माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारताची अमूल्य आशयसंपन्न सामग्री आणि तंत्रकुशलतेमुळे जागतिक सिनेमा समृद्ध झाला आहे” ज्युरी चेअरपर्सन शेखर कपूर
इफ्फी सारखे महोत्सव भारतीय चित्रपटांबद्दल जगात जागरूकता निर्माण करतात: हेलन लीक
इफ्फीच्या समारोप समारंभात उद्या जाहीर होणार सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन पीकॉक पुरस्कार
गोवा/मुंबई, 27 नोव्हेंबर 2023
गोव्यामध्ये आयोजित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आज आंतरराष्ट्रीय ज्युरी (निवड समिती) सदस्यांनी महोत्सवातील गोल्डन पीकॉक (सुवर्ण मयूर) पुरस्कारासाठी नामांकित चित्रपट पाहताना आलेला अनुभव आणि त्याबद्दलचा दृष्टीकोन सर्वांसमोर मांडला. जगभरातील नामवंत चित्रपट निर्माते आणि ज्युरी सदस्यांनी ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धा’ विभाग, आणि उद्या होणाऱ्या महोत्सवाच्या समारोप समारंभात या विभागा अंतर्गत घोषित आणि सादर केले जाणारे पुरस्कार यावर आपले विचार मांडले.
ज्युरी समितीने एकमताने सांगितले की आंतरराष्ट्रीय ज्युरीचा भाग बनणे आणि कथांच्या वैविध्यपूर्ण आणि आकर्षक सूचीमधून निवड करणे हा त्यांच्यासाठी एक उत्तम वैयक्तिक अनुभव होता. त्यांनी सांगितले की भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव त्याच्या स्थापनेपासून मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे, महोत्सवामध्ये प्रदर्शित करण्यासाठी प्राप्त झालेले प्रवेश आणि त्याची निवड, यामध्ये विविधता आहे.

आंतरराष्ट्रीय जुरी सदस्य पत्रकार परिषदेला संबोधित करताना
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि ज्युरी चेअरपर्सन शेखर कपूर म्हणाले की, निवड समितीने केलेली चित्रपटांची निवड उल्लेखनीय आहे.
जागतिक चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारे भारताचे अमूल्य आशयसंपन्न साहित्य आणि तंत्रकुशलता याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. “भारतात आशयसंपन्न साहित्य आणि तंत्रज्ञानाचे जगातील सर्वात मोठे भांडार असून, इफ्फी सारखा महोत्सव उर्वरित जगाला भारताची संस्कृती जाणून घ्यायला मदत करतो,” शेखर कपूर म्हणाले. भारतातील चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराबद्दल बोलताना ते म्हणाले, "सृजनशील कामात कोणाकडेही अंतिम अधिकार नसतो."

ज्युरी चेअरपर्सन शेखर कपूर पत्रकार परिषदेला संबोधित करताना
सहयोग सुलभ करण्यामधील चित्रपट महोत्सवांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देत जेरोम पेलार्ड म्हणाले, “वैविध्यपूर्ण चित्रपटांचा शोध घेणे आणि सहयोगासाठी नेटवर्किंग, हा चित्रपट महोत्सवात जाण्याचा सर्वात मोठा फायदा आहे." प्रभावशाली भागीदारीला चालना देणाऱ्या फिल्म बाजार सारख्या उपक्रमांची प्रशंसा करताना जेरोम म्हणाले, "फिल्म बाजार सारख्या विपणन उपक्रमांचा सहयोगी प्रकल्प निर्मितीवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.” क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो (सीएमओटी) उपक्रमाची त्यांनी प्रशंसा केली आणि म्हणाले की, चित्रपट निर्मितीमधील तरुण कलागुणांना वाव देण्यासाठी हा खरोखरच एक उत्कृष्ट उपक्रम आहे.
