पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान येत्या 20 आणि 21 डिसेंबरला आसाम दौऱ्यावर

पंतप्रधानांच्या हस्ते आसाममधील 15,600 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि कोनशीला समारंभ

गुवाहाटी येथे लोकप्रिय गोपीनाथ बरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

सुमारे 1.4 लाख चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेल्या या नव्या टर्मिनल इमारतीची वर्षाला  1.3 कोटी प्रवासी हाताळणीची क्षमता

आसामची जैव विविधता आणि सांस्कृतिक वारसा यांच्याकडून प्रेरणा घेत “बांबू ऑर्किड्स” या संकल्पनेअंतर्गत ही नवी टर्मिनल इमारत उभारण्यात आली आहे

पंतप्रधानांच्या हस्ते, दिब्रुगडमधील नामरुप स्थित आसाम व्हॅली खते आणि रसायने कंपनीच्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाचे भूमिपूजन होणार

सुमारे 10,600 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अंदाजित गुंतवणुकीसह उभारण्यात येणारा  हा प्रकल्प आसाम आणि त्याच्या शेजारी राज्यांच्या खतविषयक गरजा पूर्ण करण्यास मदत करेल आणि या खतांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करेल

गुवाहाटी येथील बोरागाव येथे असलेल्या स्वहिद स्मारक क्षेत्रापाशी जाऊन पंतप्रधान हुतात्म्यांना आदरांजली वाहतील

प्रविष्टि तिथि: 19 DEC 2025 2:29PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 20 आणि 21 डिसेंबरला आसामला  भेट देणार आहेत. दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता पंतप्रधान गुवाहाटी येथे पोहोचतील. तेथे ते लोकप्रिय गोपीनाथ बरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीची पाहणी आणि  उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.

दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास पंतप्रधान गुवाहाटी येथील बोरागाव येथे असलेल्या स्वहिद स्मारक क्षेत्रापाशी जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहतील, त्यानंतर  ते दिब्रुगडमधील नामरुप येथे पोहोचतील आणि तेथे आसाम व्हॅली खते आणि रसायने कंपनीच्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाचे भूमिपूजन करतील. या ठिकाणी देखील पंतप्रधान सभेला संबोधित करतील.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते लोकप्रिय गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन होईल. ही नवी इमारत म्हणजे आसाममधील जोडणी व्यवस्था, आर्थिक विस्तार आणि जागतिक सहभाग याबाबतीत एक परिवर्तनकारी टप्पा ठरेल.

नुकत्याच बांधून पूर्ण झालेल्या आणि सुमारे 1.4 लाख चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेल्या या नव्या टर्मिनल इमारतीची रचना दर वर्षी 1.3 कोटी प्रवाशांची हाताळणी करू शकेल अशा पद्धतीने करण्यात आली असून या कामाला धावपट्ट्या, हवाई क्षेत्र विषयक प्रणाली, अॅप्रोन्स तसेच टॅक्सीवे यांच्या संदर्भातील महत्त्वाच्या अद्यायावतीकरणाचे पाठबळ लाभले आहे.

निसर्ग संकल्पनेवर आधारित असलेल्या भारताच्या  पहिल्या  विमानतळ टर्मिनलचे डिझाईन आसामच्या जैवविविधता आणि सांस्कृतिक वारशातून प्रेरणा घेऊन, "बांबू ऑर्किड्स" या संकल्पनेपासून प्रेरित आहे. या टर्मिनलमध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या सुमारे 140 मेट्रिक टन ईशान्येकडील बांबूचा नाविन्यपूर्ण वापर करण्यात आला आहे. काझीरंगापासून प्रेरित हिरवीगार लँडस्केप, जापी नक्षीकाम, प्रतिष्ठित गेंड्याचे प्रतीक आणि कोपोऊ फुलांचे प्रतिबिंब दर्शवणारे 57 ऑर्किड-प्रेरित स्तंभ या रचनेला वेगळेच सौंदर्य देतात. जवळपास एक लाख स्थानिक प्रजातींच्या वनस्पतींनी सजलेले एक अनन्यसाधारण "आकाश वन " आगमन करणाऱ्या प्रवाशांना वनाचा अनुभव देते.

हे टर्मिनल प्रवाशांची सुविधा आणि डिजिटल नवोन्मेषाच्या बाबतीत नवीन मापदंड स्थापित करते. जलद सुरक्षा तपासणीसाठी फुल-बॉडी स्कॅनर, डिजीयात्रा-सक्षम संपर्कविरहित प्रवास, स्वयंचलित सामान हाताळणी, फास्ट-ट्रॅक इमिग्रेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विमानतळ संचालन यांसारखी वैशिष्ट्ये अखंड, सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासाची खात्री देतात.

त्यानंतर, पंतप्रधान ऐतिहासिक आसाम आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्वहिद स्मारक क्षेत्राला भेट देतील. सहा वर्षे चाललेले हे जनआंदोलन परकीयमुक्त आसाम आणि राज्याच्या अस्मितेच्या संरक्षणासाठीच्या सामूहिक संकल्पाचे प्रतीक होते.

दिवसाच्या उत्तरार्धात, पंतप्रधान आसाममधील दिब्रुगड येथील नामरूप येथे, ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सध्याच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या नवीन ब्राउनफील्ड अमोनिया-युरिया खत प्रकल्पाचे भूमिपूजन करतील.

पंतप्रधानांच्या शेतकरी कल्याणाच्या दृष्टिकोनाला पुढे नेत, 10,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त अंदाजित गुंतवणुकीचा हा प्रकल्प आसाम आणि शेजारील राज्यांच्या खतांची गरज पूर्ण करेल, आयातीवरील अवलंबित्व कमी करेल, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करेल आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देईल. हा प्रकल्प औद्योगिक पुनरुज्जीवन आणि शेतकरी कल्याणाचा आधारस्तंभ आहे.

***

निलिमा चितळे/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2206606) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , Odia , English , Khasi , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada