माहिती आणि प्रसारण मंत्रालय

16 व्या मिफ्फ दरम्यान महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याशी संबंधित विशेष चित्रपटांचे शो, तसेच मूर्ती निर्मितीतून गांधीजींना श्रद्धांजली अर्पण

Posted On: 02 FEB 2020 8:03PM by PIB Mumbai

मुंबई, 2 फेब्रुवारी 2020

 

मुंबईत फिल्म्स डिव्हिजन इथे सुरु असलेला सोळावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मिफ्फ अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरतो आहे. या महोत्सवातील आणखी एक विशेष बाब म्हणजे, महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त तसेच सुप्रसिद्ध चित्रपटनिर्माते सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून एक विशेष मूर्ती आणि चित्रप्रदर्शन देखील या महोत्सवात फिल्म्स डिव्हिजन च्या परिसरात आयोजित करण्यात आले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अतुल कुमारी तिवारी आणि या महोत्सवाच्या संचालक स्मिता वत्स शर्मा यांनी आज या चित्रप्रदर्शनाला भेट दिली.

यावेळी जे जे चित्रकला आणि शिल्पकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांचे मातीचे शिल्प बनवले. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती सगळीकडे साजरी केली जात आहे, त्यामुळे मिफ्फ मध्येही यावर विशेष फिचर करण्याचे आम्ही ठरवले. या निमित्त आज जे. जे. च्या विद्यार्थ्यांनी ही अप्रतिम कलाकृती तयार करत गांधीजींना आदरांजली वाहिली आहे, असे अतुलकुमार तिवारी यावेळी म्हणाले.

यावेळी गांधीजींच्या जीवनकार्यावर आधारित काही विशेष चित्रपट देखील दाखवण्यात  येत आहे. मणिभवनचे मानद सचिव योगेश कामदार यांच्या हस्ते या विभागाचे आज उद्‌घाटन झाले.  गांधीजींचे अमूल्य योगदान नव्या पिढीला कळण्यासाठी, ह्या विभागातील चित्रपटांची मदत होईल, अशी अपेक्षा अतुलकुमार तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली.  फिम्स डिव्हिजनच्या आर्काइव्हमधून हे चित्रपट निवडण्यात आले आहेत.

हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव केवळ सिनेमा स्क्रिनींगपुरता मर्यादित न ठेवता, त्याच्या माध्यमातून महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न जे. जे. च्या विद्यार्थ्यांनी केला आहे, असे स्मिता वत्स शर्मा यांनी यावेळी सांगितले.

 

R.Tidke/S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1601670) Visitor Counter : 131