पंतप्रधान कार्यालय

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्प दुसरा टप्पा आणि सूरत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

गेल्या दोन दशकामध्ये सूरत आणि गांधीनगर शहरांचा कायापालट झाल्यामुळे नियोजनपूर्वक नागरीकरणाचा लोकांना, विशेषतः युवावर्गाला लाभ: पंतप्रधान

ग्रामीण गुजरातमध्ये घडून आलेले परिवर्तन प्रत्येकाने पाहण्यासारखे: पंतप्रधान

राष्ट्राच्या प्रगतीमध्ये मजबूत एमएसएमई क्षेत्राची महत्वपूर्ण भूमिका: पंतप्रधान

Posted On: 18 JAN 2021 6:47PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुस-या टप्प्याचे आणि सूरत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. दूरदृश्य प्रणालीव्दारे झालेल्या या कार्यक्रमाला गुजरातचे राज्यपाल, केंद्रीय गृह मंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री आणि  केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री उपस्थित होते.

Towards prosperous urban centres in Gujarat. #GujaratMetroRevolution https://t.co/bQH5rM33eU

— Narendra Modi (@narendramodi) January 18, 2021

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी अहमदाबाद आणि सूरत शहरांना मेट्रोची भेट मिळत असल्याबद्दल लोकांचे अभिनंदन केले. व्यावसायिक दृष्टीने दोन्ही शहरे महत्वाची  असल्यामुळे तिथली संपर्क व्यवस्था मेट्रो सुविधेमुळे अधिक  कार्यक्षम बनण्यास मदत होणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अहमदाबाद ते केवडिया या मार्गावर आधुनिक जनशताब्दीच्या सुविधेसह आणखीही नवीन गाड्यांची सोय झाल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातच्या जनतेचे अभिनंदन केले. आज 17 हजार कोटींच्या प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आली आहेत, यावरूनच कोरोना कालावधीतही पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामांनी चांगलाच वेग पकडला आहे, हे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात हजारों कोटींचे प्रकल्प देशाला समर्पित करण्यात आले तसेच नवीन प्रकल्पांचेही काम सुरू झाले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

अहमदाबाद आणि सूरत ही दोन्ही शहरे आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये सर्वात जास्त योगदान देणारी शहरे आहेत, असे सांगून पंतप्रधानांनी अहमदाबादमध्ये पहिल्यांदा ज्यावेळी मेट्रो सुरू झाली, त्यावेळी सर्वजण किती उत्साही होते, प्रत्येकाने आपली स्वप्ने त्या मेट्रो प्रकल्पाबरोबर कशी जोडली होती, याची आठवण  सांगितली. मेट्रोच्या दुस-या टप्प्याचा अहमदाबादच्या जनतेला अधिकच लाभ होणार आहे, कारण यामुळे नवीन विस्तारलेल्या शहरातल्या लोकांसाठी वाहतुकीचे सोईचे साधन मिळणार आहे. उत्तम संपर्क यंत्रणेमुळे लाभ घेता येणार आहे. याचप्रमाणे सूरतमध्येही चांगली संपर्क व्यवस्था विकसित होऊ शकणार आहे. भविष्यातल्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन या प्रकल्पांची आखणी करण्यात आली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

