ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक ब्युरोच्या वतीने मुंबईत "मानके आणि शाश्वतता: प्लास्टिक पॅकेजिंगचे भविष्य घडवणे” या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
Posted On:
03 JUL 2025 6:50PM by PIB Mumbai
मुंबई, 3 जुलै 2025
भारतीय मानक ब्युरो (बीआयएस ) ने 2 जुलै 2025 रोजी मुंबईत "मानके आणि शाश्वतता: प्लास्टिक पॅकेजिंगचे भविष्य घडवणे" या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले. या चर्चासत्रात धोरणकर्ते, शास्त्रज्ञ, नियामक आणि उद्योगातील भागधारकांना भविष्यासाठी सज्ज मानकीकरणाद्वारे प्लास्टिक पॅकेजिंगला शाश्वतता आणि चक्राकार अर्थव्यवस्थेच्या तत्त्वांशी जोडण्यावर चर्चा करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले.

आपल्या स्वागतपर भाषणात, बीआयएसचे संचालक आणि प्रमुख पिनाकी गुप्ता यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी (एसडीजी 12, 13, 9 आणि 3) सुसंगत अशी बीआयएस मानके भारताच्या शाश्वतता उद्दिष्टांना कशाप्रकारे पुढे नेत आहेत यावर प्रकाश टाकला - यामध्ये जबाबदार वापर, हवामान बदलाशी सुसंगत कृती, उद्योग नवोपक्रम आणि ग्राहकांचे आरोग्य यांचा समावेश आहे. बीआयएसचे संचालक आणि प्रमुख (पीसीडी), चिन्मय द्विवेदी यांनी चर्चासत्राची उद्दिष्टे सांगितली आणि सुरक्षित, शाश्वत प्लास्टिक पॅकेजिंग सक्षम करण्यात - विशेषतः अन्नाच्या थेट संपर्कात येणाऱ्या अनुप्रयोगांसाठी मानकीकरणाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला
या चर्चासत्रात प्रमुख पाहुण्या महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंघल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विनिता वैद सिंघल यांनी आपल्या भाषणात पद्धतशीर बदल घडवून आणण्यासाठी ग्राहक-केंद्रित आणि शाश्वत पॅकेजिंग नियमांचे महत्त्व अधोरेखित केले.

बीआयएसचे उपमहासंचालक (पश्चिम) एस.के. सिंग यांनी प्रमुख भाषण दिले. त्यांनी शाश्वत प्लास्टिक पॅकेजिंग पद्धतींना आकार देण्यात मानकीकरणाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. प्लास्टिक पॅकेजिंग सेक्शनल कमिटी (पीसीडी 21) चे अध्यक्ष आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग (आयआयपी) चे सहसंचालक डॉ. बाबू राव गुडुरी यांनी विशेष भाषण दिले. भारतातील प्लॅस्टिक पॅकेजिंगसाठी मानके अधिक सक्रिय करण्यात समितीने केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यावर त्यांनी आपल्या भाषणात प्रकाश टाकला.
या चर्चासत्रात म्हैसूरच्या सीएसआयआर-सीएफटीआरआयचे डॉ. आर. एस. मॅचे, यांच्या नेतृत्वाखाली माहितीपूर्ण तांत्रिक सत्रे आणि प्लास्टिकची विघटन क्षमता आणि सूक्ष्मजीवांद्वारे सेंद्रिय पदार्थांचे होणारे विघटन याविषयावर तज्ञांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली. या चर्चासत्राला CIPET-IPT, कोची येथील डॉ.के.पी. भुवना, TTRC, लोहिया कॉर्प इथले राजीव कुमार द्विवेदी, मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगचे डॉ. बादल दिवांगन, एपीआर भारतचे संचालक आणि गणेश इकोस्फियर लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत खंडेलवाल यांनी मार्गदर्शन केले.

तांत्रिक सत्रानंतर मानक मंथन सत्र झाले . या सत्रात मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) चे सहायक प्राध्यापक डॉ. विजय हब्बू आणि पॅकेजिंग आणि रीसायकलिंग सल्लागार राजेश कुमार गेरा यांनी विस्तृत सादरीकरण केले.
ग्राहकांचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विज्ञान-चालित धोरण, मजबूत मानकीकरण आणि शाश्वत पद्धतींद्वारे भारताची पॅकेजिंग परिसंस्था मजबूत करण्याच्या एकत्रित वचनबद्धतेसह या चर्चासत्राचा समारोप झाला.
* * *
PIB Mumbai | S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141908)