पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन


आधुनिक विमानतळ आणि दळणवळणीय जोडणीच्या प्रगत पायाभूत सुविधा कोणत्याही राज्यासाठी नवीन शक्यता आणि नवीन संधींची प्रवेशद्वारे म्हणून कामी येतात : पंतप्रधान

आज, आसाम आणि संपूर्ण ईशान्य भारत हा भारताच्या विकासाचे नवीन प्रवेशद्वार म्हणून उदयाला येत आहे: पंतप्रधान

ईशान्य भारत भारताच्या भविष्यातील विकासाचे नेतृत्व करेल : पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 20 DEC 2025 5:50PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन झाले. या उद्घाटनामुळे आसामधील दळणवळणीय जोडणी, अर्थव्यवस्थेचा विस्तार आणि जागतिक सहभागातील परिवर्तनाच्या दिशेने एक मोठा टप्पा गाठला गेला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. आजचा दिवस आसाम आणि ईशान्य भारताच्या विकास आणि प्रगतीचा सोहळा आहे असे ते म्हणाले. जेव्हा प्रगतीची किरणे लोकांपर्यंत पोहोचतात, त्यावेळी जीवनातील प्रत्येक मार्ग नव्या उंचीला स्पर्श करू लागतो, असे त्यांनी अधोरेखित केले. आसामच्या भूमीशी आपली नाळ घट्टपणे जोडलेली असून, इथल्या लोकांचे प्रेम आणि स्नेह, तसेच विशेषतः आसाम आणि ईशान्य भारतातील माता-भगिनींमधला जिव्हाळा आपल्याला सातत्याने प्रेरणा देत आला आहे, त्यातूनच या क्षेत्राच्या विकासाचा सामूहिक संकल्पही मजबूत झाला आहे असे त्यांनी सांगितले. आज आसामच्या विकासात पुन्हा एकदा नवी अध्याय जोडला गेला आहे  ही बाब त्यांनी नमूद केली. भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या गीतातील  ओळींचा संदर्भही त्यांनी दिला. विशाल ब्रह्मपुत्रा नदीचा काठ उजळून निघेल, अंधाराची प्रत्येक भिंत तुटून पडेल आणि हाच राष्ट्राचा संकल्प आणि पवित्र प्रतिज्ञा आहे, त्यामुळे हे निश्चितपणे घडून येईल असाच त्याचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.

भूपेन हजारिका यांच्या गीतातील ओळी म्हणजे केवळ गीत नसून आसामवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक थोर आत्म्याचा तो एक पवित्र संकल्प होता आणि आज हा संकल्प पूर्ण होत आहे असे ते म्हणाले. ज्याप्रमाणे ब्रह्मपुत्रेचा प्रवाह कधीच थांबत नाही, त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्यातील आपल्या सरकारांच्या नेतृत्वाखाली आसाममधील विकासाची धारा अविरतपणे सुरूच असल्याचे ते म्हणाले. लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन हे याच वचनबद्धतेचा पुरावा असल्याचे ते म्हणाले, तसेच या टर्मिनल इमारतीबद्दल त्यांनी आसाम आणि देशातील जनतेचे अभिनंदन केले.

आसामचे पहिले मुख्यमंत्री आणि राज्याचा अभिमान असलेल्या गोपीनाथ बर्दोलोई यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य आपल्याला लाभले असे ते म्हणाले. बर्दोलोई यांनी आसामची ओळख, भविष्य आणि हितसंबंधांशी कधीही तडजोड केली नाही, त्यांचा पुतळा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील आणि त्यांच्यात आसामबद्दलच्या अभिमानाची दृढ भावना निर्माण करेल असे पंतप्रधान म्हणाले.

आधुनिक विमानतळ सुविधा आणि दळवळणीय जोडणीच्या प्रगत पायाभूत सुविधा या, कोणत्याही राज्यासाठी नवीन शक्यता आणि संधींची प्रवेशद्वार म्हणून काम करतात , तसेच त्या लोकांमधील वाढत्या आत्मविश्वास आणि विश्वासार्हतेचे स्तंभच असतात असे त्यांनी सांगितले. जेव्हा लोक आसाममधील भव्य महामार्ग आणि विमानतळांची बांधकामे पाहतात, तेव्हा ते आसामला खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यास सुरुवात झाली असल्याची दखलपूर्ण नोंद घेतात ही बाब त्यांनी नमूद केली.

