माहिती आणि प्रसारण मंत्रालय

16 व्या मिफ्फ मध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपटांच्या प्रवेशिका येण्यासाठी आणखी प्रयत्न व्हावेत- 16 व्या मिफ्फ दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत ज्युरी सदस्यांनी व्यक्त केली अपेक्षा

Posted On: 02 FEB 2020 6:59PM by PIB Mumbai

मुंबई, 2 फेब्रुवारी 2020

 

मुंबई फिल्म्स डिव्हिजन परिसरात सुरु असलेल्या 16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट स्पर्धा गटासाठीच्या ज्युरी सदस्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या महोत्सवात यंदा अनेक चांगल्या कलाकृती आल्या, मात्र ही संख्या मर्यादित होती, त्यामुळे मिफ्फचा इतिहास आणि व्याप्ती बघता कमी चित्रपटांतून निवड करणे अधिक आव्हानात्मक काम होते, असे मत आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटासाठीच्या ज्युरी समितीचे अध्यक्ष आणि जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक शाजी करून यांनी व्यक्त केले.

या महोत्सवात येणाऱ्या चित्रपटांची निवड अधिक स्वायत्तपणे केली जावी, अधिकाधिक देशातून आलेले चित्रपट देखील समाविष्ट केले जावेत, ज्यातून अनेक दर्जेदार माहितीपट आणि लघुपटांना व्यासपीठ मिळेल, अशी अपेक्षा राष्ट्रीय चित्रपट स्पर्धा गट समितीचे अध्यक्ष आणि कॅनेडियन चित्रपट दिग्दर्शक आणि समीक्षक थॉमस व्हॉ यांनी व्यक्त केली. आम्हाला विविध देशातून आणखी चित्रपट येण्याची अपेक्षा असते, असेही ते म्हणाले.

 या पत्रकार परिषदेला अम्रित गंगर, रॉबर्ट कहेन, उत्पल बोरपुजारी, पेनचो कुंचेव्ह, किरीट खुराना, आणि एक के बीर हे ज्युरी सदस्य उपस्थित होते.

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपटांना जागतिक व्यासपीठ देणारा महत्वाचा महोत्सव आहे, त्याच्या व्याप्तीच्या तुलनेत, प्रवेशिकांची संख्या अधिक अपेक्षित आहे.  चांगल्या कलाकृती तयार होत नाही, असे नाही, मात्र कदाचित कालमर्यादेमुळे असेल किंवा आणखी काही कारणांनी, या कलाकृती, मिफ्फ पर्यंत पोहोचत नाहीत, असे ते म्हणाले. आमच्यासमोर निवडीसाठी फारच कमी कलाकृती होत्या, अशी खंत शाजी करुन यांनी व्यक्त केली.  थॉमस व्हॉ यांनीही हाच मुद्दा पुढे नेत,चित्रपटांच्या निवडीची प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र क्युरेटर असावेत, आणि ही प्रक्रिया वर्षभर सुरु असावी, तरच उत्तमोत्तम चित्रपट निवडले जातील, अशी  सूचना केली. या महोत्सवात सरकारद्वारा प्रायोजित चित्रपट दाखवण्यासोबत स्वतंत्रपणे निवडण्यात आलेल्या चित्रपटांना प्राधान्य दिले जावे, असेही थॉमस यांनी सांगितले.

 हा महोत्सव आयोजित करण्यासाठी फिल्म्स डिव्हिजनला केवळ दोन महिन्यांचा वेळ मिळाला, इतक्या कमी वेळात, संपूर्ण आयोजन आणि प्रवेशिका मागवणे, त्यातून निवड करणे ही सगळी प्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती, असे मत ज्युरी सदस्य आणि ज्येष्ठ ॲनिमेटर किरीट खुराना यांनी यावेळी व्यक्त केले.

 या महोत्सवाच्या आयोजनात पहिल्या वर्षीपासून सहभागी असलेले चित्रपट समीक्षक आणि लेखक-अभ्यासक अम्रित गांगर यांनी देखील महोत्सवाच्या आयोजनात आणि विशेषतः चित्रपट प्रवेशिका आणि निवडीत सुधारणा व्हायला हवी असे मत व्यक्त केले. आयोजकांना कमी वेळ मिळाला, त्यामुळे अनेक चांगल्या कलाकृती महोत्सवात समाविष्ट होऊ शकल्या  नाही. मिफ्फ आशियातील सर्वात जुना आणि माहितीपटांसाठीचा मोठा महोत्सव आहे, त्यामुळे, त्यात सहभागी होण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात, मात्र त्या तुलनेत यंदा फार मर्यादित प्रवेशिका आल्या, असे मत त्यांनीही व्यक्त केले. कमी आणि मर्यादित कलाकृतींमधून पुरस्कारासाठी चित्रपटाची निवड करणे अत्यंत आव्हानात्मक होते, असे ते म्हणाले. या महोत्सवाची प्रसारमाध्यमांनी, विशेषतः मुद्रित प्रसारमाध्यमांनी पुरेशी दखल घेतली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.  हा महोत्सव म्हणजे या क्षेत्रातल्या तरुणांसाठी मोठी कार्यशाळाचं आहे, त्यामुळे तरुणांचा महोत्सवातील सहभाग वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ज्युरी म्हणून काम करताना आलेले अनुभव सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर ए के बीर यांनी सांगितले. अनेक चित्रपट चांगले होते, चांगल्या कलाकृती तांत्रिक आणि सृजनात्मक अशा दोन्ही दृष्टीने ‍परिपक्व केल्या जाऊ शकतात. आपला विषय मांडताना सच्चेपणा आणि निर्भयता असावी असे त्यांनी सांगितले.

भारतात, माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपटांचा आस्वाद आणि समीक्षा याला अधिक महत्व यायला पाहिजे. त्यामुळे चित्रपट क्षेत्र लोकप्रिय असूनही, या कलाकृती तुलनेने दुर्लक्षित राहतात, असा सूर सगळ्याच ज्युरी सदस्यांनी व्यक्त केला.   

या महोत्सवासाठी, कॅनडाचे थॉमस  व्हॉ, बल्गेरियाचे पेंचो कूंचेव्ह. भारताचे ए के बीर, किरीट खुराना आणि उत्पल बोरपूजारी यांनी भारतीय चित्रपट स्पर्धा गटासाठी ज्यूरी म्हणून काम केले आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा गटासाठी ज्यूरी म्हणून अध्यक्ष शाजी करुन,  सिंगापूरच्या रेहिना परेरा, जपानच्या हरूका हम्मा, फ्रांसचे रॉबर्ट काहेन आणि अमित गंगर यांनी काम केले.

या महोत्सवासाठी यंदा राष्ट्रीय स्तरावर विक्रमी 729 चित्रपट तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 24 देशांतून 144 चित्रपट प्रवेशिका आल्या आहेत.

 

R.Tidke/S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

 



(Release ID: 1601653) Visitor Counter : 175


Read this release in: English