माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ॲनिमेशन चित्रपट गंभीर विषय मांडण्यासाठीचे प्रभावी माध्यम -16 व्या मिफ्फ दरम्यान सुप्रसिद्ध ॲनिमेटर आणि दिग्दर्शक मायकेल डूडोक दी विट यांनी व्यक्त केले मत

Posted On: 30 JAN 2020 5:50PM by PIB Mumbai

मुंबई, 30 जानेवारी 2020

 

ॲनिमेशन पट आज लोकप्रिय होत असले तरीही ते केवळ हलक्या-फुलक्या मनोरंजन किंवा उद्बोधक विषयांपुढे मर्यादित असतात, असा एक मोठा गैरसमज आहे, वास्तवात, एखादा गंभीर विषय परिणामकारकरित्या मांडण्यासाठी देखील ॲनिमेशनपट अत्यंत प्रभावी ठरू शकतो, असे मत, सुप्रसिद्ध ऍनिमेटर आणि दिग्दर्शक मायकेल डूडोक दी विट यांनी व्यक्त केले. 16 व्या मुंबई आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज फिल्म्स डिव्हिजन इथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यकेलमा डूडोक दी विट यांचे ॲनिमेशनपट या महोत्सवात दाखवले जात आहेत. ॲनिमेटर म्हणून त्यांचा आजवरचा प्रवास, त्यांच्या चित्रपटांचे अनुभव आणि ॲनिमेशनपट क्षेत्राविषयी त्यांनी माहिती दिली. सुप्रसिद्ध भारतीय ॲनिमेशन पट ई सुरेश यांच्या पत्नी आणि सहकारी नीलिमा इरीयत देखील यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी ई सुरेश यांचे काम आणि  'इकसॉरस' या त्यांच्या ॲनिमेशन स्टुडिओविषयी माहिती दिली.

जपानमध्ये ॲनिमेशन पट निर्मितीला विशेष महत्व आहे. मी या क्षेत्रात काम करण्यासाठी धडपडत असतानांच मला जपानी चित्रपट निर्माते टकाटा यांच्यासोबत चित्रपट निर्मितीची संधी मिळाली. हा ॲनिमेशन पट युरोपमध्ये तयार करण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

ॲनिमेशन पट आज पूर्वीपेक्षा अधिक लोकप्रिय होत आहेत, मात्र, हे चित्रपट फक्त विनोदी किंवा हलक्य-फुलक्या स्वरूपाचे असतात, असा गैरसमज आहे. मात्र असे नाही. ॲनिमेशन पट देखील अत्यंत गंभीर विषयांवरचे असतात. झिरो इम्प्यूनिटी ही अशीच ॲनिमेशन फिचर फिल्म आहे, ज्यात लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर विषयावर ॲनिमेशनच्या माध्यमातून प्रभावी भाष्य केले आहे, असे मायकेल यांनी सांगितले. ॲनिमेशनसाठी आता कॉम्प्युटर्सचा वापर होत असला, तरी हाताने चित्र काढून त्यावर ॲनिमेशन करण्याची कला आपल्याला अधिक आवडते, असे ते म्हणाले. भारतात वाराणसी आणि त्रिवेंद्रम अशा शहरांना त्यांनी भेट दिली आहे, तिथले अनुभव देखील त्यांनी यावेळी सांगितले. ऍनिमेशन ही एका खोलीत बसून करण्याची कला नाही, तर त्यासाठी अनेक ठिकाणहून तुम्हाला कल्पना शोधाव्या लागतात, तुमचे निरीक्षण आणि कल्पनाशक्ती सतत जागृत ठेवावी लागते असे ते म्हणाले. याच संदर्भात, आपल्या आगामी ॲनिमेशन पटात, भारतीय लोकांच्या देहबोलीचा केलेला अभ्यास वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मायकेल डूडोक दी विट यांच्या 'फादर अँड डॉटर'  ॲनिमेशनपटाला 2000 साली ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तर त्यांच्या 'रेड टर्टल' आणि 'द मॉंक अँड द फिश' या गाजलेल्या चित्रपटांना देखील ऑस्करसाठी नामांकन मिळालं होतं. रेड टर्टल या ॲनिमेशन पटाला जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. हा ॲनिमेशनपट प्रेक्षकांना स्तब्ध करणारा आहे, असेही नीलिमा यांनी सांगितले.

नीलिमा इरीयत यांनी भारतातल्या ॲनिमेशन व्यवसायातील आव्हाने आणि स्थितीची माहिती दिली. भारतात अजूनही ॲनिमेशन पट हे क्षेत्र नवखेच आहे. त्यामागे असणारी कला, गुणवत्ता आणि परिश्रमांची म्हणावी तेवढी दाखल घेतली जात नाही, असे त्यांनी सांगितले. विशेषतः ॲनिमेशन पट निर्मितीसाठी आर्थिक पाठबळ मिळणे अत्यंत कठीण असते, असेही त्यांनी संगीतले. मात्र आमच्यासारख्या ॲनिमेशन कलेचे वेड असलेल्या लोकांना हे काम जिवंत ठेवते, त्यामुळे अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना करत आम्ही गेली जवळपास दोन दशके आमचा 'इकसॉरस' स्टुडीओ सुरु ठेवला आहे, असे नीलिमा इरियत यांनी सांगितले. भारतात ॲनिमेशन क्षेत्रात इतकी वर्षे यशस्वीपणे सुरु असलेला हा एकमेव व्यावसायिक स्टुडिओ आहे.

R.Tidake/S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 



(Release ID: 1601140) Visitor Counter : 132


Read this release in: English