संरक्षण मंत्रालय
लष्करी सेवा दलांशी समन्वय : पुण्यातल्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय आपत्तीच्या काळातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनात लष्करी-नागरी समन्वयाबाबत एकात्मिक परिसंवादाचे आयोजन
Posted On:
03 JUL 2025 6:15PM by PIB Mumbai
पुणे, 3 जुलै 2025
पुण्यातल्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात आज दि. 03 जुलै 2025 रोजी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात इंजिनिअरिंग कॉर्प्सची भूमिका – धोका, लवचिकता आणि प्रतिसाद या विषयावर एक उच्च-स्तरीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे (SDMAs), आणि राष्ट्रीय आपत्ती सज्जता व प्रतिसाद आराखड्यात सहभागी असलेल्या प्रमुख संस्थांचे वरिष्ठ नेतृत्व एकत्र आले होते.

परमविशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक प्राप्त राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (NDMA) निवृत्त सदस्य लेफ्टनंट जनरल सय्यद अटा हसनेन यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हा परिसंवाद पार पडला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (NDMA) सदस्य आणि विभाग प्रमुख राजेंद्र सिंह यांनीही या परिसंवादात मार्गदर्शन केले. परमविशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक प्राप्त दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे प्रमुख पाहुणे म्हणून या परिसंवादाला उपस्थित होते, तर परमविशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक प्राप्त माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (निवृत्त) हे सन्माननीय अतिथी म्हणून या परिसंवादात सहभागी झाले होते. अति विशिष्ट सेवा पदक प्राप्त इंजिनियर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी या परिसंवादात मुख्य भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सची आपत्ती प्रतिसादाची क्षमता आणि राष्ट्रीय लवचिकतेमध्ये त्यांची वाढती भूमिका स्पष्ट केली.

या परिसंवादामधून पूर आणि भूकंप ते औद्योगिक अपघात आणि CBRN (रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि अणु) धोक्यांपर्यंतच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींविषयक धोक्यांच्या बाबतीत भारताची संवेदनशीलता तसेच त्या अनुषंगानेच एकात्मिक आणि प्रतिसाद देणारा आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची आवश्यकता अधोरेखित केली गेली. देशभरातले व्यापक अस्तित्व, अभियांत्रिकी साधनांची सज्जता आणि नागरी प्राधिकरणांंसोबतच्या समन्वित आंतर-कार्यक्षमतेमुळे अनेकदा अशा संकटांच्या काळात देशात प्रथम प्रतिसाद देणारे म्हणून कामी येत असलेल्या भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सच्या महत्त्वाच्या भूमिकेवरही या परिसंवादात भर दिला गेला.
E6OH.jpeg)
परमविशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक प्राप्त निवृत्त लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह यांनी या परिसंवादात समारोपाचे भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी आपत्कालीन संकटाच्या सज्जतेमधल्या नागरी आणि लष्करी घटकांच्या समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (CME) कमांडंट आणि सेवा पदक प्राप्त लेफ्टनंट जनरल ए.के. रमेश यांनी आभार प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडली.
या कार्यक्रमातील प्रमुख मुद्दे खाली नमूद केले आहेत:
- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), राज्य प्राधिकरणे आणि सशस्त्र दलांमध्ये एकात्मिक आदेश आणि संवाद विषयक मानक नियमावलीची आवश्यकता.
- आपत्तीप्रवण क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण, सिम्युलेशन आणि पूर्व-स्थित अभियांत्रिकी साधनांमध्ये गुंतवणूकीची गरज.
- विशेष कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स युनिट्स आणि आंतर-यंत्रणा सरावांच्या माध्यमातून CBRN (रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि अणु) सज्जता वाढवणे.
- भविष्यातील प्रतिसादकांसाठी तत्त्वज्ञान, धोरणे आणि प्रशिक्षण विषयक अभ्यासक्रमांच्या आखणीसाठी पूर्वीच्या मोहिमांमधील अनुभव आत्मसात करणे आणि ते परस्परांसोबत सामायिक करणे.
F8SR.jpeg)
हा परिसंवाद भारताच्या राष्ट्रीय आपत्त्कालीन प्रतिसाद व्यवस्थेच्या संरचनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरले, तसेच हर काम देश के नाम अर्थात प्रत्येक कार्य राष्ट्राच्या सेवेत या कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सच्या ब्रीदवाक्याप्रती असलेली त्यांची वचनबद्धताही या परिसंवादाने पुन्हा एकदा अधोरेखित केली.
* * *
PIB Pune | S.Kane/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141891)