रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
नितीन गडकरी यांच्या हस्ते मणिपूरमध्ये 13 महामार्ग प्रकल्पांची कोनशिला आणि रस्ते सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटन; ईशान्येकडील राज्यांसाठी विकास उपाययोजना जाहीर
ईशान्येकडील राज्ये सरकारची प्राथमिकता: डॉ जितेंद्रसिंग
प्रविष्टि तिथि:
17 AUG 2020 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2020
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मणिपूर येथील 13 महामार्ग प्रकल्पांची कोनशिला ठेवण्याच्या आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये रस्ते सुरक्षा प्रकल्पाचे आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यासाठी केंद्रीय ईशान्य प्रांत विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री डॉ जितेंद्रसिंग, रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंग, मणिपूर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, अनेक खासदार, आमदार आणि केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या प्रकल्पांमध्ये 316 किलोमीटर लांबीचे रस्ते 3000 कोटी रुपये खर्च करुन निर्माण करण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे मणिपूरच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होऊन, रस्त्यांमुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये दळणवळण सुविधा, सुलभता आणि आर्थिक विकास होईल.
याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले, ईशान्येकडील राज्यांमध्ये पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याची पंतप्रधानांची इच्छा लक्षात घेऊन, आम्ही या भागांमध्ये अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. भविष्यात मणिपूरमध्ये अनेक नवीन रस्ते प्रकल्प हाती घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. इम्फाळ येथील प्रगत रस्त्याचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे आणि 2-3 महिन्यांत याच्या कामाची सुरुवात होईल.
नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना रस्ते प्रकल्प तातडीने सुरु करण्यासाठी भूसंपादन आणि त्यासंबंधीची कामे लवकर पूर्ण करण्यास सांगितले. केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) च्या मुद्याविषयी बोलताना ते म्हणाले, राज्यांकडून वापर प्रमाणपत्र मिळाल्यास तातडीने 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
मंत्र्यांनी याप्रसंगी माहिती दिली की, ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांमध्ये ड्रेजिंगचे काम पूर्ण झाले असून जलमार्गाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक करणे आता शक्य आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला अतिरिक्त लाभ मिळण्यासाठी 50-60 किलोमीटरचा हा मार्ग नदीमार्गाला जोडण्याचे त्यांनी सुचवले. ईशान्येकडील प्रांतात सार्वजनिक वाहतुकीच्या इंधनासाठी स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्यायी इंधनाचा वापर करावा, असे ते म्हणाले.
गडकरींनी मणिपूर राज्यात रोजगार आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एमएसएमई क्षेत्राची भूमिका अधोरेखीत केली. एमएमएमई युनिटच्या नुकत्याच केलेल्या विस्तारीत व्याख्येबदद्ल सांगताना ते म्हणाले, हस्तकला, हातमाग, मध, बांबू उत्पादनामध्ये या संधीचा लाभ घेतला तर मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळेल.
ईशान्य प्रांत विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री डॉ जितेंद्रसिंग म्हणाले, आजच्या सोहळ्यातून तीन महत्त्वाचे संदेश मिळाले आहेत. ईशान्य प्रांत सरकारची प्राथमिकता आहे, अनेक अडथळ्यानंतरही या भागातील पायाभूत सुविधांवर काम सुरु आहे, आणि पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन पायाभूत सुविधांसाठी जाहीर केलेल्या 100 लाख कोटी रुपयांच्या घोषणेशी हे सुसंगत आहे.
* * *
M.Iyengar/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1646474)
आगंतुक पटल : 240