माहिती आणि प्रसारण मंत्रालय

अनुभव आणि विचार व्यक्त करण्याची कला म्हणजेच चित्रपट निर्मिती – 16 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितली चित्रपट निर्मितीमागची प्रेरणा

Posted On: 02 FEB 2020 5:12PM by PIB Mumbai

मुंबई, 2 फेब्रुवारी 2020

 

16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज सहाव्या दिवशी सुप्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक नागराज मंजुळे यांची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी ते बोलत होते. नागराज मंजुळे यांचा ‘पावसाचा निबंध’ हा लघुपट आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात या महोत्सवात दाखवण्यात आला. या चित्रपटाविषयी बोलतांना नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची कल्पना आणि निर्मितीविषयी संवाद साधला.

‘पिस्तुल्या’ नंतर हा त्यांचा दुसरा लघुपट आहे. ‘पाऊस’ हा साहित्यिकांसाठी जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय आहे. साधारणपणे सर्वांच्या पावसाविषयीच्या प्रतिमा, रोमँटिक सुखद अशा असतात. नागराज मंजुळे यांचा पाऊस मात्र वेगळा आहे. पावसाकडे बघण्याची वेगळी दृष्टी ते आपल्याला या लघुपटातून देतात. या वेगळ्या दृष्टीविषयी त्यांनी सांगितलं, मला लहानपणापासूनच पाऊस सुखद किंवा रोमँटिक वाटण्याऐवजी, त्याची भीती वाटत असे. मी खूप अक्राळविक्राळ, थैमान घालणारा, होत्याचं नव्हतं करणारा असा पाऊस पाहिला आहे, माझ्या मनातला हा पाऊस मला लोकांना दाखवायचा होता, त्यातूनच हा लघुपट साकारला, असे त्यांनी सांगितले. हा ‘माझा’ पावसाचा निबंध आहे, असेही त्यांनी सांगितले.

सिनेमासाठी विषयांची निवड करण्याबाबत विचारले असता, ‘विषय निवडण्यासाठी कधी वेगळा विचार करावा लागला नाही. तो आपसूक सुचतो. आपण विषयाची निवड करण्यापेक्षा, अनेकदा विषयच आपली निवड करतो’, असे नागराज यांनी संगितले.आपल्याला आलेला अनुभव, सुचलेली गोष्ट इतरांना सांगावीशी वाटणे म्हणजेच चित्रपट निर्मिती आहे, असेही ते म्हणाले.

या लघुपटाचे चित्रीकरण पुण्याजवळच्या काही गावांमध्ये केले. मला खरा पाऊस दाखवायचा होता, तो ही मुसळधार! त्यामुळे चित्रीकरण करतांना अनेक अडचणी आल्या. इतक्या पावसात, वारा-वादळात चित्रीकरण करणे खूप कठीण होते, मात्र आमच्या सगळ्या चमूने अतिशय प्रयत्नांनी हे चित्रीकरण पूर्ण केले, असे त्यांनी सांगितले.

सैराटची कल्पना कशी सुचली, असं विचारले असता, आपल्या देशात आपण सगळ्या गोष्टी सार्वजनिक करतो. अगदी, खुलेआम चुकीच्या गोष्टी करतांना देखील आपल्याला काही वाटत नाही, अनेकदा बघणाऱ्याला देखील त्यात काही खटकत नाही.  मात्र अत्यंत नैसर्गिक अशी भावना असलेलं प्रेम करणं आणि प्रेम व्यक्त करणं यावर आपण हजारो सामाजिक बंधने आणि नैतिक-अनैतिकतेच्या चौकटी घालून ठेवल्या आहेत, ही गोष्ट मला अनेक वर्षांपासून खटकत होती. जर कोणी इतर जातपात, धर्म न बघता केवळ प्रेम केलं तर, त्याचे आपल्या देशात काय होतं हे वास्तव मला या सिनेमातून दाखवायचं होतं, असे मंजुळे यांनी सांगितले.

‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’ यासारख्या चित्रपटांमुळे नागराज मंजुळे हे नाव आता जगभरात सुप्रसिद्ध झाले आहे. मराठी चित्रपटांत अत्यंत वेगळ्या धाटणीचे, आशयघन आणि मनाला आतमधून हादरवून टाकत विचारप्रवृत्त करणारे चित्रपट देत त्यांनी या क्षेत्रात नवा पायंडाच पाडला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही .त्यांच्या या चित्रपटांना अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यांचा पहिला लघुपट ‘पिस्तुल्या’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच, ‘पावसाचा निबंध’ या लघुपटालाही सर्वोत्कृष्ट लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या आधी अनेक महोत्सवात हा लघुपट दाखवण्यात आला आहे.

R.Tidke/R.Aghor/P.Malandkar



(Release ID: 1601643) Visitor Counter : 231


Read this release in: English