पंतप्रधानांनी या परिस्थितीची तुलना भूतकाळाशी केली आणि सांगितले की, मागील सरकारांच्या अजेंड्यावर आसाम आणि ईशान्य भारताचा विकास कधीच नव्हता. त्यांनी नमूद केले की, त्या सरकारांमधील नेते म्हणायचे की, "आसाम आणि ईशान्येकडे जातंय तरी कोण?" आणि या प्रदेशात आधुनिक विमानतळ, महामार्ग आणि चांगल्या रेल्वे मार्गांची गरज काय, असा प्रश्न ते उपस्थित करायचे. या मानसिकतेमुळेच विरोधकांनी अनेक दशके या संपूर्ण क्षेत्राकडे दुर्लक्ष केले, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

विरोधी पक्षांनी सहा-सात दशकांत केलेल्या चुका त्यांच्या नेतृत्वाखाली एक एक करून सुधारल्या जात आहेत, असे नमूद करून मोदी म्हणाले की, विरोधी पक्षनेते ईशान्येला भेट देवोत वा न देवोत, जेव्हा ते स्वतः आसाम आणि या भागात येतात, तेव्हा त्यांना आपल्याच लोकांमध्ये असल्यासारखी आपुलकी जाणवते. त्यांनी भर देत सांगितले की, त्यांच्यासाठी आसामचा विकास ही केवळ गरज नसून एक जबाबदारी आणि उत्तरदायित्व आहे. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, गेल्या अकरा वर्षांत आसाम आणि ईशान्येसाठी लाखो कोटी रुपयांचे विकास प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. आसाम अधिक प्रगती करत असून नवनवीन मैलाचे दगड प्रस्थापित करत असल्याचे त्यांनी समाधानपूर्वक नमूद केले. 'भारतीय न्याय संहिता' लागू करण्यात आसाम हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनले आहे, असेही त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, आसामने ५० लाखांहून अधिक 'स्मार्ट प्रीपेड मीटर' बसवून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. पूर्वीच्या काळाशी तुलना करताना त्यांनी सांगितले की, तेव्हा लाच किंवा शिफारशीशिवाय सरकारी नोकरी मिळणे अशक्य होते, पण आज हजारो तरुणांना अशा कोणत्याही गैरप्रकारांशिवाय नोकऱ्या मिळत आहेत.

मोदी यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या सरकारच्या काळात आसामच्या संस्कृतीला प्रत्येक व्यासपीठावर प्रोत्साहन दिले जात आहे. १३ एप्रिल २०२३ च्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून देताना ते म्हणाले की, गुवाहाटी स्टेडियमवर ११,००० हून अधिक कलाकारांनी एकत्र 'बिहू' नृत्य सादर केले, त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. असे नवनवीन विक्रम प्रस्थापित करून आसाम झपाट्याने पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

या नवीन टर्मिनल इमारतीमुळे गुवाहाटी आणि आसामची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल, त्यामुळे वर्षाला सव्वा कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील, असे सांगून यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक आसामला भेट देऊ शकतील आणि भक्तांना माँ कामाख्या देवीचे दर्शन घेणे सुलभ होईल असे त्यांनी सांगितले. या नवीन विमानतळ टर्मिनलमध्ये पाऊल ठेवल्यास वारसा  सोबत 'विकास' या मंत्राचा खरा अर्थ स्पष्टपणे दिसून येतो, असे त्यांनी सांगितले. आसामचा निसर्ग आणि संस्कृती लक्षात घेऊन विमानतळाची रचना करण्यात आली असून आतमध्ये हिरवळ आणि 'इनडोअर फॉरेस्ट' सारखी व्यवस्था असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ही रचना निसर्गाशी जोडलेली आहे. प्रत्येक प्रवाशाला शांतता आणि आराम मिळावा हा यामागचा उद्देश आहे असेही ते म्हणाले. बांधकामात बांबूच्या विशेष वापराचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, बांबू हा आसामच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, तो ताकद आणि सौंदर्य या दोन्हीचे प्रतीक आहे. मोदी यांनी 2017 मधील एका ऐतिहासिक निर्णयाची आठवण करून दिली, तेव्हा त्यांच्या सरकारने 'भारतीय वन अधिनियम, 1927' मध्ये सुधारणा करून वनक्षेत्राबाहेर वाढणाऱ्या बांबूला 'वृक्ष' ऐवजी 'गवत' म्हणून कायदेशीररीत्या वर्गीकृत केले होते. या निर्णयामुळेच आज नवीन टर्मिनलच्या रूपाने ही सुंदर वास्तू उभी राहू शकली, असे ते म्हणाले.

