माहिती आणि प्रसारण मंत्रालय

दिव्यांग मुलांच्या सृजनशीलतेला सोळाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून मिळाले उत्तम व्यासपीठ

Posted On: 01 FEB 2020 6:55PM by PIB Mumbai

मुंबई, 1 फेब्रुवारी 2020

 

कलाकृती ही एका कलाकाराची निर्मिती असते. ही कलाकृती म्हणजे असते ती कलाकाराची जिद्द, त्याचा ध्यास. त्या कलाकाराला इतर कुठलीही बंधने नसतात. पण आपल्यासारख्या कित्येकांना आपल्यात दडलेला कलाकार माहीतच नसतो, तो कलाकार कधी जन्माला येत नाही आणि जर ती व्यक्ती दिव्यांग असेल तर त्या व्यक्तीच्या कलाकार म्हणून जन्माला येण्याच्या आशा जवळजवळ धूसर होऊन जातात. पण याच मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण आणला आहे, भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एफ टी आय आय अर्थात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंफिया विभाग आणि द आर्ट सॅक्चुरीने या मुलांसाठी 'स्मार्टफोन फिल्म मेकिंग फॉर स्पेशल अडलट्स' हा चित्रपट निर्मितीचा एक अभ्यासक्रम सुरू केला आहे.

नुकताच दिल्लीत इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन येथे हा अभ्यासक्रम या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतःमधील कलाकाराचं वेगळे अंग जगासमोर आणता आलं. चित्रपट निर्मितीच्या प्रवासातील लेखक, दिग्दर्शक, संकलक अशा विविध भूमिका साकारत या दिव्यांगांनी मोबाईलच्या माध्यमातून चित्रपट निर्मितीचा अद्भुत कलाविष्कार सादर केला आहे.  त्यांचा हाच आविष्कर जगासमोर यावा म्हणून पुढाकार घेतला आहे सोळाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने. या मुलांच्या कलेला एक उत्तम व्यासपीठ सोळाव्या मिफमुळे लाभले आहे. या दिव्यांग मुलांनी बनवलेल्या माहितीपटांना सोळाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पेशल पॅकेज गटात दाखवण्यात आलं आहे. बिहाइंड द सीन्स, फ्रीडम ऑफ लाईट्स, ऑटिझम इन द कॉर्पोरेट वर्ल्ड, ग्लोबल वॉर्मिंग, ओपन स्काईज, ट्रू हॅपिनेस, ओन्ली नानी अँड मी, स्वच्छ होम स्वच्छ भारत आणि माय टेक हे माहितीपट या विभागात दाखवण्यात आले.

आपल्या मुलांचा हा कलाविष्कार आणि त्यांचं कौतुक बघून त्यांच्या पालकांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.     

 

K.Shankar/S.Tupe/D.Rane

 



(Release ID: 1601580) Visitor Counter : 141