कॅथरीन दुसार्ट यांनी जेरोम यांनी व्यक्त केलेल्या भावनांना दुजोरा देत, स्पर्धेतील चित्रपटांचे वाढते प्रमाण आणि वितरक आणि निर्मात्यांना एका धाग्याने जोडण्यात फिल्म बाजारच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे देखील कौतुक केले. सहनिर्मिती करण्यासाठी नवीन प्रस्तावांची संधी शोधणाऱ्या वितरक आणि उत्पादकांना हे अतिशय उपयुक्त आहे, असे त्यांनी सांगितले. या वर्षी महोत्सवात स्पर्धेसाठी जगातील विविध भागातून चित्रपटांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

ज्युरी सदस्य कॅथरीन दुसार्ट आणि हेलन लीक पत्रकार परिषदेत
भिन्न परिस्थितीतील चित्रपट उद्योगाला एकसंध रूप देण्यात हा महोत्सव महत्वाची भूमिका बजावत असल्याचे हेलन लीक यांनी अधोरेखित केले. इफ्फी च्या अतिशय विस्तृत व्यासपीठाद्वारे भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. इफ्फीच्या माध्यमातून विविध चित्रपट उद्योगांमध्ये भागीदारी होत आहे असे सांगून या महोत्सवामुळे जगभरात भारतीय चित्रपटांबद्दल जागरूकता वाढीला लागत आहे, असे त्यांनी सांगितले.
वैविध्यपूर्ण कथा, संस्कृती आणि वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बघणे हा एक उत्तम अनुभव होता, असे जोस लुइस अल्केन यांनी सांगितले. तसेच या महोत्सवाला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील अद्वितीय होता असे त्या म्हणाल्या.

पत्रकार परिषदेत ज्युरी सदस्य जेरोम पेलार्ड आणि जोस लुइस अल्केन यांच्यासह पत्र सूचना कार्यालयाच्या महासंचालिका मोनिदीपा मुखर्जी
ज्युरी सदस्यांनी त्यांना आलेल्या अमूल्य अनुभवाची तसेच महोत्सवाच्या आदरातिथ्यामधील आपलेपणाची आणि भव्यतेची उत्कटतेने प्रशंसा केली.
आंतरराष्ट्रीय ज्युरी, प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार विजेत्याची निवड करतील ज्यात 'गोल्डन पीकॉक' - सुवर्ण मयूर पुरस्कार आणि दिग्दर्शक आणि निर्मात्यासाठी प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपटाव्यतिरिक्त, ज्युरी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) आणि विशेष ज्युरी पुरस्कार श्रेणींमध्ये विजेते देखील निवडतील.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा’ विभागासाठी महत्त्वाच्या शैलीतील 15 प्रशंसापात्र चित्रपट निवडले जातात, ज्यात प्रथितयश आणि युवा असे सर्वच दिग्दर्शकांचे नाविन्यपूर्ण आणि कलात्मक चित्रपट प्रतिनिधित्व करत असतात. त्यातून आंतरराष्ट्रीय ज्युरी विजेत्याची निवड करतील.
आंतरराष्ट्रीय ज्युरीं बद्दल थोडक्यात माहिती:
1. शेखर कपूर (चित्रपट दिग्दर्शक) - अध्यक्ष, ज्युरी
शेखर कपूर हे एक नावाजलेले चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते , कथाकार आणि निर्माता आहेत. गोल्डन ग्लोब आणि ऑस्करसाठी नामांकनाव्यतिरिक्त पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, बाफ्टा पुरस्कार, राष्ट्रीय समीक्षा मंडळ पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. कान्स इंटरनॅशनल ज्युरी (2010) चे माजी सदस्य आणि इफ्फी ज्युरी अध्यक्ष (2015) आहेत. त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
2. जोस लुइस अल्केन
जोस लुइस अल्केन यांनी बेले इपोक (अकादमी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट, 1993), टू मच (1995), ब्लास्ट फ्रॉम द पास्ट (1999), आणि द. स्किन आय लिव्ह इन (२०११) अशा अनेक चित्रपटांसाठी काम केले असून,1970 च्या दशकात फ्लूरोसंट ट्यूबचा मुख्य प्रकाश म्हणून वापर करणारे ते पहिले सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यांना मिळालेल्या अनेक सन्मानांमध्ये 1989 सालचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ,तसेच 1989, 1992, 1993, 2002, 2007 या वर्षांमधील सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी साली 2006 युरोपियन अकादमी पुरस्कार, स्पॅनिश अकादमी ऑफ सिनेमा आर्ट्स अँड सायन्सेसचे सुवर्णपदक,2011मधे साठी ललित कलांसाठी गुणवत्ता सुवर्णपदक (2017, 2019). व्हिजन अवॉर्ड, लॉसने; आणि गोल्ड मेडल, व्हॅलाडोलिड फेस्टिव्हल असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत .
