कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कृषी आणि ग्रामीण विकास उपक्रमांचा घेतला आढावा
विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी विकसित जम्मू आणि काश्मीरही आवश्यक - शिवराज सिंह चौहान
Posted On:
03 JUL 2025 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2025
केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज श्रीनगरमधील राज्य सचिवालयात जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत कृषी आणि ग्रामीण विकास संदर्भात सविस्तर आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत एका संयुक्त पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत हा संकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी विकसित जम्मू आणि काश्मीरचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले. त्यादृष्टीनेच शेतकऱ्यांच्या आणि या प्रदेशातील ग्रामीण रहिवाशांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी क्षेत्र हे देशासह जम्मू आणि काश्मीरच्या अर्थव्यवस्थांचा कणा आहे, जवळपास 50% लोकसंख्येची उपजीविका ही कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे, असे चौहान यांनी नमूद केले. 'किसान खिदमत घर' या राज्याच्या उपक्रमाचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. हा उपक्रम म्हणजे शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व कृषी सेवा उपलब्ध करून देणारे एक-खिडकी केंद्र असल्याची माहिती त्यांनी दिली.
या प्रदेशात पिकवल्या जाणाऱ्या सफरचंद, बदाम आणि अक्रोड यांसारख्या विविध फळबाग पिकांबद्दल चौहान यांनी समाधान व्यक्त केले. आयात केलेले रोप अनेकदा दोन किंवा तीन वर्षांनंतर संक्रमित होतात असे दिसून येत असल्याचा एका महत्त्वाचा मुद्दाही त्यांनी मांडला. यावरचा उपाय म्हणून, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत (MIDH) श्रीनगरमध्ये 150 कोटी रुपयांचे स्वच्छ रोप केंद्र (Clean Plant Center) स्थापन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या केंद्राच्या माध्यमातून सफरचंद, बदाम, अक्रोड आणि बेरीसाठी स्वच्छ, रोगमुक्त लागवड साधन सामग्रीवर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना उच्च-गुणवत्तेची, रोगमुक्त रोपे उपलब्ध होतील याची सुनिश्चिती करण्यासाठी खाजगी रोपवाटिकांनाही पाठबळ पुरवले जाईल, असे ते म्हणाले.

ज्या जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना सरकारने जमीन वाटप केले आहे, परंतु अशांपैकी ज्यांना अजुनही अधिकृत दस्तऐवज उपलब्ध झालेले नाहीत, त्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश करण्यासाठी विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
बागायती पिकांचे अचूक मॅपिंग आणि या पिकांचा पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत (पीएमएफबीवाय) समावेश याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी लवकरच पुनर्रचित हवामानाधारित पीक विमा योजना सुरु करण्याचे देखील नियोजन सरकार करत आहे अशी माहिती त्यांनी दिली.
जम्मू भागात प्रादेशिक बागायती केंद्र सुरु करण्याच्या मागणीबद्दल मत नोंदवताना या केंद्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आयसीएआरतर्फे पुरवण्यात येतील अशी घोषणा केंद्रीय मंत्री चौहान यांनी केली. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, नियंत्रित तापमान सुविधांची 18 महिन्यांची विद्यमान साठवण मर्यादा विस्तारुन 24 महिने करण्यात येईल. बागायती अभियानासाठी, 5,000 मेट्रिक टन साठवण क्षमतेच्या प्रकल्पाला अनुदान देण्यात येईल आणि जेथे 6,000 मेट्रिक टन साठवण क्षमता असेल ते प्रकल्प देखील 5,000 मेट्रिक टनापर्यंतचे अनुदान मिळण्यास पात्र ठरतील. सहकार्याचा ओघ सुरळीत ठेवण्यासाठी आयसीएआर आणि विद्यापीठादरम्यान सामंजस्य करार देखील करण्यात येईल.

‘केशर’ ही काश्मीरची ओळख आहे हे अधोरेखित करत केंद्रीय मंत्री चौहान यांनी घोषणा केली की केंद्र सरकार केशराचे उत्पादन वाढवण्यासाठी टिश्यू कल्चर प्रयोगशाळा तसेच नर्सरीची स्थापना करणार आहे. ते म्हणाले की स्थानिक परिस्थितीला अनुकूल ठरेल अशा पद्धतीने राष्ट्रीय केशर अभियानाची पुनर्रचना करण्यात येईल आणि या पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी तसेच नुकसान कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांचे एक तज्ञ पथक तयार करण्यात येईल.
मृदा आरोग्य तसेच खतांचे नियमन सुधारण्यासाठी कथुआ, बारामुल्ला आणि अनंतनागमध्ये गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांची उभारणी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
रोजगारासदर्भात बोलताना ते म्हणाले की, मनरेगाच्या माध्यमातून नोकऱ्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली आहेत आणि तरुणांचे प्रशिक्षण कार्यक्रम देखील लवकरच सुरु होतील. कोणताही पात्र शेतकरी किसान क्रेडीट कार्ड योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची देखील खात्री केंद्र सरकार करुन घेत आहे असे ते म्हणाले.

भाषणात शेवटी केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले की सरकारला स्वतःच्या कामगिरीचा अभिमान आहे आणि सरकारी योजना परिणामकारकरित्या राबवण्याप्रती सरकार कटिबद्ध आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टिकोनाला प्रतिध्वनित करत, जम्मू आणि काश्मीरच्या विकासाला वेग देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांचे आभार मानून केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रदेशाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याप्रती कटिबद्धतेला दुजोरा दिला.
* * *
S.Kane/Tushar/Sanjana/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141937)