आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आपत्कालीन परिस्थितीत स्पुटनिक-व्ही लसीच्या मर्यादित वापराला राष्ट्रीय नियमकाकडून मंजुरी
Posted On:
13 APR 2021 4:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021
केंद्र सरकार कोविड-19 शी लढा देण्यासाठी पुढाकाराने संपूर्ण जबाबदारी उचलून विचारपूर्वक आणि वेळेपूर्वी पावले टाकत आहे. यामध्ये टाळेबंदी, सर्वेक्षण, चाचण्या, कोविड-उचित वर्तन आणि लसीकरण या पैलूंवर भर देण्यात येत आहे. 16 जानेवारी 2021 पासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरु आहे. आपत्कालीन परिस्थितीतील वापरासाठी अधिकृत (EUA) म्हणून दोन लसींना राष्ट्रीय नियामक- म्हणजेच भारतीय औषध महानियंत्रकांकडून (DCGI) या पूर्वी मंजुरी मिळाली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली 'कोव्हीशील्ड' आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने तयार केलेली 'कोव्हॅक्सिन' या त्या दोन लसी आहेत . तसेच, देशात इतर अनेक लसी, विकसनाच्या विविध टप्प्यांवर आहेत.
रशियाच्या 'मेसर्स गामालेया इन्स्टिट्यूट' या संस्थेने विकसित केलेल्या गॅम-कोव्हिड-व्हॅक अर्थात स्पुटनिक-व्ही या लसीच्या आयात आणि विपणनासाठी तसेच आपत्कालीन वापरासाठी भारतातील 'मेसर्स डॉ.रेड्डीज लॅबोरेटरीज लि.(M/s DRL)' या कंपनीने अर्ज केला होता. विविध रोगकारक सूक्ष्मजीवांविरोधात उपयोगी पडणाऱ्या गॅम-कोव्हिड-व्हॅक या लसीचे घटक एक व घटक दोन, रशियाच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय संशोधन केंद्राने विकसित केले आहेत. जगभरातील तीस देशांमध्ये या लसीला मंजुरी मिळाली आहे.
भारतात या लसीची आयात करून विपणन करण्याच्या दृष्टीने नियामकांची मंजुरी मिळवण्याकरिता मेसर्स डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडने (M/s DRL) रशियाच्या त्या संस्थेशी सहकार्य करार केला आहे. सदर लसीची प्रतिकारशक्तीविषयक सुरक्षितता आणि परिणामकारकता याविषयी केलेल्या चाचण्यांचे निकाल लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध कारण्यात आले आहेत.
M/s DRL ला, देशात टप्पा दोन/ तीन च्या क्लिनिकल चाचण्या करण्याची परवानगी देण्यात आली होती. या चाचण्यांतून मिळत असलेल्या माहितीचा अंतरिम अहवाल कंपनीने सादर केला आहे. नियामकांकरवी होत असलेल्या जलद उपाययोजनेचा एक भाग म्हणून, या माहितीचे सातत्याने परीक्षण होत असते. यासाठी रोगप्रतिकारशास्त्र, श्वसनसंस्थाशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, औषधशास्त्र, बालरोगशास्त्र इत्यादी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना सहभागी करून घेतले जाते.
या विषयी तज्ज्ञ समितीने विविध महत्त्वपूर्ण बाबींवर विचारविनिमय केला. यात सुरक्षितता, वयोगट, मात्रांचे वेळापत्रक, पूर्वकाळजी, साठवण, धोक्याचे इशारे, दुष्परिणाम अशा अनेक मुद्द्यांचा समावेश होता. रशियात या लसीला मिळालेली मंजुरी आणि तेथील परिस्थिती यांचाही या समितीने सखोल अभ्यास केला. कंपनीने भारतात केलेल्या अभ्यासावरून सादर केलेला अहवाल आणि रशियातील तिसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल चाचण्यांचे अहवाल परस्परांशी सुसंगत असल्याचे समितीने म्हटले आहे.
अशाप्रकारे सविस्तर विचारविनिमय केल्यानंतर, या लसीचा आपत्कालीन परिस्थितीत मर्यादित वापर करण्यास मंजुरी देण्याची शिफारस या समितीने केली.
अठरा वर्षांवरील व्यक्तींमध्ये कोविड-19 रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी या लसीचा उपयोग होईल. एकवीस दिवसांच्या अंतराने प्रत्येकी 0.5 मिलीच्या दोन मात्रा, स्नायूंमध्ये टोचून ही लस देणे आवश्यक आहे (दिवस 0- पहिला घटक, दिवस 21- दुसरा घटक). ही लस उणे 18° सेल्सिअस तापमानात साठवली पाहिजे. या लसीचे दोन घटक असून त्यांत अदलाबदल होता कामा नये. काळजीपूर्वक विचार करून या समितीच्या शिफारशी भारतीय औषध महानियंत्रकांनी स्वीकारल्या आहेत. आता मेसर्स डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड देशात या लसीची आयात करेल.
Jaydevi PS/J.Waishampayan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711464)
Visitor Counter : 489