माहिती आणि प्रसारण मंत्रालय

16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नागालँडच्या दिग्दर्शिका अनंगला झो लॉंगकमेर यांच्या "द मेकिंग ऑफ चांगलांशूज न्यू लॉगड्रम" या माहितीपटातून नागालँड मधल्या अस्तंगत होत चाललेल्या तालवाद्याची कथा


राष्ट्रीय चित्रपट स्पर्धा गटात ओदिशी दिग्दर्शक शिबू पृष्टि यांच्या 'द मदरलॅंड' माहितीपटातून उद्योगप्रकल्पासाठी भूसंपादनाच्या ज्वलंत प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न

Posted On: 02 FEB 2020 5:32PM by PIB Mumbai

मुंबई, 2 फेब्रुवारी 2020

 

16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सहाव्या दिवशी वेगवगेळ्या विषयांवरील माहितीपटरसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यातलेच दोन लक्षणीय चित्रपट, जे भारताच्या ईशान्य भागातून आलेले आहेत, ते म्हणजे नागालँडच्या दिग्दर्शिका अनंगला झो लॉंगकमेर यांचा द मेकिंग ऑफ चांगलांशूज न्यू लॉगड्रम हा तालवाद्यं संस्कृतीविषयीचा आणि ओडिशाचे दिग्दर्शक शिबू पृष्टि यांचा 'द मदरलँड' हा माहितीपट उद्योगांसाठी भूसंपादन करण्यात शेतकरी आणि उद्योगजगतामध्ये होणाऱ्या संघर्षावर भाष्य करत त्यातून मार्ग सुचवण्याचाही प्रयत्न करतो. या दोन्ही दिग्दर्शकांनी आज मिफ्फ दरम्यान घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत, आपल्या माहितीपटांविषयी सांगितले.

नागालँडच्या प्राचीन संस्कृतीत लॉगड्रम या तालवाद्याला विशेष महत्व आहे. लॉगड्रम हे एका उंच झाडाच्या लांब खोडापासून तयार केले जाणारे लांब आणि मोठे तालवाद्य आहे. हे तालवाद्य पूर्वी गावात महत्वाच्या प्रसंगी वाजवले जात असे. गावाला एखाद्या संकटाची वर्दी द्यायची असेल, किंवा मग एखादा सामुदायिक उत्सव, विजय अथवा आनंदाचा प्रसंग असेल, तर अशावेळी हे वाद्य वाजवले जात असे. त्यामुळे नागालँडच्या संस्कृतीत त्याचे विशेष महत्व होते, असे अनंगला यांनी सांगितले.

अलिकडच्या काळात ही वाद्ये तयार होणेच बंद झाले. एक उत्तम तालवाद्य आणि त्याच्याशी निगडित नागा आदिवासी संस्कृती त्यामुळे अस्तंगत झाली. मात्र, जवळपास पन्नास वर्षांनंतर, चांगलागशू इथल्या कोन्याक गावातल्या लोकांनी हे लाँगड्रम वाद्य बनवायचे ठरवले. 1999 साली एका झाडाच्या भल्यामोठ्या खोडावर कोरीव काम करून, त्यांनी सर्वांनी मिळून हाताने हे वाद्य बनवले. हे वाद्य जंगलातून गावात नेण्यासाठी त्यांना पाच दिवस लागले. त्यांनी आपल्या एकत्रित मेहनतीतून ही अस्तंगत झालेली कला आणि तालवाद्य बनवले. या तालुक्यातील एका गटविकास अधिकाऱ्याला ही घटना कॅमेराबद्ध करावी असे वाटले. आणि त्याने ह्या सगळ्या घटनेचे चित्रीकरण करवले. हे चित्रीकरण अनंगला यांना मिळाले असता, त्यांनी त्यावर माहितीपट बनवण्याचे ठरवले. त्यांनी पुन्हा त्या गावात जाऊन गावकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आणि हा माहितीपट बनवला.

चित्रपटांची आपल्याला लहानपणापासूनच आवड होती. मात्र फिल्म डिव्हिजनने नागालँडमध्ये एक कार्यशाळा घेतली होती. त्यात चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाचे तंत्र शिकायला मिळाले. या कार्यशाळेतून प्रेरणा घेऊन आपला चित्रपट निर्मितीचा प्रवास सुरु झाला, असे अनंगला यांनी सांगितले. चित्रपटनिर्मिती सारख्या नव्या क्षेत्रात येण्यासाठी इच्छुक अशा तरुणांसाठी दुर्गम भागात अशा अनेक कार्यशाळा घेतल्या जाव्यात अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. त्यांचा द मेकिंग ऑफ चांगलांशूज न्यू लॉगड्रम हा माहितीपट मिफ्फ च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात निवडण्यात आला आहे.  

देश आधुनिक होत असतांना औद्योगिकरण ही अपरिहार्य घडामोड आहे, मात्र उद्योगांचा विस्तार करण्यासाठी भूमी लागणार. भूसंपादन आणि विस्थापन याविषयीचे संघर्ष देखील त्यातूनच निर्माण होतात. शेतकऱ्यांना आपल्या भूमीचा तुटपुंजा मोबदला मिळतो, त्यांचे पुनर्वसन नीट होत नाही आणि मग शेतकरी किंवा ग्रामीण जनता आणि उद्योजक-सरकार यांच्यात संघर्षांची ठिणगी पडते. या  संघर्षाचे चित्रण दिग्दर्शक शिबू पृष्टि यांच्या 'द मदरलॅंड' माहितीपटातून केले आहे. ओडिशामध्ये देखील हा संघर्ष आहेच. या प्रश्नावर अनेक वर्षांपासून अभ्यास आणि प्रत्यक्ष काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मायाधर नायक यांच्या ‘लँड टू लेट’ या पुस्तकावर आधारलेला हा माहितीपट आहे. विकास आणि शेती-पर्यावरण यातला समतोल साधायचा असेल, तर शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी उद्योजकांना न विकता, त्यांना भाड्याने वापरायला द्याव्यात, यातून उद्योग देखील उभे राहतील आणि शेतकऱ्यांचे नुकसानही होणार नाही, असा तोडगा नायक यांनी सुचवला आहे. एखाद्या प्रश्नासाठी केवळ कोणाला दोष देऊन उपयोग नाही, तर आपल्याला त्यावर तोडगा काढूनच हा प्रश्न सोडवावा लागेल, असा आमचा विचार होता, असे दिग्दर्शक शिबू पुष्टी यांनी सांगितले. ‘द मदरलँड’ हा चित्रपट राष्ट्रीय स्पर्धा गटात निवडला गेला आहे.

 

R.Tidke/R.Aghor/P.Malandkar

 

 



(Release ID: 1601644) Visitor Counter : 182


Read this release in: English