संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुण्याच्या 'एआयटी'ला अभियांत्रिकी शिक्षण उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय आयईआय (IEI) पुरस्कार प्रदान

प्रविष्टि तिथि: 20 DEC 2025 5:36PM by PIB Mumbai


'इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया)' तर्फे पुण्याच्या 'आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'ला ('एआयटी) 'अभियांत्रिकी शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार 2025' देऊन सन्मानित करण्यात आले आहे. दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणामध्ये संस्थेने दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानाची ही एक महत्त्वाची राष्ट्रीय पावती आहे. अभियंत्यांसाठीच्या भारताच्या सर्वोच्च व्यावसायिक संस्थेने सुरू केलेला हा पुरस्कार, सातत्यपूर्ण शैक्षणिक उत्कृष्टता, नावीन्य आणि राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी सुसंगतता दर्शविणाऱ्या संस्थांना दिला जातो.
19 डिसेंबर 2025 रोजी दुर्गापूर इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे आयोजित एका राष्ट्रीय स्तरावरील समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला नामवंत शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील नेते आणि आघाडीच्या अभियांत्रिकी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सन्मानामुळे अभियांत्रिकी शिक्षणासाठीचे आयईआय चे कठोर निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांच्या निवडक गटामध्ये पुण्याच्या एआयटीला स्थान मिळाले आहे.
हा पुरस्कार पुण्याच्या एआयटीच्या शैक्षणिक शिस्त, आधुनिक अध्यापन पद्धती, प्राध्यापक विकास आणि उद्योग क्षेत्राशी असलेल्या मजबूत सहभागावरील  दीर्घकालीन भर प्रतिबिंबित करतो.  गेल्या काही वर्षांत, संस्थेने एक शिस्तबद्ध आणि निष्पत्ती-आधारित अध्ययन वातावरण विकसित केले आहे, ज्यामध्ये तांत्रिक क्षमतेची सांगड नीतिमत्ता, मूल्ये आणि व्यावसायिक जबाबदारीशी घातली गेली आहे. तंत्रज्ञान-आधारित अर्थव्यवस्थेत हे गुण अधिकच महत्त्वाचे ठरत आहेत.
'आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी' (AWES) अंतर्गत स्थापन झालेल्या पुणे एआयटीचे भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रात एक अद्वितीय स्थान आहे. नागरी शैक्षणिक चौकटीत कार्यरत असतानाही, संस्थेला शिस्त, सचोटी आणि सेवा यांनी आकाराला आलेल्या संस्थात्मक संस्कृतीचा लाभ मिळतो. यामुळे उद्योगासाठी सज्ज आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार अभियंते घडवण्यात मदत होते. या दृष्टिकोनाचा प्रभाव इथल्या पदवीधरांच्या कामगिरीत स्पष्टपणे दिसून येतो. ते आज उद्योग, संशोधन, उद्योजकता आणि राष्ट्रीय विकास उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत. त्यांचे व्यावसायिक यश भारताच्या तांत्रिक मनुष्यबळाचा पाया बळकट करण्यात पुणे एआयटी सारख्या संस्थांची भूमिका अधोरेखित करते.  
केवळ तात्कालिक ओळखीच्या पलीकडे जाऊन, हा पुरस्कार एका स्वतंत्र कामगिरीपेक्षा सातत्यपूर्ण संस्थात्मक प्रवासाची पावती म्हणून ओळखला जातो. तसेच, शैक्षणिक दर्जा उंचावणे, उद्योग-शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ करणे आणि नावीन्य व संशोधनातील योगदान वाढवणे या संस्थेवरील जबाबदारीला हा पुरस्कार अधिक बळकट करतो.
भारत अधिक तांत्रिक स्वयंपूर्णता  आणि नावीन्यावर आधारित विकासाकडे वाटचाल करत असताना, पुणे एआयटीला मिळालेला हा सन्मान अभियांत्रिकी शिक्षणातील स्थिर आणि मूल्याधिष्ठित उत्कृष्टतेचे महत्त्व अधोरेखित करतो. ही अशी एक गुंतवणूक आहे जिचा परतावा शेवटी राष्ट्रीय क्षमता आणि सामाजिक प्रगतीमध्ये मोजला जातो.

***

सुषमा काणे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2207016) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English