रेल्वे मंत्रालय

शतकातून एखाद्याच वेळेस सामना कराव्या लागणाऱ्या अभूतपूर्व  आव्हानाला तोंड देत 20 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी 76 टँकर्स मधून वैद्यकीय वापरासाठीचा 1125 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन पोहोचविण्यासाठीचा प्रवास पूर्ण केला


सध्या 7 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्या वैद्यकीय वापरासाठीचा 422 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन भरलेल्या  27 टँकर्सची वाहतूक करण्यासाठी विविध मार्गावरून धावत आहेत

हरियाणासाठीच्या चौथ्या आणि पाचव्या ऑक्सिजन ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांद्वारे मिळणार ओरिसातील अंगुल आणि रुरकेला येथून आणलेला वैद्यकीय वापरासाठीचा 72 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन

गुजरातमधील हापा येथून आणखी एक ऑक्सिजन एक्स्प्रेस 85 टन द्रवरूप ऑक्सिजन घेऊन निघाली असून एनसीआर विभागाला ऑक्सिजन पुरविण्यासाठी लवकरच गुरगावला पोहोचेल

हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि दिल्ली या राज्यांच्या दिशेने जाणाऱ्या ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्याचे  मार्गक्रमण सुरु

Posted On: 03 MAY 2021 3:27PM by PIB Mumbai

 

मार्गातील सर्व अडथळ्यांवर  मात करीत आणि नवे मार्ग शोधत, भारतीय रेल्वे देशातील विविध राज्यांना वैद्यकीय वापरासाठीचा द्रवरूप ऑक्सिजन पोहोचवित कोरोनामुळे ओढवलेल्या संकटातून त्यांना काहीसा सुटकेचा दिलासा देत आहे. भारतीय रेल्वेने आतापर्यंत देशभरातील अनेक राज्यांमध्ये 76 टँकर्स मधून वैद्यकीय वापरासाठीचा 1125 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन पोहोचविला आहे. 20 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी त्यांचा प्रवास पूर्ण केला असून आणखी 7 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्या वैद्यकीय वापरासाठीचा सुमारे 422 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन भरलेल्या 27 टँकर्सची वाहतूक करीत आहेत. द्रवरूप ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या सर्व राज्यांना शक्य तितक्या कमी वेळात जेवढ्या जास्त प्रमाणात ऑक्सिजन पोहोचविता येईल तेवढ्या ऑक्सिजनची वाहतूक करण्याचा प्रयत्न भारतीय रेल्वे करीत आहे.

दिल्लीसाठी निर्धारित तिसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस वैद्यकीय वापरासाठीचा 120 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन घेऊन निघाली असून ही गाडी 4 मे 2021 ला दिल्लीला पोहोचेल असा अंदाज आहे.

तेलंगणा राज्यासाठीची दुसरी ऑक्सिजन एक्स्प्रेस अंगुल येथून  वैद्यकीय वापरासाठीचा 60.23  मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन घेऊन येईल.

हरियाणासाठीच्या चौथ्या आणि पाचव्या ऑक्सिजन ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांद्वारे ओरिसातील अंगुल आणि रुरकेला येथून हरियाणाला वैद्यकीय वापरासाठीचा 72 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन मिळणार आहे.

गुजरातमधील हापा येथून आणखी एक ऑक्सिजन एक्स्प्रेस 85 टन द्रवरूप ऑक्सिजन घेऊन निघाली असून एनसीआर विभागाला ऑक्सिजन पुरविण्यासाठी ही गाडी लवकरच गुरगावला पोहोचेल.

मध्य प्रदेशासाठीच्या चौथ्या आणि उत्तर प्रदेशासाठीच्या दहाव्या ऑक्सिजन एक्स्प्रेससह तेलंगणा, हरियाणा तसेच दिल्लीसाठी  वैद्यकीय वापरासाठीचा 422.08 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन घेऊन येणाऱ्या आणखी 7 गाड्यांचा प्रवास सुरु आहे.

भारतीय रेल्वेने, आतापर्यंत, महाराष्ट्र (174 मेट्रिक टन),उत्तर प्रदेश (430.51 मेट्रिक टन), मध्य प्रदेश(156.96 मेट्रिक टन), दिल्ली(190 मेट्रिक टन),हरियाणा (109.71 मेट्रिक टन) आणि तेलंगणा (63.6 मेट्रिक टन) या राज्यांना वैद्यकीय वापरासाठीचा एकूण 1125 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन वितरीत केला आहे.

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1715677) Visitor Counter : 291