मेट्रोच्या विस्तारीकरणाविषयी मागील सरकारचा आणि आमच्या सरकारच्या मतांमध्ये भिन्नता आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, 2014 च्या पूर्वी 10-12 वर्षात 200 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग तयार करण्यात आला होता. गेल्या सहा वर्षात आम्ही नव्याने तयार केलेल्या 400 किलोमीटर लांबीच्या मार्गावरून आता मेट्रो धावत आहेत. देशातल्या 27 शहरांमध्ये 1000 किलोमीटर लांबीच्या नवीन मेट्रो मार्गांची कामे आम्ही सुरू केली आहेत. पूर्वी सर्वसमावेशक आधुनिक विचारसरणीचा अभाव होता, त्यामुळे अनेक विकास कामे खोळंबली, मेट्रोविषयी समग्र राष्ट्रीय धोरण आधी नव्हते, याविषयी पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. धोरणाअभावी तंत्रज्ञानामध्ये आणि वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो कार्यप्रणालीमध्ये समानताही नव्हती. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, मेट्रो आणि त्या शहरातल्या उर्वरित परिवहन व्यवस्थेबरोबर कोणत्याही प्रकारे संबंध नव्हता. त्याचा परिणाम असा झाला की, शहरातल्या इतर परिवहन व्यवस्थेशी मेट्रो जोडली जात नव्हती, शहरांसाठी  वाहतूक एकात्मिक प्रणाली म्हणून विकसित करण्याचे काम आता केले जात आहे. त्यामुळे मेट्रो इतर वाहतूक सुविधांप्रमाणे सेवा देऊ शकणार आहे. अलिकडच्या काळात सुरू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डव्दारे यापुढे संपूर्ण वाहतुकीचे एकत्रीकरण करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

सूरत आणि गांधीनगर या शहरांचे उदाहरण देताना पंतप्रधान म्हणाले, या दोन्ही शहरवासियांची विचारसरणी केवळ प्रतिक्रिया व्यक्त करीत बसण्याची नाही तर प्रत्यक्ष कामात सक्रिय होण्याची आहे. भविष्यातल्या गरजा लक्षात घेवून ही शहरे कामात सहभागी झाली, याचे विशेष कौतुक वाटते. दोनच दशकांपूर्वी सूरतची ओळख प्लेगसारख्या रोगामुळे होत होती. परंतु सरकारने उद्योजकता समावेशन कार्याला प्रोत्साहन दिले आणि त्याचा लाभ सूरतच्या जनतेने घेतला. आज देशातले सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सूरतचा आठवा क्रमांक आहे. आणि जगातल्या सर्वात वेगाने विकसित होणा-या शहरांमध्ये सूरतचा चैथा क्रमांक आहे. दर दहा हि-यांपैकी 9 हि-यांचे सूरतमध्ये कटिंग आणि पाॅलिशिंग केलेले असते. देशातले 40 टक्के मानवनिर्मित वस्त्र सूरतमध्ये बनते. तर 30 टक्के मानवनिर्मित फायबर याच शहरात तयार केले जाते. आज सूरत हे  देशातले दुस-या क्रमांकाचे स्वच्छ शहर आहे. या शहरातल्या लोकांचे जीवनमान सुकर व्हावे, यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुले, वाहतुकीचे व्यवस्थापन, चांगले रस्ते आणि पूल, सांडपाणी व्यवस्था आणि रूग्णालयांची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. उत्तम नियोजन आणि सर्वंकष विकास करण्याची विचारसरणी यामुळेच हे सगळे करणे शक्य झाले आहे. एम भारत, श्रेष्ठ भारतयांचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सूरत शहर आहे, असे सांगताना पंतप्रधान म्हणाले, देशाच्या सर्व भागातून आलेले उद्योजक आणि कामगार सूरतमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते, असे सांगितले.

याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी गांधीनगरच्या जडणघडणीचा प्रवास कसा सुरू आहे, याची माहिती दिली. गांधीनगरला आधी सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्तांचे, ज्येष्ठांचे शहर असे गांधीनगरला म्हणत होते, आता या शहरामध्ये परिवर्तन होवून ते सळसळत्या उत्साही तरूणांचे जीवंत शहर बनले आहे. गांधीनगर आयआयटी, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, एनआयएफटी, राष्ट्रीय न्यासवैद्यक विज्ञान विद्यापीठ, पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठ, भारतीय अध्यापन शिक्षण संस्था, धीरूभाई अंबानी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान संस्था, एनआयडी, रक्षा शक्ती विद्यापीठ अशा विविध संस्थांमुळे गांधीनगर शहराचा चेहरामोहराच संपूर्णपणे बदलला आहे. आता गांधीनगर शैक्षणिक केंद्र बनले आहे. अनेक कंपन्यांनी विद्यापीठांच्या आवारातच कॅम्पसमुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी महात्मा मंदिराचा उल्लेख करून परिषद -पर्यटनाला चालना देण्यात आल्याचे सांगितले. आधुनिक रेल्वेस्थानक, गिफ्ट सिटी, साबरमती रिव्हर फ्रंट, कांकरिया सरोवर परिसर, वाॅटर एरोड्रोम, बसव्दारे वेगवान वाहतूक सेवा, मोटेरा येथील जगातले सर्वात मोठे स्टेडियम, सहापदरी मार्ग असलेला गांधीनगर महामार्ग यामुळे अहमदाबाद, गांधीनगरची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आपला जुने चांगले व्यक्तित्व सोडून न देता, त्याला कुठेही बाधा न आणतागांधीनगर शहराने आता आधुनिक रूपाचा स्वीकार केला आहे, हे कौतुकास्पद आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

अहमदाबादला जागतिक वारसा शहराचा दर्जा मिळाला असल्याचे नमूद करून पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, धोलेरा येथे नवीन विमानतळ होणार असल्याची माहिती दिली. या विमानतळापासून अहमदाबादला जोडण्यासाठी मोनो-रेल्वे प्रकल्पाला आधीच मान्यता मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले. अहमदाबाद आणि सूरत या शहरांना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईशी जोडणा-या बुलेट ट्रेनचे काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण विकास क्षेत्रामध्ये सरकारने उचललेल्या पावलांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. गेल्या दोन दशकांमध्ये गुजरातमध्ये रस्ते, वीज, पेयजल पुरवठा यांच्यामध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. हा एक गुजरातच्या विकास यात्रेतला सर्वात महत्वाचा काळ मानला जाईल, असे सांगून ते म्हणाले, आज गुजरातचे प्रत्येक गाव संपूर्ण वर्षभर, कोणत्याही हवामानामध्ये रस्ते मार्गाने जोडले गेले आहे. आदिवासींच्या गावांमध्येही चांगले रस्ते आहेत. आज गुजरातमध्ये 80 टक्के घरांमध्ये पिण्याच्या पाण्याचे नळ आहेत. राज्यातल्या 10 लाख लोकांना जलजीवन मिशनमध्ये पेयजल पुरविण्यात आले आहे. लवकरच राज्यातल्या प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी दिले जाईल.

त्याचबरोबर सरदार सरोवर सौनी योजना आणि वाॅटर ग्रिड नेटवर्क यामुळे  कोरडवाहू भूमीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या कामाला वेग आला आहे. नर्मदेचे पाणी आता कच्छपर्यंत पोहोचले आहे. सूक्ष्म सिंचनाची कामे पूर्ण झाली आहेत. वीज पुरवठा ही एक वेगळीच यशोगाथा आहे. सौर ऊर्जा क्षेत्रात गुजरात आघाडीवर आहे. अलिकडच्या काळातच कच्छमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्वोदय योजनेअंतर्गत सिंचनासाठी स्वतंत्र वीज पुरवठा उपलब्ध करून देणारे गुजरात हे देशातले पहिले राज्य आहे.

आयुष्मान भारत यासारख्या योजनांचा गुजरातमधल्या 21 लाख लोकांना लाभ झाला आहे, अशी पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली. राज्यात 500 पेक्षा जास्त जनऔषध केंद्रांच्या माध्यमातून स्थानिक रूग्णांना औषधांची विक्री केली जाते. त्यामुळे सुमारे 100 कोटी रुपये स्थानिक रुग्णांचे वाचले आहेत. तसेच राज्यात 2.5 लाखांपेक्षा जास्त परिवारांना प्रधानमंत्री घरकूल योजनेचा लाभ झाला आहे. स्वच्छ भारत मोहिमेमध्ये राज्यात 35 लाखांपेक्षा जास्त शौचालये बांधण्यात आली आहेत, असेही यावेळी पंतप्रधानांनी सांगितले.

