लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

व्यत्यय कमी झाल्यामुळे 18 व्या लोकसभेच्या कार्यकाळात सुधारित उत्पादकता आणि अर्थपूर्ण चर्चा दिसून आल्या: लोकसभा अध्यक्ष

Posted On: 03 JUL 2025 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जुलै 2025

 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सांगितले की, भारताच्या संसदेच्या कामकाजात एकेकाळी पुनःपुन्हा येणारे व्यत्यय आता लक्षणीयरित्या कमी झाले असून त्यामुळे सभागृहाची उत्पादकता वाढली आहे आणि येथे अर्थपूर्ण चर्चा घडू लागल्या आहेत.

प्रथमच आयोजित होत असलेल्या राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या शहरी स्थानिक संस्थांच्या अध्यक्षांच्या राष्ट्रीय संमेलनात, गुरगावातील मानेसर येथे बोलताना ते म्हणाले की आता लोकसभेत रात्री उशिरापर्यंत चालणारी सत्रे आणि दीर्घकाळ सुरु असलेल्या चर्चा अधिकाधिक प्रमाणात बघायला मिळत असून हे परिपक्व आणि जबाबदार लोकशाही संस्कृतीचे निदर्शक आहे. शहरी स्थानिक संस्थांनी पायाभूत स्तरावर लोकशाही बळकट करण्यासाठी नियमित बैठका, सशक्त समिती व्यवस्था आणि नागरिकांच्या सहभागासह संरचित प्रक्रिया समाविष्ट करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

गुरगावच्या आयएमटी मानेसर मधील आंतरराष्ट्रीय वाहन तंत्रज्ञान केंद्रात (आयसीएटी) 3 आणि  4 जुलै 2025 या काळात भरलेले हे दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलन म्हणजे भारतभरातील शहरांमध्ये सह्भागात्मक प्रशासन रचनेच्या माध्यमातून संवैधानिक लोकशाही तसेच राष्ट्र उभारणी बळकट करण्यात शहरी स्थानिक संस्थांकडे असलेल्या भूमिकेची चर्चा करण्यासाठीचा ऐतिहासिक उपक्रम ठरला आहे.

याप्रसंगी केलेल्या भाषणात, लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी प्रश्नकाळ आणि शून्य काळासारख्या सुस्थापित  लोकशाही पद्धतींचे महत्त्व अधोरखित केले. संसदेतील अशा तरतुदींनी प्रतिनिधींना जबाबदार धरण्यात आणि सार्वजनिक समस्या पद्धतशीरपणे मांडण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे याकडे त्यांनी निर्देश केला.  

चर्चा, संयम आणि चर्चेची गहनता यातूनच लोकशाही खऱ्या अर्थाने समृध्द होते असे प्रतिपादन त्यांनी केले. नगरपालिका प्रतिनिधींनी आपापल्या संबंधित शहरांमध्ये आणि नगरांमध्ये उदाहरण ठरेल अशा पद्धतीचे नेतृत्व करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

प्रशासनात महिलांच्या वाढत्या सहभागाबद्दल बोलताना बिर्ला यांनी देशभरातील अनेक शहरी स्थानिक संस्थांमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वाचे प्रमाण 50% पर्यंत पोहोचले आहे याबद्दल अभिमान व्यक्त केला. महिला नेत्या प्रशासनात आणि समाज कल्याणात वैशिष्ट्यपूर्ण संवेदनशीलता आणि अंतर्दृष्टी आणतात असे सांगत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या परिवर्तनकारी बदलाची प्रशंसा केली.

 

 

 

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2141962)
Read this release in: English , Urdu , Hindi