उपराष्ट्रपती कार्यालय
खासदारांनी एकात्म व सर्वसमावेशक भारतासाठी बोलावे व कार्य करावे असे राज्यसभा अध्यक्षांचे प्रतिपादन
सरकारवरील टीका ही माहितीपूर्ण व विश्वसनीय असावी, टीकेसाठी टीका करू नये, नायडूंचे प्रतिपादन
Posted On:
13 MAR 2021 4:03PM by PIB Mumbai
सदनाच्या कामकाजात बदल घडवून आणून प्रभावी संसदपटू या नात्याने देशाला घडवण्यासाठी वापरायच्या बारा युक्त्यांची राज्यसभा अध्यक्ष वैंकय्या नायडू यांनी आज सदनातील नवनिर्वाचित सदस्यांना मीहिती दिली. राज्यसभेतील नवनिर्वाचित सदस्यांच्या दोन दिवसीय परिचय सत्राचे उद्घाटन करताना सदनातील व बाहेरील वर्तणूकीबाबत नायडूंनी या सदस्यांना समुपदेशन केले.
सध्याच्या सरकारवरील टीका ही माहितीपूर्ण व विश्वसनीय असावी टीकेसाठी टीका म्हणून करू नये यावर नायडूंनी भर दिला. विरोधी पक्षीयांना सरकारवर टीका करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. खरे म्हणजे ते त्यांचे कर्तव्यच आहे. पण टीका ही माहितीपूर्ण असावी तरच ती विश्वासार्ह असते. सरकारच्या प्रत्येक निर्णयावर टीकेसाठी टीका करणे म्हणजे त्या विश्वासार्हतेला नख लावण्यासारखेच आहे, असे नायडू यावेळी म्हणाले.
देशाला घडवण्यासाठी देशातील परिस्थितीचे योग्य ज्ञान आधी मिळवले पाहिजे असे नायडूनी या सदस्यांना सांगितले. जात, रंग, प्रांत, धर्म यावरून फूट पाडणाऱ्या प्रयत्नांवर मात करून आपल्या बहुविधा सांस्कृतिक समाजाची सर्वसमावेशकता आणि एकता राखणे व ती अधिक दृढ करणे हे तुमचे कर्तव्य आहे अशी जाणीव नायडू यांनी या सदस्यांना करून दिली. आशादायी, उभरत्या, सक्षम आणि एकात्म असलेल्या भारताचे प्रतिनिधी म्हणून तुमच्यापैकी प्रत्येकाने झेप घेतली पाहिजे अशी अपेक्षा नायडू यांनी यावेळी व्यक्त केली.
सदनातील वेळ व्यवस्थापन हे एक आव्हान असते असे सांगून नायडू यांनी मुद्दा मांडण्यास वेळ किती घेतला याला महत्व नसून त्याचा आशय आणि मांडणीतील दृष्टीकोन महत्वाचा असे स्पष्ट केले.
देशातील संसद सदस्यांच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत देशातील जनतेमध्ये एक प्रकारची नकारात्मकता वाढीस लागली आहे यावर चिंता व्यक्त करत नायडू यांनी सदस्यांना ते वर्षानुवर्षे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहाय्यभूत ठरलेली आणि त्यातून सुधारत गेलेली कार्यपद्धती व नियम त्यांना बाध्य असल्याचीही जाणीव करून दिली. कोणत्याही आकस्मिक परिस्थितीसाठी हे नियम दिशादर्शक ठरतात असेही त्यांनी सांगितले.
नियम आणि परंपरांप्रमाणे सदनात आपले अधिकार बजावणे हा सदस्यांचा अधिकार असल्याचे सांगत पीठासिन अधिकारी या अधिकारांचे रक्षण करतात. अंतिमतः अध्यक्षांच्या निर्णयाशी बांधिलकी असणे हे सदनातील सदस्यांच्या हिताचेच असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
घटनेतील तरतूदी व तत्वे देशाच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनासाठी मार्गदर्शक असतात तशीच ती सदस्यांना कामकाजातही मार्ग दाखवतात म्हणून ती समजून घ्यावी असा आग्रह नायडूंनी सदस्यांना केला. राज्यसभेची गरज व भूमिका यांचे महत्व समजून घेण्याची त्याबाबत माहिती मिळवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचे लोकसभा व राज्यसभा यांच्यातील सुसंवादी कामकाज व देशांच्या प्रगतीबाबत सामायिक दृष्टीकोन समजून घेण्याची आवश्यकताही त्य़ांनी व्यक्त केली.
देशाच्या सार्वजनिक जीवनात कायदेमंडळाचे सदस्यत्व मिळणे ही मोठी गोष्ट आहे आणि भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश करण्यापेक्षाही ते कठीण आहे याची जाणीव करून देत या नवनिर्वाचित सदस्यानी प्रभावी संसदपटू म्हणून स्वतःला घडवत देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याची जी संधी मिळाली आहे तिचा वापर करावा असा सल्ला नायडू यांनी दिला
राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, राज्यसभेचे नवनिर्वाचित सदस्य, सरचिटणीस देशदीपक वर्मा, सचिव पी पी के रामचर्यालू आणि राज्यसभा सचिवालयाचे वरिष्ठ अधिकार यावेळी उपस्थित होते.
****
Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1704586)
Visitor Counter : 237