पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

घानाच्या राष्ट्रपतींसोबत संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन

Posted On: 03 JUL 2025 2:35AM by PIB Mumbai

आदरणीय राष्ट्रपती जॉन महामा,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

प्रसारमाध्यमातील मित्रहो,

 

नमस्कार !

तीन दशकांच्या मोठ्या खंडानंतर भारतीय पंतप्रधान घानाला भेट देत आहेत.

ही संधी मिळणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

"अय्य मे अनेजे से मेवोहा”

घानामध्ये ज्या जिव्हाळ्याने, उत्साहाने आणि आदरभावनेने आमचे स्वागत करण्यात आले त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.

घानाचे राष्ट्रपती स्वतः विमानतळावर माझे स्वागत करायला आले हा मी माझा मोठा सन्मान समजतो.

राष्ट्रपती महामा डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या सार्वत्रिक  निवडणुकीत दुसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांच्या या गौरवशाली विजयाबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे अभिनंदन करतो.

हा विजय म्हणजे त्यांची दूरदृष्टी आणि नेतृत्व यावर घानामधील लोकांच्या असलेल्या खोल विश्वासाचे प्रतीक आहे.

मित्रहो,

भारत आणि घाना यांच्यातील दृढ मैत्रीचा गाभा आमची  सामायिक मूल्ये,  संघर्ष आणि सर्वसमावेश भविष्याच्या सामायिक स्वप्नात सामावलेला आहे.

आमच्या राष्ट्रांच्या स्वातंत्र्याच्या लढ्याने अनेकांना प्रेरित केले आहे.

आजही, घानाची चैतन्यशील लोकशाही पश्चिम आफ्रिकेत "आशेचा किरण" म्हणून काम करते.

मी आणि राष्ट्रपती महामा यांनी आपल्यातील द्विपक्षीय संबंध अधिक उंचीवर नेत ते सर्वसमावेशक भागीदारीत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्र उभारणीच्या घानाच्या प्रवासात भारत हा केवळ एक सहयोगी नाही तर सहयात्री आहे.

ग्रँड ज्युबिली हाऊस, परदेश सेवा संस्था, कोमेंडा शुगर फॅक्टरी, भारत-घाना कोफी अन्नान आयसीटी सेंटर आणि तेमा मपकादन रेल्वेमार्ग - या केवळ वास्तू नव्हेत तर आपल्या भागीदारीचे प्रतीक आहेत.

आपल्या द्विपक्षीय व्यापाराने 3 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला आहे.

भारतीय कंपन्यांनी सुमारे 900 प्रकल्पांमध्ये अंदाजे 2 अब्ज  डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

येत्या पाच वर्षात हा द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आज आम्ही निश्चित केले आहे.

फिनटेकच्या क्षेत्रात युपीआय डिजिटल पेमेंट मधील अनुभव घानाबरोबर सामायिक करायला भारत तयार आहे.

मित्रहो,

विकासात्मक भागीदारी हा  आमच्या भागीदारीचा मुख्य आधारस्तंभ आहे.

घानाच्या आर्थिक पुनर्रचनेसाठी राष्ट्रपती महामा यांच्या प्रयत्नांना भारताचा संपूर्ण पाठिंबा आणि सहकार्य असेल, असे आश्वासन आम्ही देतो.

आज, आम्ही घानासाठी आयटेक  आणि आयसीसीआर शिष्यवृत्ती दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.

युवकांसाठी व्यावसायिक शिक्षणाकरता कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचे काम सुरू केले जाईल.

कृषी क्षेत्रात राष्ट्रपती महामा यांच्या "फीड घाना" या उपक्रमाला पाठिंबा देणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.

घानामधील नागरिकांना जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून किफायतशीर आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा पुरवण्याचा भारताचा प्रस्ताव आहे.

लसनिर्मिती क्षेत्रात सहकार्य करण्यावर आम्ही चर्चा केली आहे.

संरक्षण आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्ये आम्ही "स्थैर्याच्या माध्यामातून सुरक्षा" या मंत्रानुसार आम्ही मार्गक्रमण करत आहोत.

सशस्त्र दलांचे प्रशिक्षण, सागरी सुरक्षा, लष्करी साहित्य पुरवठा आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक व्यापक केले जाईल.

भारतीय कंपन्या महत्त्वाच्या खनिजांचा शोध आणि उत्खनन यामध्ये सहकार्य करतील. 

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा या  सारख्या व्यासपीठांवर भारत आणि घाना यांच्यात आधीपासूनच सहकार्य आहे.

घानाच्या अक्षय ऊर्जेच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी,  विशेषतः स्वयंपाकाचा स्वच्छ गॅस क्षेत्रात आम्ही त्यांना जागतिक जैवइंधन आघाडीत आमंत्रित केले आहे.

मित्रहो,  

आम्ही दोन्ही देश ग्लोबल साऊथचे सदस्य असून त्यांच्या प्राधान्यांसाठी आम्ही संपूर्णपणे वचनबद्ध आहोत.

व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेत सकारात्मक भागीदारीसाठी आम्ही घानाचे आभार मानतो.

आमच्या जी  20  अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आफ्रिकन संघाला जी 20  चे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळणे ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.

आम्ही सहेल क्षेत्रासह अनेक क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारविनिमय केला. 

दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे यावर आमचे एकमत आहे. 

दहशतवादाविरुद्धच्या आमच्या लढाईत घानाने दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.

या संदर्भात, दहशतविरुद्धच्या लढ्यात आमचे सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांवरील आमचे दृष्टिकोन देखील अतिशय जुळलेले आहेत.

पश्चिम आशिया आणि युरोपमधील सध्याच्या संघर्षावर आम्ही दोघांनीही तीव्र चिंता व्यक्त केली आहे. 

हे युद्धाचे युग नाही असा आमचा ठाम विश्वास आहे.

कोणत्याही मुद्द्यावर संवाद आणि मुत्सद्देगिरीने तोडगा काढला पाहिजे.

मित्रहो,

घानामधील भारतीय समुदाय आमच्या परस्परांच्या नागरिकांमधील दृढ संबंधांमधील महत्त्वाचा दुवा आहे.

कित्येक वर्षांपासून भारतातील शिक्षक, डॉक्टर्स आणि अभियंते घानामध्ये सेवा देत आहेत.

येथील भारतीय समुदाय देखील घानाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये सकारात्मक योगदान देत आहे. 

मी उद्या भारतीय समुदायाच्या सदस्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे.

आदरणीय राष्ट्रपती,

तुम्ही भारताचे घनिष्ट मित्र आहात. तुम्हाला भारताची चांगली ओळख आहे.

मी तुम्हाला भारत भेटीचे मनापासून आमंत्रण देतो. तुम्ही आम्हाला तुमचे स्वागत करण्याची संधी द्याल असा मला विश्वास आहे.

मी पुन्हा एकदा आपले, घाना सरकारचे आणि घानाच्या सर्व लोकांचे त्यांनी केलेले आतिथ्य-सत्कार यासाठी त्यांचे आभार मानतो. 

खूप खूप धन्यवाद.

***

SonaliK/BhaktiS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2141750)