माहिती आणि प्रसारण मंत्रालय
दूरचित्रवाणी प्रेक्षक मापन क्षेत्रात निकोप स्पर्धात्मकता वाढवणे, नवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करणे आणि दूरचित्रवाणी पाहण्याच्या आधुनिक सवयींशी जुळवून घेण्याच्या उद्देशाने, अनेक नव्या संस्थांना संधी देण्याकरता पात्रतेशी संबंधित अडथळे दूर केले गेले
Posted On:
03 JUL 2025 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2025
भारतातील दूरचित्रवाणी पाहण्याच्या सवयींमध्ये अलिकडच्या वर्षांत आमूलाग्र परिवर्तन घडून आले आहे. आता प्रेक्षक केवळ केबल आणि डीटीएच (DTH) व्यासपीठांवरूनच नाही तर स्मार्ट टीव्ही, मोबाईल ॲप्लिकेशन्स आणि इतर ऑनलाइन प्रक्षेपण करणार्या व्यासपीठांच्या (streaming platforms) माध्यमातूनही आशय सामग्रीचा आस्वाद घेतात. मात्र, देशात प्रेक्षकसंख्या मोजण्यासाठी अस्तित्वात असलेल्या दूरचित्रवाणी प्रेक्षक मापन प्रणालीमध्ये (TRP) नव्याने विकसित होत असलेल्या या पद्धतींचा पूर्णपणे अंतर्भाव केला गेलेला नाही.
या पार्श्वभूमीवर, केद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 2014 मध्ये दूरचित्रवाणी प्रेक्षक संख्या मोजणी करणाऱ्या संस्थांसाठी जारी केलेल्या मूळ धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. या अनुषंगाने मंत्रालयाने 2 जुलै 2025 रोजी प्रस्तावित मसुदा जारी केला आहे. या मसुद्यामध्ये, भारतातील दूरचित्रवाणी प्रेक्षक मापन प्रणालीचे लोकशाहीकरण आणि आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने या क्षेत्रातील विद्यमान बार्क (BARC) या संस्थेव्यतिरिक्त इतर माध्यम समुहांनाहा संधी मिळावी यासाठी काही प्रतिबंधात्मक तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत.
सर्व भागधारकानी आणि सामान्य जनतेने या मसुद्यावर तो जारी केल्यापासून 30 दिवसांच्या आत अभिप्राय द्यावेत असे आवाहन मंत्रालयाने केले आहे. या क्षेत्रात निकोप स्पर्धात्मकता आणणे, अधिक अचूक आणि प्रातिनिधिक माहितीसाठा तयार करणे आणि टीआरपी (TRP) प्रणालीमध्ये देशभरातील प्रेक्षकांच्या विविध आणि विकसित होत असलेल्या माध्यम वापराच्या सवयींचे प्रतिबिंब उमटेल याची सुनिश्चिती करणे हा या प्रस्तावित सुधारणांचा उद्देश आहे.
भारतात सध्या अंदाजे 230 दशलक्ष कुटुंबांकडे दूरचित्रवाणी संचाची सुविधा आहे. मात्र त्याचवेळी प्रेक्षकसंख्येची माहिती संकलित करण्यासाठी सध्या केवळ सुमारे 58,000 पीपल मीटरचा (people meters) वापर केला जातो. एकूण दूरचित्रवाणी संच असलेल्या घरांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 0.025% इतके आहे. हा तुलनेने मर्यादित नमुना आकारातून (sample size) त्या त्या प्रदेशाची आणि लोकसंख्याशास्त्रानुसार प्रेक्षकांच्या पाहण्याच्या विविधांगी प्राधान्यांचे पुरेसे प्रतिनिधित्व होऊ शकत नाही.
यासोबतच, विद्यमान प्रेक्षक मापन तंत्रज्ञानाअंतर्गत प्रेक्षकांद्वारा वापर वाढत असलेल्या स्मार्ट टीव्ही, स्ट्रीमिंग उपकरणे, आणि मोबाईल ॲप्लिकेशन्ससारख्या उदयोन्मुख व्यासपीठांवरील प्रेक्षकसंख्येची पुरेशी नोंदही घेतली जात नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विद्यमान बहुआयामी माध्यमांच्या अवकाशात आशय सामग्री वापरण्याच्या समकालीन सवयी अधिक चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित व्हायला हवा्यात यासाठी दूरचित्रवाणी मापन प्रणाली अधिक मजबूत करण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे.
जर तुम्ही प्रेक्षक, प्रसारक, जाहिरातदार किंवा जागरूक नागरिक असाल, तर तुम्ही या महिन्याच्या अखेरपर्यंत sobpl-moib[at]nic[dot]in. या ईमेलवर तुमचा अभिप्राय पाठवू शकता.
For official draft amendments and policy guidelines, visit
https://mib.gov.in/sites/default/files/2025-07/notice-seeking-comments-on-trp_0.pdf
Policy Guidelines for Television Rating Agencies in India (2014) may be accessed at:
https://mib.gov.in/sites/default/files/2025-07/policy-guidelines-for-television-rating-agencies-in-india-dt-16.01.2014-1.pdf
* * *
S.Kane/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2141963)