक समावेशक आणि परिणाम केंद्रित बनू लागला आहे.
आता या पुढच्या वाटचालीचा विचार केला तर MY Bharat 2.0 अंतर्गतच परिसंस्थेचा, करिअर विषयक समुपदेशन, कृत्रिम बुद्धिमत्ताधारित कौशल्य मॅपिंग, उद्योजकतेला पाठबळ आणि डिजिटल प्रमाणन अशा पातळीवर विस्तार केला जाईल. यामुळे हे व्यासपीठ ग्लोबल साउथ अंतर्गत येत असलेल्या सर्व देशांसाठी युवा वर्गाचे सर्वात मोठे डिजिटली विस्तारलेले जाळे म्हणून स्थापित होईल. या उपक्रमाचे राष्ट्रीय करिअर सेवा (NCS), डिजीलॉकर (DigiLocker), उमंग (UMANG) आणि डिजिटल इंडिया स्टॅक (Digital India Stack) या व्यवस्थांसोबत एकात्मिकीकरण घडवून आणण्याचे नियोजनही केले गेले आहे. यामुळे एक निरंतर क्षमतची परस्परांतर्गत कार्यान्वयनाशी जोडलेली आणि सुधारीत धोरण अभिसरण व्यवस्था निर्माण होईल.
पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लीक करा
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
(Backgrounder ID: 155854)
Visitor Counter : 5
Provide suggestions / comments