ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसीने पश्चिम क्षेत्र-I मुख्यालय, मुंबई येथे आपला सुवर्णमहोत्सव आणि 51 वा स्थापना दिन केला साजरा
Posted On:
08 NOV 2025 2:38PM by PIB Mumbai
भारतातील सर्वात मोठी एकात्मिक ऊर्जा कंपनी एनटीपीसी लिमिटेडने त्यांचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि 51 वा स्थापना दिन मुंबईतील पश्चिम क्षेत्र-I मुख्यालयात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला. 1975 मधील एकल-युनिट कंपनी ते भारतातील सर्वात मोठी वीज उत्पादक आणि ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची जागतिक कंपनी बनण्यापर्यंतचा प्रवास एनटीपीसीच्या राष्ट्राप्रती समर्पित सेवेच्या 50 गौरवशाली वर्षांचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात आला.
समारंभाची सुरुवात ई. सत्य फणी कुमार, प्रादेशिक कार्यकारी संचालक (पश्चिम-I) यांनी एनटीपीसीचा ध्वज फडकावून केली, त्यानंतर एनटीपीसी गीत सादर करण्यात आले. कर्मचारी, कुटुंबातील सदस्य आणि सहकाऱ्यांना संबोधित करताना, फणी कुमार यांनी यानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि पाच दशकांहून अधिक काळ भारताच्या विकासाला गती देण्याच्या एनटीपीसीच्या वारशाचा उल्लेख केला. आज एनटीपीसीची स्थापित क्षमता 84,848 मेगावॅट आहे, तर आणखी 32,453 मेगावॅट निर्माणाधीन आहे. 2037 सालापर्यंत 244 गिगावॅटचे दीर्घकालीन लक्ष्य नवीकरणीय, जलविद्युत, अणुऊर्जा आणि हरित हायड्रोजन क्षेत्रांमधील विस्ताराच्या माध्यमातून साध्य करण्याच्या दिशेने एनटीपीसी प्रगती करत आहे यावर त्यांनी भर दिला. एनटीपीसीचे नवीन ऊर्जा क्षेत्रातील वैविध्य त्यांनी अधोरेखित केले, ज्यामध्ये लवचिक पम्पड स्टोरेज प्रकल्प आणि पुडीमडका येथे भारताच्या पहिल्या, मोठ्या प्रमाणावरील हरित हायड्रोजन हबचा विकास यांचा समावेश आहे.

फणी कुमार यांनी देशाच्या स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टांमध्ये एनटीपीसीचे योगदान तसेच मजबूत परिचालन आणि वित्तीय कामगिरीचा उल्लेख केला, ज्यात 2025–26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 9,428 कोटी रुपयांचा करपश्चात नफा देखील समाविष्ट आहे. नवोन्मेष आणि पारदर्शकतेवर एनटीपीसीचा अतूट भर जीईएम पोर्टलवरील 19,700 कोटी रुपयांच्या ई-खरेदी उपक्रमांद्वारे आणखी ठळकपणे दिसून आला.

आपल्या भाषणादरम्यान त्यांनी एनटीपीसीच्या अलिकडच्या राष्ट्रीय आणि जागतिक उपलब्धीचा अभिमानाने उल्लेख केला, ज्यात TIME वर्ल्डच्या 2025 च्या सर्वोत्तम कंपन्यांमध्ये समावेश, जनरेशन कंपनी ऑफ द इयर पुरस्कार, सीएसआर उत्कृष्टतेसाठी सीआयआय-आयटीसी शाश्वतता पुरस्कार आणि ब्रँडन हॉल, एटीडी बेस्ट, ईटी ह्युमन कॅपिटल गोल्ड पुरस्कार सारखे मनुष्यबळ उत्कृष्टतेतील अनेक पुरस्कार आणि बालिका सशक्तिकरण मिशन (जीईएम) साठी यूएन महिला डब्ल्यूईपी पुरस्कार यांचा समावेश आहे. पश्चिम विभाग–I प्रकल्पांची कामगिरी अधोरेखित करताना, फणी कुमार यांनी सोलापूर, मौदा, अंता, कावास, झनोर आणि रत्नागिरी (RGPPL) केंद्रांचे परिचालन दक्षता, शाश्वतता प्रयत्न आणि सामुदायिक विकास उपक्रमांमधील कामगिरीचे कौतुक केले. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि गोवा येथे 81 कोटींपेक्षा जास्त खर्चाचे 57 CSR प्रकल्प राबविले जात आहेत, याचा उल्लेख करत त्यांनी सामाजिक जबाबदारीप्रति एनटीपीसी डब्ल्यूआर-I च्या दृढ वचनबद्धतेवर भर दिला. हे उपक्रम आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणीय शाश्वतता यांच्याशी निगडित आहेत, जे संयुक्त राष्ट्रांच्या सर्व शाश्वत विकास उद्दिष्टांना अनुरूप आहेत. फणी कुमार यांनी एनटीपीसीच्या बालिका सक्षमीकरण मोहिमेच्या (GEM) यशाचाही उल्लेख केला, जी या वर्षी 200 हून अधिक मुलींपर्यंत पोहोचली. त्यांनी आरोग्य आणि शिक्षण कार्यक्रमांचाही उल्लेख केला, ज्यात सरकारी शाळांमध्ये 30 विज्ञान प्रयोगशाळा आणि स्मार्ट वर्गखोल्या उभारणे समाविष्ट आहे.
या कार्यक्रमात कॉर्पोरेट संचार विभागाच्या उल्लेखनीय प्रयत्नांची देखील दखल घेण्यात आली, ज्यांनी 19 व्या पीआरसीआय ग्लोबल कम्युनिकेशन कॉन्क्लेव्हमध्ये चार प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले आणि मुंबईच्या टर्मिनल 2 विमानतळावर एनटीपीसी ब्रँडिंग आणि बीईई अंतर्गत राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसारख्या प्रभावी मोहिमा यशस्वीरित्या राबवल्या, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 800 हून अधिक शाळांनी सहभाग घेतला.
आपल्या भाषणाचा समारोप करताना फणी कुमार यांनी एनटीपीसीच्या यशात निरंतर समर्पण आणि योगदान दिल्याबद्दल कर्मचारी, त्यांचे कुटुंब आणि भागीदार संस्थांचे मनापासून आभार मानले. त्यांनी सर्वांना संस्थेच्या उत्कृष्टता, शाश्वतता आणि राष्ट्रसेवेच्या मूलभूत मूल्यांप्रती असलेल्या वचनबद्धतेला दुजोरा देण्याचे आवाहन केले. एनटीपीसीचे ध्येय केवळ वीज निर्मिती करणेच नाही तर भारताच्या विकासाला सक्षम करणे आणि देशातील प्रत्येक चौथा दिवा प्रकाशित करणे आहे यावर भर दिला.
समारंभाची सांगता केक कापून आणि फुगे सोडून झाली, त्यानंतर फणी कुमार आणि वरिष्ठ मान्यवर - मोहम्मद अशफाक सीईओ (एनजीईएल), पी. आर. जेना, जीएम (कमर्शियल); आणि वंदना चतुर्वेदी, क्षेत्रीय मानव संसाधन प्रमुख (पश्चिम-I) यांनी दक्षता जागरूकता सप्ताह प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धांच्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले.
***
माधुरी पांगे/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2187811)
अभ्यागत कक्ष : 33