पायाभूत सुविधांच्या विकासात एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दडलेला असतो हे अधोरेखित करत पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले की यामुळे उद्योगांना चालना मिळते, गुंतवणूकदारांना संपर्क  व्यवस्थेबद्दल विश्वास वाटतो आणि स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग खुले होतात. ज्यांच्यासाठी नव्या संधी निर्माण होतात त्या युवा वर्गाची सर्वात जास्त खात्री पटते , यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला. आज, आसाम राज्य याच अमर्यादित संधींची झेप घेण्यासाठी आगेकूच करत आहे,”असे  पंतप्रधान म्हणाले.

आज जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे आणि भारताची भूमिका देखील परिवर्तीत झाली आहे अशी टिप्पणी पंतप्रधान मोदी यांनी केली. भारत आता जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे हे त्यांनी अधोरेखित केले. हे केवळ 11 वर्षांच्या कालावधीत कसे शक्य झाले असा प्रश्न विचारून त्यांनी सांगितले की आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासाने यामध्ये प्रमुख भूमिका निभावली. पंतप्रधान म्हणाले की विकसित भारताचा निश्चय पूर्ण करण्यासाठी, पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून भारत 2047 साठी सज्ज होत आहे. प्रत्येक राज्याचा आणि प्रत्येक प्रदेशाचा सहभाग हा या भव्य विकास अभियानाचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे हे त्यांनी अधोरेखित केले. देशातील प्रत्येक राज्य सर्वांबरोबर प्रगती करेल आणि विकसित भारताच्या अभियानात योगदान देईल हे सुनिश्चित करत सरकार वंचितांना प्राधान्य देत आहे हे त्यांनी नमूद केले. आसाम राज्य आणि ईशान्य प्रदेश या अभियानात आघाडीवर आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. अॅक्ट इस्ट धोरणाच्या माध्यमातून देशाच्या ईशान्य भागाला प्राधान्य दिले गेले आणि आज आसाम भारताचे पूर्वेकडील प्रवेशद्वार म्हणून उदयाला येत आहे हे पंतप्रधान मोदी यांनी ठळकपणे सांगितले. भारताला आसियान देशांशी जोडण्यात आसाम एखाद्या सेतूची भूमिका बजावत आहे असे ते म्हणाले. आता झालेली सुरुवात, बरीच प्रगती करेल आणि आसाम राज्य अनेक क्षेत्रांमध्ये विकसित भारताची प्रेरक शक्ती बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बहुपद्धतीय संपर्क सुविधेच्या संकल्पनेने या भागाची परिस्थिती आणि दिशा दोन्हींमध्ये रुपांतर घडवून आणले आहे हे अधोरेखित करत मोदी ठामपणे म्हणाले, “आसाम आणि संपूर्ण ईशान्य प्रदेश भारताच्या विकासाची नवी प्रवेशद्वारे होऊ लागली आहेत.ते म्हणाले की आसाममध्ये नव्या पुलांच्या उभारणीची  गती, नव्या मोबाईल मनोऱ्यांच्या उभारणीचा वेग, आणि प्रत्येक विकास प्रकल्पाची गतिमानता कित्येक स्वप्नांना वास्तवात साकार करत आहे. 

ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलांनी आसामला संपर्क व्यवस्थेच्या बाबतीत नवी ताकद आणि विश्वास दिला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहा ते सात दशके उलटूनदेखील आसाममध्ये केवळ तीन मोठे पूल उभारले गेले होते, मात्र गेल्या दशकभरात, चार नव्या भव्य पुलांचे काम पूर्ण झाले असून इतर अनेक ऐतिहासिक प्रकल्प आकाराला येत आहेत याकडे पंतप्रधानांनी सर्वांचे लक्ष वेधले. बोगीबील आणि धोला-सदिया यांसारख्या सर्वाधिक लांबीच्या पुलांनी आसामला व्यूहात्मक दृष्ट्या अधिक सशक्त केले आहे हे त्यांनी नमूद केले. रेल्वेद्वारे संपर्काच्या व्यवस्थेत देखील क्रांतिकारक बदल घडून आले असून बोगीबीळ पुलामुळे उन्नत आसाम आणि देशाचा उर्वरित भाग यांतील अंतर आता कमी झाले आहे. गुवाहाटी आणि न्यू जलपायगुडी यांच्यादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस गाडीमुळे या स्थानकांतील प्रवासाच्या वेळेत बचत झाली आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. आसाम राज्याला जलमार्गांच्या विकासाचा देखील लाभ झाला असून येथील कार्गो वाहतुकीत 140 टक्के वाढ झाली आहे. ब्रह्मपुत्रा ही केवळ येथील एक नदी नसून आर्थिक सामर्थ्याचा ओघ देखील आहे हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की पांडू येथे पहिली जहाज दुरुस्ती सुविधा विकसित करण्यात येत आहे आणि वाराणसी ते दिब्रुगड दरम्यान कार्यरत गंगा विलास जहाज पर्यटन सेवेबद्दलच्या उत्सुकतेने ईशान्य प्रदेशाला जागतिक जहाज पर्यटनाच्या नकाशावर मजबुत स्थान मिळवून दिले आहे.

आसाम आणि ईशान्य भारताला विकासापासून दूर ठेवणाऱ्या पूर्वीच्या सरकारांवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, यामुळे  देशाला सुरक्षा, एकता आणि अखंडतेच्या दृष्टीने मोठी किंमत मोजावी लागली. विरोधी पक्षांच्या राजवटीत अनेक वर्षे हिंसाचार फोफावला होता, मात्र गेल्या 10-11 वर्षांपासून तो संपवण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले. एकेकाळी ज्या ईशान्य भारतात हिंसाचार आणि रक्तपात होत होता, तिथे आज 4जी आणि 5जी तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल संपर्कप्रणाली पोहोचत आहे, असे त्यांनी सांगितले. एकेकाळी हिंसाग्रस्त म्हणून ओळखले जाणारे जिल्हे आता आकांक्षी जिल्हे म्हणून विकसित होत आहेत आणि येत्या काळात हेच प्रदेश औद्योगिक कॉरिडॉर बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ईशान्य भारताबाबत एक नवीन आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि तो आणखी मजबूत करण्याची गरज आहे यावर त्यांनी भर दिला.

आसाम आणि ईशान्य भारताच्या विकासात यश मिळत आहे, कारण सरकार या प्रदेशाची ओळख आणि संस्कृतीचे रक्षण करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. विरोधकांनी ही ओळख पुसून टाकण्याचा कट रचला होता आणि हा कट केवळ काही वर्षांपुरता मर्यादित नव्हता, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या कटाची मुळे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात रुजलेली आहेत, मुस्लिम लीग आणि ब्रिटिश सरकार भारताच्या फाळणीची तयारी करत असताना आसामला अविभाजित बंगालचा, म्हणजेच पूर्व पाकिस्तानचा भाग बनवण्याचा डाव होता, हे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसही या कटाचा भाग होणार होती, मात्र गोपीनाथ बोरदोलोई यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात उभे राहून आसामची ओळख नष्ट करण्याच्या या कटाचा विरोध केला आणि आसामला देशापासून वेगळे होण्यापासून वाचवले, असे त्यांनी सांगितले. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक देशभक्ताचा सन्मान करण्याची परंपरा आपल्या पक्षाची असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. म्हणूनच अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बोरदोलाई यांना भारतरत्न प्रदान केल्याची आठवण त्यांनी करून दिली. 