3. जेरोम पेलार्ड
जेरोम पेलार्ड यांनी शास्त्रीय संगीतकार, कलादिग्दर्शक आणि शास्त्रीय रेकॉर्ड लेबलचे CFO म्हणून काम केले आहे. डॅनियल टॉस्कन डु प्लांटियर यांच्यासोबत त्यांनी सत्यजित रे, मेहदी चरेफ, सॉलेमाने सिसे, मॉरिस पियालाट आणि जीन-चार्ल्स टचेला यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची सह-निर्मिती केलेली आहे. त्यांनी 1995 ते 2022 या कालावधीत कान फेस्टिव्हलसाठी काम केले आहे. Marché du Film याचे कार्यकारी संचालक या नात्याने त्यांनी जगातील आघाडीची चित्रपट बाजारपेठ विकसित केली आहे. त्यांनी cinando.com या ऑनलाइन संसाधन, संप्रेषण आणि प्रसारण मंचाची स्थापना केली आहे.
4. कॅथरीन दुसार्ट
15 देशांमधील जवळपास 100 चित्रपटांची निर्माती/ सह-निर्माती, कॅथरीन दुसार्ट या हौहौ शीजी लींघून के (Huahua Shijie Linghun ,2017), द मिसिंग पिक्चर,(The Missing Picture,2013) आणि एक्झिल (Exil, ,2016) या चित्रपटांमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निर्मितींपैकी, हैफा मधील अमोस गिताईच्या लैला या चित्रपटाने व्हेनिस 2020 स्पर्धेत सहभाग घेतला होता. रिथी पन्हाचा लेस इराडीएस (इरॅडिएटेड) हा बर्लिन 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला होता. जेरुसलेममधील आमोस गिताईचा ट्रामवे आणि रिथी पन्हाचा ग्रेव्हज विदाऊट अ नेम हे व्हेनिस 2018मध्ये स्पर्धेत होते.F.J.Ossang च्या 9 Fingers ने लोकार्नो 2017 मधे सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळवला होता. गुरविंदर सिंगचा चौथी कूट (चौथी दिशा) हा चित्रपट कान 2015 मध्ये दाखवला गेला होता. रिथी पन्हाच्या द मिसिंग पिक्चरला कान्स 2013 मध्ये अन सरटेन रिगार्ड पारितोषिक मिळाले होते.
5. हेलन लीक
ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित सर्जनशील निर्मात्यांपैकी, हेलन लीक एक असून त्यांनी Carnifex (2022), Swerve (2018), Wolf Creek 2 (2013), Heaven's Burning (1997), आणि Black and White (2002) या चित्रपटांसाठी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली आहे त्यांचे चित्रपट व्हेनिस, टोरंटो, लंडन आणि सिटगेस (कॅटलोनिया) सह तीसहून अधिक महोत्सवांमध्ये दाखवले गेले आहेत. 2021 पासून त्या ऑस्ट्रेलिया चित्रपट मंडळाच्या (स्क्रीनबोर्डाच्या) संचालक आहेत. 2022 पासून त्या फ्लिंडर्स युनिव्हर्सिटी, अॅडलेडमध्ये मानववंशशास्त्र, कला आणि सामाजिक विज्ञान परिषद (HASS) यांच्या सदस्य असून, त्यांना विद्यापीठाच्या प्रतिष्ठित मानद विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपटातील महत्त्वपूर्ण सेवेबद्दल तिला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया (2020) ने सन्मानित करण्यात आले आहे.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/Rajshree/Bhakti/Sampada/D.Rane
(Release ID: 1980216)