पंतप्रधान कार्यालय

डॉ. हरेकृष्ण महताब यांच्या ‘ओदिशा इतिहास’ च्या हिंदी आवृत्तीचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन


‘उत्कल केसरी’ यांच्या अमुल्य योगदानाचे केले स्मरण

स्वातंत्र्य लढ्यातील ओदिशाच्या योगदानाला केले नमन

इतिहास हा जनतेसमवेत विकसित होतो, विदेशी वैचारिक प्रक्रियेने राजवंश आणि राजमहाल यांच्या कथांचे इतिहासात रूपांतर केले – पंतप्रधान

ओदिशाचा इतिहास संपूर्ण भारताच्या ऐतिहासिक सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतो- पंतप्रधान

Posted On: 09 APR 2021 4:57PM by PIB Mumbai

 

उत्कल केसरीडॉ हरेकृष्ण महताब यांनी लिहिलेल्या ओदिशा इतिहासया पुस्तकाच्या हिंदी अनुवादाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाशन केले. ओडिया आणि इंग्लिश भाषेत उपलब्ध असलेल्या या पुस्तकाचा हिंदी अनुवाद शंकरलाल पुरोहित यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि कटक लोकसभा मतदारसंघाचे खासदार भर्तृहरी महताब यावेळी उपस्थित होते.

सुमारे दीड वर्षापूर्वी देशात उत्कल केसरीडॉ हरेकृष्ण महताब यांची 120 वी जयंती साजरी करण्यात आली याचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केले. ओदिशाचा वैविध्यपूर्ण आणि सर्व समावेशक इतिहास देशातल्या जनतेपर्यंत पोहोचणे महत्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्य लढ्यातील डॉ महताब यांच्या योगदानाचे स्मरण करत समाज सुधारणांसाठी त्यांच्या संघर्षाची त्यांनी प्रशंसा केली. ज्या पक्षाअंतर्गत  ते मुख्यमंत्री झाले त्याच पक्षाला विरोध करत आणीबाणीच्या काळात डॉ महताब यांनी तुरुंगवास स्वीकारला याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. स्वातंत्र्य आणि देशाची लोकशाही अशा दोन्हींसाठी त्यांनी तुरुंगवास स्वीकारलाअसे पंतप्रधान म्हणाले.

भारतीय कॉंग्रेसच्या इतिहासात आणि ओदिशाचा इतिहास राष्ट्रीय मंचावर नेण्यात डॉ महताब यांची महत्वाची भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली. त्यांच्या योगदानामुळे ओदिशात संग्रहालय,पुराभिलेख आणि पुरातत्व विभाग शक्य झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

इतिहासाच्या अधिक व्यापक अभ्यासाच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. इतिहास हा केवळ गतकाळातला धडा असता कामा नये तर तो भविष्यासाठीचा आरसा असला पाहिजे. आझादी का अमृत महोत्सवसाजरा करताना आणि आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास साकारताना देश याकडे विशेष लक्ष पुरवत आहे.स्वातंत्र्य लढ्यातल्या अनेक महत्वाच्या घटना आणि कथा योग्य त्या स्वरुपात देशासमोर आल्या नसल्याबद्दल पंतप्रधानांनी खंत व्यक्त केली. भारतीय परंपरेत इतिहास हा केवळ राजे -रजवाडे यांच्यापुरताच मर्यादित नाही. हजारो वर्षापासून इतिहास हा जनतेससमवेत विकसित झाला. राजघराणी आणि राजवाडे यांच्या कथा इतिहासात परावर्तीत करणे ही विदेशी विचार प्रक्रिया असल्याचे ते म्हणाले.आपण मात्र अशा वर्गात मोडत नाही असे सांगून त्यांनी उदाहरणादाखल रामायण आणि महाभारताचा दाखला दिला ज्यामध्ये जनतेची मोठी वर्णने आहेत. आपल्या जीवनात सामान्य जनता केंद्रस्थानी असते असेही ते म्हणाले.

पाईका बंड, गंजम बंड ते संबळपूर संघर्ष या सारख्या संघर्षांनी ओदिशाच्या भूमीने, ब्रिटीशांच्या सत्तेविरोधातल्या बंडाची आग धगधगती ठेवली हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. संबळपूर आंदोलनातले सुरेंद्र साई हे आपणा सर्वांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत. पंडित गोपबंधू, आचार्य हरिहर, डॉ हरेकृष्ण महताब यासारख्या नेत्यांच्या बहुमोल योगदानाचे स्मरण पंतप्रधानांनी केले. रमादेवी, मालतीदेवी, कोकिळा देवी आणि राणी भाग्यवती यांच्या योगदानालाही पंतप्रधानांनी नमन  केले. आपली देशभक्ती आणि शौर्याने  ब्रिटीशाना सळो की पळो करणाऱ्या आदिवासी समाजाच्या योगदानाचेही त्यांनी स्मरण केले. छोडो भारत आंदोलनातले महान आदिवासी नेते लक्ष्मण नायक जी यांचे स्मरणही यांनी केले.

ओदिशाचा इतिहास संपूर्ण भारताच्या ऐतिहासिक सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतो. इतिहासातले हे सामर्थ्य वर्तमान आणि भविष्यातल्या संधींशी जोडले गेले असून आपल्याला मार्गदर्शक  ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रासाठी पहिली गरज असते ती पायाभूत सुविधांची असे सांगून ओदिशामध्ये हजारो किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आणि किनारी महामार्ग बांधले जात  असून यामुळे राज्याच्या विविध भागात कनेक्टीव्हिटी साठी मदत होणार आहे. गेल्या 6-7 वर्षात शेकडो किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग राज्यात विकसित करण्यात आले आहेत.पायाभूत सुविधानंतर उद्योगाकडेही लक्ष पुरवण्यात येत आहे. या दिशेने उद्योग आणि कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यात तेल आणि पोलाद या क्षेत्रात विशाल शक्यता लक्षात घेऊन हजारो कोटी रुपये गुंतवण्यात येत आहेत.त्याचबरोबर नील क्रांतीच्या माध्यमातून ओदिशातल्या मच्छिमार बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.

कौशल्य विकास क्षेत्रातल्या प्रयत्नांबद्दलही  त्यांनी माहिती दिली. राज्यातल्या युवा वर्गासाठी आयआयटी भुवनेश्वर, आयआयएसईआर बेहरामपूर, भारतीय कौशल्य विकास संस्था, आयआयटी संबळपूर यासारख्या संस्थांचा पाया घालण्यात आल्याचे ते म्हणाले.

ओदिशाचा इतिहास  जगाच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. आझादी का अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने जन  चळवळ करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच  ही चळवळ तशीच ऊर्जा जनमानसात निर्माण करेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Launching Hindi version of ‘Odisha Itihaas.’ https://t.co/3nWAqOYMby

— Narendra Modi (@narendramodi) April 9, 2021

***

M.Chopade/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1710683) Visitor Counter : 213