संसदीय कामकाज मंत्रालय
संसदेचे हिवाळी अधिवेशन संस्थगित
प्रविष्टि तिथि:
19 DEC 2025 5:47PM by PIB Mumbai
सोमवार 1 डिसेंबर, 2025 रोजी सुरू झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन शुक्रवार 19 डिसेंबर, 2025 रोजी अनिश्चित काळासाठी संस्थगित झाले. या अधिवेशनात 19 दिवसांमध्ये 15 बैठका झाल्या.
अधिवेशनादरम्यान लोकसभेत 10 विधेयके सादर करण्यात आली आणि लोकसभेने 8 विधेयके मंजूर केली. राज्यसभेनेही 8 विधेयके संमत केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मिळून एकूण 8 विधेयके मंजूर केली.

‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे झाल्याचे औचित्य साधून 8 डिसेंबर रोजी लोकसभेत आणि 9, 10 व 11 डिसेंबर 2025 रोजी राज्यसभेत विशेष चर्चा आयोजित करण्यात आली होती. लोकसभेतील चर्चेचा आरंभ पंतप्रधानांनी केला. या चर्चेत 65 सदस्यांनी भाग घेतला तर सभागृहात ही चर्चा 11 तास 32 मिनिटे चालली. राज्यसभेतील चर्चेची सुरुवात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. या चर्चेत 81 सदस्यांनी भाग घेतला आणि सभागृह नेत्यांच्या (राज्यसभा) भाषणाने तिची सांगता झाली. सभागृहात ही चर्चा एकूण 12 तास 49 मिनिटे चालली.
याशिवाय 9 आणि 10 डिसेंबर रोजी लोकसभेत आणि 11, 15 व 16 डिसेंबर 2025 रोजी राज्यसभेत निवडणूक सुधारणांवर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी लोकसभेतील चर्चेचा समारोप केला. या चर्चेत 62 सदस्यांनी भाग घेतला, ही चर्चा 12 तास 59 मिनिटे चालली. राज्यसभेत सभागृह नेत्यांनी (राज्यसभा) चर्चेचा समारोप केला. या चर्चेत 57 सदस्यांनी भाग घेतला. सभागृहात एकूण 10 तास 37 मिनिटे चर्चा झाली.
विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक, 2025 लोकसभेत सादर झाल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले.
या अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 8 विधेयके मंजूर केली आहेत, ज्यापैकी काही विधेयकांचे 'विकसित भारत'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दूरगामी परिणाम होणार आहेत.
***
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2206718)
आगंतुक पटल : 22