भारत सरकार अतिशय धाडसी निर्णय घेत असून त्यांची अंमलबजावणीही तितक्याच ठामपणाने, धैर्याने केली जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारताने काही एवढीच कामगिरी केली असे नाही, तर जगातला सर्वात उंच, मोठा पुतळा उभा केला, जगातली सर्वात मोठी परवडणारी घरकूल योजना सुरू केली, आरोग्य सेवा हमी कार्यक्रम सुरू केला, सहा लाख खेड्यांना इंटरनेटने जोडण्यात आले. इतकेच नाही तर, अलिकडेच जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे.

हाजिरा आणि घोघा यांच्या दरम्यान रो-पॅक्स फेरी सेवा सुरू केल्याचे नमूद करून पंतप्रधानांनी गिरनार रोप-वे सेवेची माहिती दिली. ही दोन्ही उदाहरणे म्हणजे कोणत्याही योजनेच्या घोषणेनंतर किती वेगाने काम करून अंमलबजावणी केली जाते, हे स्पष्ट करतात, असेही त्यांनी सांगितले. हाजिरा ते घोघा फेरीमुळे या दोन्हीतले  375 किलोमीटरचे अंतर 90 किलोमीटरपर्यंत कमी झाले आहे. या सेवेचा दोन महिन्यात 50 हजार लोकांनी लाभ घेतला. तर फेरीने आत्तापर्यंत 14 हजार वाहने नेण्यात आली. यामुळे या भागातल्या शेतकरी बांधवांना आणि पशूपालकांनाही मदत झाली आहे. त्याचप्रमाणे गिरनार रोप-वेचा उपयोग अडीच महिन्यात दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी केला आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकांच्या गरजा आणि आकांक्षा समजून घेवून वेगाने कार्य केले तर नवभारताचे उद्दिष्ट साध्य करता येणार आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. या दिशेने एक पाऊल म्हणून मोदी यांनी प्रगतीकार्यप्रणाली आपण तयार केली असल्याचे सांगितले. या पद्धतीने काम केल्यामुळे देशात कामाच्या अंमलबजावणीची संस्कृती रूजत असून प्रगतीने वेग आला आहे. यामध्ये विकास कामामधील भागधारकांबरोबर थेट संवाद साधला जातो आणि समस्यांचे निराकरण केले जाते, असे सांगितले. गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या सरकारने 13 लाख कोटींच्या प्रकल्पांचा आढावा प्रगतीच्या माध्यमातून घेतला असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.

प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेल्या योजना पूर्ण करण्यावर भर दिला तर सूरतसारख्या शहरांना नव्याने ऊर्जा, बळ मिळणार आहे, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आपल्याकडचे  उद्योग, विशेषतः लघुउद्योग, एमएसएमईला चांगला पाठिंबा मिळाला आणि चांगल्या पायाभूत सुविधा मिळाल्या तर आपण जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत अव्वल ठरणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत लहान उद्योगांना मदत मिळण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. गेल्या काही महिन्यातल्या कठीण काळामध्ये सर्वांना मदत म्हणून हजारो कोटींची कर्जे दिली आहेत. त्यांना मोठ्या संधी दिल्या जात आहेत. सरकारने अनेक बंधने शिथिल केली आहेत. व्यापार, उद्योगांना नवीन मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. सेवा क्षेत्रात नवीन संधी निर्माण केल्या आहेत. एमएसएमईला सरकारी खरेदीतही प्राधान्य देण्यात येत आहे. लहान उद्योगांच्या भरभराटीसाठी संधी निर्माण करून देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी संगितले. यामुळे लहान क्षेत्रातल्या कामगार वर्गाला चांगल्या सुविधा आणि चांगले जीवन मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

M.Iyengar/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1689745) Visitor Counter : 15