विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लठ्ठपणावर झटपट उपायांद्वारे उपचार करता येत नाही; चूकीच्या माहितीला आळा घाला, वजन कमी करणाऱ्या औषधांचा विवेकाने वापर करा: डॉ. जितेंद्र सिंह

प्रविष्टि तिथि: 20 DEC 2025 4:27PM by PIB Mumbai



सध्या उपलब्ध असलेल्या वजन कमी करणाऱ्या किंवा लठ्ठपणाविरोधी औषधांचा वापर अत्यंत विवेकाने केला पाहिजे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले. दोन दिवसीय "आशिया ओशनिया कॉन्फरन्स ऑन ओबेसिटी" (AOCO) च्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना, मंत्री म्हणाले की, डॉक्टर, संशोधक, धोरणकर्ते आणि इतर भागधारक एका छताखाली एकत्र येत आहेत, ही वस्तुस्थितीच भारतात लठ्ठपणाच्या वाढत्या प्रमाणाचे गांभीर्य दर्शवते.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले की, भारतात असंसर्गजन्य रोगांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. जे कोणत्या ना कोणत्या प्रकारे लठ्ठपणाशी संबंधित आहेत आणि असंसर्गजन्य रोगांमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी जवळपास 63 टक्के मृत्यू लठ्ठपणाशी संबंधित आहेत.
लठ्ठपणा व्यवस्थापनाबाबत वाढत चाललेले व्यापारीकरण आणि चुकीच्या माहितीबद्दल डॉ. जितेंद्र सिंह यांनी सर्वांना सावध करताना सांगितले  की अवैज्ञानिक दावे आणि तथाकथित झटपट उपाय अनेकदा लोकांची दिशाभूल करतात, सोबतच त्यांना पुराव्यावर आधारित उपचारांपासून विचलित करतात. केवळ औपचारिक मान्यता नेहमीच क्लिनिकल प्रॅक्टिसमधील संपूर्ण चित्र स्पष्ट करत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आणि पूर्वीच्या दशकात रिफांइड तेलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यामुळे अनपेक्षितरित्या  उद्भवलेल्या दीर्घकालीन आरोग्य परिणामांचे उदाहरण डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिले. सार्वजनिक हिताचे रक्षण करण्याच्या गरजेवर भर देत, त्यांनी विशेषतः आधुनिक माध्यमे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या जबाबदार वापराद्वारे, गैरसमज आणि चुकीची माहिती खोडून काढण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांना एकत्र आणून, AOCO लठ्ठपणाकडे केवळ एक वैद्यकीय समस्या म्हणून नव्हे, तर एक सामाजिक आव्हान म्हणून पाहते, ज्यासाठी समन्वित कृती, सातत्यपूर्ण जागरूकता आणि माहितीपूर्ण सार्वजनिक सहभागाची आवश्यकता आहे.

***

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2207001) आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Malayalam