रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

गडकरी यांनी भारताच्या प्रथम श्रेणी-विभाजीत शहरी द्रुतगती मार्गाच्या (द्वारका द्रुतगती मार्ग)  प्रगतीचा आढावा घेतला

Posted On: 04 MAR 2021 6:58PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज भारताच्या प्रथम श्रेणी-विभाजीत शहरी द्रुतगती मार्ग, द्वारका द्रुतगती मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग- 248बीबी) प्रगतीचा आढावा घेतला. गडकरी यांनी आज लोकप्रतिनिधी आणि माध्यमांसह द्वारका द्रुतगती मार्गाची पाहणी केली. भारतमाला प्रकल्पांतर्गत आणि 8,662 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारा हा 29 किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग पुढील वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर पूर्ण होईल अशी आशा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. हा भारतातील पहिला उन्नत शहरी द्रुतगती मार्ग असेल आणि यामुळे दिल्ली-एनसीआरमधील वायू प्रदूषण कमी करण्यात मोठ्या प्रमाणात मदत होईल, असे मंत्री म्हणाले. प्रकल्पाच्या पाहणीनंतर वार्ताहरांशी चर्चा करताना गडकरी म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण समोर ठेउनच या प्रकल्पातच 12,000 झाडांचे वृक्षारोपणाचे काम हाती घेतले आहे, अशाप्रकारे वृक्षारोपण होणारा द्वारका द्रुतगती मार्ग हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. या अनुभवाच्या आधारे ही पद्धत संपूर्ण देशात राबविली जाईल,असे ते पुढे म्हणाले. 

राष्ट्रीय महामार्ग -8 चा दिल्ली-गुरुग्राम विभाग, जो सुवर्ण चतुर्भज (जीक्यू) च्या दिल्ली-जयपूर-अहमदाबाद-मुंबईचा भाग असून सध्या या मामार्गावर तीन लाखाहून अधिक प्रवासी गाड्यांची वाहतूक होते जी या 8 पदरी महामार्गाच्या क्षमतेपेक्षा अधिक आहे, यामुळे या महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होते. द्वारका द्रुतगती मार्ग प्रकल्प तयार झाल्यास राष्ट्रीय महामार्ग -8 वरील रहदारी 50 ते 60 टक्क्यांनी कमी होईल असे मंत्री म्हणाले.

हा प्रकल्प अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असल्याने एकदा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो भारताच्या अभियांत्रिकीच्या कुतूहलाचा विषय असेल असे मंत्री म्हणाले. यामध्ये भारतातील सर्वात लांब (6.6 किलोमीटर) व रुंद (8 मार्गिका) शहरी मार्ग बोगदा असेल.

यात 6- पदरी सर्व्हिस रोडसह एकेरी आधारासह 9 कि.मी. लांबीच्या 8-पदरी उड्डाणपुलाचा समावेश आहे. 22 मार्गिका असलेल्या टोल प्लाझासह संपूर्ण स्वयंचलित टोलिंग प्रणाली असेल. संपूर्ण प्रकल्प इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम (आयटीएस) ने सुसज्ज असेल. या प्रकल्पात एकूण दोन लाख मेट्रिक टन पोलाद वापरले जाईल असा अंदाज आहे, जे आयफेल टॉवरच्या 30 पट आहे. 20 लाख सीयूएम कॉंक्रिट लागणार असून हे बुर्ज खलिफा इमारतीच्या सहा पट आहे.

***

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702522) Visitor Counter : 211


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi