संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाची युद्धनौका "आयएनएस जलाश्व" मधून मालदीवमध्ये अडकलेल्या प्रवासी भारतीयांचे कोची येथे आगमन
प्रविष्टि तिथि:
10 MAY 2020 10:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मे 2020
“समुद्र सेतू" अभियानासाठी तैनात असलेली आयएनएस जलाश्व ही युद्धनौका 10 मे रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मालदीव येथे अडकलेल्या महिला, वृद्ध आणि मुले अशा एकूण 698 भारतीय नागरिकांसह कोची बंदरात दाखल झाली. प्रवासाची सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर हे जहाज 08 मे रोजी संध्याकाळी मालदीवहून निघाले होते. कमीतकमी सामाजिक संपर्काद्वारे सुरक्षित प्रवेश निश्चित करण्यासाठी संबंधित चमूने सर्व आवश्यक उपाययोजना केल्या. प्रवासादरम्यान वृद्ध लोक, गरोदर स्त्रिया आणि लहान मुलांची देखील पुरेशी काळजी घेण्यात आली. वैयक्तिक सुरक्षा उपकरणे घातलेल्या भारतीय नौदलाच्या प्रशिक्षित कर्मचार्यांनी सर्व प्रवाशांना हाताळले. सर्व मानक कार्यप्रणाली (एसओपी) आणि भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रवाशांना सुखरूप आणण्यात आले.
कोचिन पोर्ट ट्रस्टच्या क्रूझ टर्मिनल येथे उपस्थित नौदल आणि नागरी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांचे स्वागत केले. क्रूझ टर्मिनलवर कोविड स्क्रीनिंग आणि इमिग्रेशनची औपचारिकता लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून व्यापक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सीमाशुल्क, इमिग्रेशन, पोलिस, आरोग्य विभाग, बीएसएनएल आणि जिल्हा प्रशासनाच्या वैद्यकीय नियमावलीच्या अनुषंगाने टर्मिनलवर काचेचे काउंटर उभारण्यात आले होते. याव्यतिरिक्त, प्रवाश्यांसाठी सामानाच्या ट्रॉलीची व्यवस्था कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (सीआयएएल) कडून करण्यात आली होती, जिचा उद्देश सामान वेगाने उतरवणे, वेगळे करणे आणि सर्व आरोग्य व वैद्यकीय औपचारिकता कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करणे हा होता.
विशाखापट्टणम येथील आयएनएस जलाश्व हे भारतीय नागरिकांच्या अशाच प्रकारच्या सुटकेसाठी आणि प्रमुख मानवी सहाय्य आणि आपत्ती निवारणाच्या भारतीय नौदलाच्या प्रयत्नांमध्ये आघाडीवर होते. हे जहाज सैन्य घेऊन जाण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि सध्या लोकांना मायदेशी परत आणण्याच्या मोहिमेत जहाजातील सुविधांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या मोहिमेसाठी या जहाजावर भारतीय नौदलाचे प्रशिक्षित वैद्यकीय पथक तैनात ठेवले आहेत.
आज पूर्ण करण्यात आलेल्या परतीच्या प्रवासाचा या मोहिमेतील पहिला भाग होता, त्याचाच पुढचा भाग म्हणजे कोचीहून पाठविलेले आयएनएस मगर हे आणखी एक उभयचर जहाज आज 202 भारतीय नागरिकांना घेऊन माले येथून निघाले आहे. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्व आणि मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारतर्फे करण्यात आलेल्या वंदे भारत अभियानाचा हा उपक्रम आहे.


M.Jaitly/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1622891)
आगंतुक पटल : 216