वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारतीय आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अपेडाकडून अबू धाबीमध्ये 'इंडियन मॅंगो मॅनिया 2025' चे आयोजन
Posted On:
03 JUL 2025 6:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2025
भारतीय कृषी उत्पादनांची, विशेषतः आंब्याची जागतिक ओळख वाढवण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) अबू धाबी येथे आंबा खरेदी प्रोत्साहन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात 'इंडियन मॅंगो मॅनिया 2025’ याचेही उद्घाटन झाले - हा एक विविध जातींचा इन-स्टोअर आंबा महोत्सव आहे; जो युएईमधील भारतीय दूतावास आणि लुलू ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
आंब्याच्या चालू हंगामात आयोजित या महोत्सवाचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय ग्राहकांना, विशेषतः युएई आणि आखाती प्रदेशात मोठ्या संख्येने असलेल्या अनिवासी भारतीयांसमोर भारतातील सर्वोत्तम आंब्याच्या जातींचे प्रदर्शन करणे हे आहे.
प्रदर्शनात ठेवलेल्या उत्कृष्ट भारतीय आंब्याच्या जातींमध्ये बनारसी लंगडा, दशेरी, चौसा, सुंदरजा, आम्रपाली, मालदा, भारत भोग, प्रभा शंकर, लक्ष्मण भोग, महमूद बहार, वृंदावनी, फसली आणि मल्लिका यासारख्या जीआय-टॅग केलेल्या आणि प्रादेशिक वैशिष्ट्य दाखविणाऱ्या जातींचा समावेश होता.

लुलू हे जागतिक स्तरावर भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे आणि भारतीय आंबा उत्पादकांना युएईमधील बाजारपेठांशी जोडण्यात अपेडाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे या प्रसंगी बोलताना, युएईमधील भारताचे राजदूत संजय सुधीर म्हणाले.
भारतीय आंब्यांसाठी युएई हे आघाडीचे निर्यातीचे ठिकाण बनले आहे. 2024 मध्ये, भारताने युएईला 20 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे 12,000 मेट्रिक टन पेक्षा जास्त आंबे निर्यात केले, ज्यातून भारतीय उत्पादनांना असलेली मोठी मागणी दिसून येते.
* * *
S.Kane/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141895)