राष्ट्रपती कार्यालय

जागतिक स्तरावर भारत तळपत राहावा यासाठी आपले योगदान देण्याची आपणा सर्वांची जबाबदारी : राष्ट्रपती राम नाथ कोविंद


राष्ट्रपतींच्या उपस्थितीत वेल्लोर इथल्या तिरूवल्लूवर विद्यापीठाचा 16 वा वार्षिक पदवीदान समारंभ संपन्न

Posted On: 10 MAR 2021 3:10PM by PIB Mumbai

 

जागतिक स्तरावर भारत तळपत राहावा यासाठी आपले योगदान देण्याची आपणा सर्वांची जबाबदारी असल्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी म्हटले आहे. वेल्लोर इथल्या तिरूवल्लूवर विद्यापीठाच्या  16 व्या वार्षिक पदवीदान समारंभात ते आज बोलत होते.

ग्रामीण आणि वंचित वर्गापर्यंत भारताच्या उच्च शिक्षण प्रणालीचा विस्तार  होणे ही मोठी समाधानाची बाब  असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. या प्रक्रियेमध्ये ही  प्रणाली जगातली सर्वात मोठी तिसरी प्रणाली ठरली आहे. मात्र आपल्याला अधिक उंची गाठायची असेल तर यावरच समाधान न मानता आपल्याला वेगाने काम करायला लागेल असे त्यांनी सांगितले .

ब्रिटीश काळापूर्वी भारताची समृध्द शिक्षण व्यवस्था  होती. ही व्यवस्था म्हणजे सुंदर वृक्ष असल्याचे गांधीजीनी म्हटले होते.ब्रिटीश  राज्यकर्त्यांनी सुधारणेच्या नावाखाली या वृक्षाची तोड केली.या कठोर बदलातून बाहेर पडून आपल्याला  आपला वारसा पुन्हा प्राप्त करायचा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे या दृष्टीने टाकलेले  सुनियोजित आणि निर्णायक पाऊल असून यामध्ये समाजाच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच वैयक्तिक विकासाचा भाग म्हणून बालके आणि युवकांना शिक्षण देण्याच्या पद्धतीत परिवर्तन घडवण्याचा समग्र दृष्टीकोन आहे असे ते म्हणाले.

समृध्द आणि स्वयंपूर्ण राष्ट्र घडवण्यासाठी काय आवश्यकता आहेत याचा विचारही नव्या शैक्षणिक धोरणात केला असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. यासाठी न्याय्य,कौशल्य आणि सबलीकरण यांनी उच्च शिक्षण प्रणाली युक्त असली पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ही सर्व उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने आखण्यात आले आहे. उच्च शिक्षण संस्थांनी  देशाला ज्ञान विस्ताराकडे आणि आर्थिक विकासाकडे  नेले पाहिजे असे सर सी व्ही रमण यांनी म्हटले आहे.नव्या धोरणात हेच लक्ष्य आहे असे त्यांनी सांगितले.

स्थापना झाल्यापासून दोन दशकांच्या अल्प कालावधीत तिरुवल्लुवर  विद्यापीठ हे देशातले नामांकित विद्यापीठ म्हणून उदयाला आल्याचे ते म्हणाले. नामांकित विद्यापीठ म्हणून  बहरलेली ही संस्था विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत असून यामधले बरेच विद्यार्थी हे आर्थिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास भागातून आले आहेत. सामाजिक दृष्ट्या आव्हानात्मक क्षेत्रातल्या महिलांचाही यात समावेश आहे. विद्यापीठात 65 टक्के  महिला विद्यार्थी असल्याबद्दल त्यांनी संतोष व्यक्त केला. आपल्या कन्या आणि भगिनी सर्व अडथळे मोडून सर्वच क्षेत्रात यश प्राप्त करत असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. शैक्षणिक सर्वोत्कृष्टतेसाठीच्या   सुवर्णपदकाच्या आजच्या 66  मानकऱ्यांमध्ये 55 महिला आहेत यावरूनच हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. आज प्रदान करण्यात आलेल्या 217 डॉक्टरेट पदवीधारकांपैकी 100 महिला आहेत.भारताचे उज्वल भविष्य यातून प्रतीत होत आहे.आपल्या देशाच्या महिला जेव्हा शिक्षण घेतात तेव्हा आपले भविष्य सुरक्षित करण्या बरोबरच त्या संपूर्ण देशाचे भविष्य सुरक्षित करत असतात असे राष्ट्रपतींनी सांगितले.

जागतिक स्तरावर भारत तळपत राहावा यासाठी आपले योगदान देण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी आपल्याला संधीही आहे. सलोख्याने एकत्र राहतानाच निसर्गाची जोपासनाही कशी करावी याचा वस्तूपाठ आपला देश जगाला देऊ शकतो.भारत अधिक आर्थिक विकास साध्य करत असून जगाला आपल्याविषयी अधिक जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे. यापैकी प्रत्येक जण भारताच्या या गाथेचा नवा अध्याय लिहिण्यासाठी  समर्थ असून यासाठी आवश्यकता आहे ती योग्य आकांक्षेची, असेही राष्ट्रपतींनी सांगितले. 

 

राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा

 

Jaydevi PS/N.Chitale/P.Kor

 

Follow us on social media: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1703764) Visitor Counter : 182