माहिती आणि प्रसारण मंत्रालय

16व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान बी. लेनिन यांची पत्रकार परिषद


चित्रपट संकलन तांत्रिकविषय नाही, तर सर्जनशीलतेची कला - ज्येष्ठ चित्रपट संकलक बी. लेनिन

Posted On: 31 JAN 2020 5:32PM by PIB Mumbai

मुंबई, 31 जानेवारी 2020

 

चित्रपट संकलन हे तंत्रज्ञानाचे शास्त्र नाही, तर त्यासाठी तुमच्यातील कलाकाराची सर्जनशीलता कायम जागृत असावी लागते, असे मत, ज्येष्ठ चित्रपट संकलक आणि दिग्दर्शक बी. लेनिन यांनी व्यक्त केले. सोळाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आजच्या चौथ्या दिवशी फिल्म्स डिव्हिजन इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत चित्रपट संकलन आणि दिग्दर्शन क्षेत्रात वळण्याचा निर्णय घेतल्यापासून ते आज या क्षेत्रात अव्वल स्थानी पोहोचल्यापर्यंतचा प्रवास त्यांनी यावेळी सांगितला.

बी. लेनिन यांचे पिता भिमसिंग देखिल चित्रपट दिग्दर्शक होते. मात्र बी. लेनिन यांनी पित्याच्या मार्गदर्शनाखाली काम न करता स्वत:च्या धडपडीतून या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांमुळे त्यांना चित्रपट सृष्टीचे आकर्षण वाटले आणि लहान वयात ते चेन्नईहून मुंबईत आले. इथे अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी चित्रपट क्षेत्रातल्या दिग्गजांकडे मिळेल ते काम करायला सुरुवात केली. 1965 पासून त्यांनी काम सुरु केले. मात्र 1979 साली 'उथीली पोक्कल' हा पहिला तमिळ सिनेमा संकलित करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून त्यांचा प्रवास सुरु झाला आणि नंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 1983 साली त्यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या कारर्किदीची सुरुवात केली. आजवरच्या त्यांच्या यशस्वी कारर्किदीत त्यांनी अनेक तमिळ, मल्ल्याळम, तेलगू, संस्कृत आणि हिंदी अशा चित्रपटांचे संकलन आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांना पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट देखील त्यांना मिळलेले आहेत.

चित्रपट संकलन जुन्या काळात कठीण होते, त्या मानाने आता तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे संगणकाच्या मदतीने हे काम सोपे झाले आहे. मात्र हा केवळ तंत्रज्ञानाचा विषय नाही. तुम्ही ऑपरेटर बनू नका, तर क्रिएटर बना असा सल्ला त्यांनी दिला.

चित्रपट संकलन शिकण्यासाठी आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टींकडे डोळे आणि कान उघडे ठेवून बघितले पाहिजे, निरिक्षण केले पाहिजे, तरच तुमच्या समोर आलेल्या दृश्याला तुम्ही जिवंत करु शकाल, असे त्यांनी सांगितले. अनेकदा दृश्यांमध्ये परिणामकारकता आणण्यासाठी निसर्गातले आवाज घातले, असे त्यांनी उदाहरणे देऊन स्पष्ट केले. गाणं संकलित करत असतांना त्याचा ताल समजून घेता आला पाहिजे, पडद्यावरच्या अभिनेत्याची अभिनय आणि संवाद शैली समजून घेत, त्यानुसार संकलन करायला पाहिजे. संकलन म्हणजे केवळ कात्री लावणे, असा विचार केला तर तुमची कलाकृती निरस होईल, असे लेनिन यांनी सांगितले.

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक गोष्टी शिकायला मिळतात. इथे दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटातून नवी दृष्टी मिळते, यासाठी हा महोत्सव सुरु झाला तेव्हा पासून बी. लेनिन इथे येतात. तसेच आता ते त्यांच्या विद्यार्थ्यांनांही इथे घेऊन येतात. तमिळनाडूतल्या छोट्या गावातल्या मुलांना या महोत्सवातून शिकण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले. हे प्रत्यक्ष शिकण्याचे तंत्र आहे, ते पुस्तकी शास्त्रातून येत नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी 'इश्ती' हा संस्कृत चित्रपटही संकलित केला असून, 47 व्या इफ्फीमध्ये उद्‌घाटन प्रसंगी हा चित्रपट दाखवण्यात आला होता. चित्रपट, विशेषत: कलात्मक किंवा माहितीपट बनवायचे असतील, तर व्यावसायिक गणित जुळवता येत नाही, मात्र यातून सृजनशीलतेचा आनंद मिळतो आणि माझ्यासारख्या चित्रपट वेड्या माणसाची तीच खरी मिळकत आहे, असे लेनिन यांनी यावेळी सांगितले.

मिफ्फ दरम्यान आज बी. लेनिन यांचे संकलनाविषयी कार्यशाळा फिल्म्स डिव्हिजनच्या परिसरात झाली. 

 

 

R.Tidke/S.Tupe/R.Aghor/D.Rane



(Release ID: 1601338) Visitor Counter : 229


Read this release in: English