कंपनी व्यवहार मंत्रालय

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते MCA21च्या तिसऱ्या आवृत्तीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

Posted On: 24 MAY 2021 6:18PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज नवी दिल्ली इथे झालेल्या आभासी कार्यक्रमात MCA अर्थात कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या MCA21 या नव्या मंचाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या (V3.0) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. MCA21 मध्ये सुधारित रचनेचे संकेतस्थळ, MCA च्या अधिकाऱ्यांसाठी नव्या ईमेल सुविधा तसेच ई-पुस्तक आणि ई-सल्लागार सेवा या दोन नव्या रचनांचा समावेश आहे. केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव राजेश वर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील या आभासी कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान  अनुराग सिंग ठाकूर म्हणाले की पंतप्रधानांचे भारताला आर्थिक उर्जाकेंद्र बनविण्याचे स्वप्न साकारण्यासाठी आपल्याला आर्थिक क्षेत्रातील कार्याचा वेग वाढविणे अनिवार्य आहेच,पण त्याचसोबत या प्रक्रियेतील आपले सर्व सहभागी- सर्व व्यापारी आणि कॉर्पोरेट संस्था भारत सरकारकडे स्नेही आणि सशक्त भागीदार म्हणून बघतील हे देखील सुनिश्चित करायला हवे.

राज्यमंत्री ठाकूर यांनी सांगितले की, सुधारित रचनेच्या संकेतस्थळाच्या उत्तम दृश्यरुपामुळे आणि अनुभवामुळे वापरकर्त्यांना चैतन्यदायी अनुभव येईल, ई-पुस्तक सुविधा अद्यतन कायदे समजून घेण्याचा मार्ग सोपा करेल आणि त्यात कायद्यातील ऐतिहासिक बदलांचा मागोवा घेण्याची यंत्रणादेखील असेल.

ई-सल्लागार सेवा खालील सोयी उपलब्ध करून देईल:

  • MCA कडून वेळोवेळी प्रस्तावित करण्यात आलेल्या दुरुस्त्या आणि नवी विधेयके यांच्याबद्दल आभासी पद्धतीने जनतेला सल्ला सेवा पुरविणे.
  • धोरणविषयक निर्णय जलद घेता यावे यासाठी भागधारकांकडून आलेल्या सूचना किंवा टीका यांचे संकलन, वर्गीकरण आणि श्रेणीकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेणे.
  • MCA च्या अधिकाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली नवी ईमेल सुविधा त्यांना अंतर्गत तसेच बाह्य भागधारकांशी सुव्यवस्थित आणि सुव्यवस्थापित संपर्कासाठी अधिक उत्तम वैशिष्ट्ये आणि क्षमता बहाल करेल.

 

MCA21 बद्दल माहिती

MCA21 हा भारत सरकारच्या मोहीम प्रकारच्या प्रकल्पांचा एक भाग आहे. भूतकाळात अनेक प्रशंसा मिळवल्यानंतर, या प्रकल्पाने आता तिसऱ्या आवृत्तीपर्यंत मजल गाठली आहे. MCA21 V3.0 हा या वर्षीच्या अर्थसंकल्पीय घोषणेचा भाग आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून कॉर्पोरेट अनुपालन आणि भागीदार अनुभव अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1721327) Visitor Counter : 230