स्वातंत्र्यपूर्व काळात बोरदोलोई यांनी आसामला वाचवले असले तरी, स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या सत्ताधारी पक्षाने पुन्हा एकदा आसामविरोधी आणि राष्ट्रविरोधी कारवाया सुरू केल्या, असे पंतप्रधान म्हणाले. धार्मिक तुष्टीकरणाद्वारे आपली मतपेढी वाढवण्याचा कट रचून बंगाल आणि आसाममध्ये घुसखोरांना मोकळीक दिली. परिणामी, या प्रदेशाची लोकसंख्यात्मक रचना बदलली, घुसखोरांनी जंगले आणि जमिनींवर अतिक्रमण केले, त्यामुळे संपूर्ण आसाम राज्याची सुरक्षा आणि ओळख धोक्यात आली, असे पंतप्रधान म्हणाले. हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील सरकार आसामची संसाधने अवैध आणि राष्ट्रविरोधी अतिक्रमणांपासून मुक्त करण्यासाठी अथक परिश्रम करत आहे, असे ते म्हणाले. आसामच्या संसाधनांचा फायदा आसामच्या लोकांनाच होईल, याची खात्री करण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले. केंद्र सरकारने घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत आणि अवैध घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी ओळख प्रक्रिया सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने घुसखोरांना हटवण्याबद्दल भाष्य केले असतानाही, विरोधक आणि त्यांच्या आघाडी उघडपणे राष्ट्रविरोधी अजेंडा स्वीकारत आहे, असे ते म्हणाले. हे पक्ष घुसखोरांच्या बचावासाठी विधाने करत आहेत आणि त्यांचे वकील त्यांना स्थायिक करण्यासाठी न्यायालयात युक्तिवाद करत आहेत, अशी  टीका पंतप्रधानांनी केली.

जेव्हा निवडणूक आयोग निवडणुका निष्पक्षपणे व्हाव्यात,हे सुनिश्चित करण्यासाठी एसआयआर प्रक्रिया राबवत आहे, तेव्हा हे गट त्याला विरोध करत आहेत;अशी टिप्पणी त्यांनी केली.पंतप्रधानांनी नमूद केले  की, असे लोक आसामच्या बंधू-भगिनींच्या हितांचे रक्षण करणार तर नाहीतच शिवाय  इतरांना त्यांची जमीन आणि जंगले बळकावण्यास  देतील. त्यांच्या राष्ट्रविरोधी विचारसरणीमुळे पूर्वीच्या काळातील हिंसाचार आणि अशांतता पुन्हा निर्माण होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.त्यामुळे सतर्क राहणे, आसामच्या जनतेने एकजूटीने राहणे आणि आसामला विकास मार्गावरून भरकटण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांच्या कारस्थानांना सतत हाणून पाडणे आवश्यक आहे,यावर  त्यांनी भर  दिला.

आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे आणि भारताच्या भविष्याचा नवा सूर्योदय ईशान्येकडून होणार आहे,” असे  प्रतिपादन मोदी यांनी केले.

यासाठी आसामच्या विकासाला अग्रस्थानी ठेवून, सामायिक  स्वप्नांच्या दिशेने काम करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे,असे त्यांनी अधोरेखित केले.या संयुक्त प्रयत्नांमुळे आसाम नवीन उंचीवर पोहचेल  आणि विकसित भारताचे स्वप्न साकार होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला

या कार्यक्रमाला आसामचे राज्यपाल  लक्ष्मण प्रसाद आचार्य, आसामचे मुख्यमंत्री  हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, के. राममोहन नायडू, मुरलीधर मोहोळ, पबित्रा मार्गेरिटा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाची नव्याने बांधलेली एकात्मिक नवीन टर्मिनल इमारत धावपट्टी, एअरफील्ड प्रणाली, ॲप्रन आणि टॅक्सी वे इत्यादी  प्रमुख सुधारणांसह सुमारे 1.4 लाख चौरस मीटर परिसरात विस्तारली असून, तिची रचना दरवर्षी 1.3 कोटी प्रवासी हाताळण्यासाठी  निर्माण करण्यात आली आहे.

बांबू ऑर्किड्स" या आसामच्या जैवविविधता आणि सांस्कृतिक वारशापासून  प्रेरणा घेऊन निसर्गही संकल्पना राबवत संरचना केलेले  हे,पहिलेच विमानतळ टर्मिनल आहे. "काझीरंगापासून प्रेरित हिरवागार भूप्रदेश, जापी नक्षीकाम, प्रतिष्ठित गेंड्याचे प्रतीक आणि कोपू फुलाचे प्रतिबिंब दर्शवणारे 57 ऑर्किड-प्रेरित स्तंभांची  जोड देऊन स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या,ईशान्येकडील सुमारे 140 मेट्रिक टन बांबूचा वैशिष्ट्यपूर्ण वापर या  टर्मिनलसाठी केला   आहे. स्थानिक प्रजातींच्या जवळपास एक लाख रोपांनी युक्त असलेले अद्वितीय स्काय फॉरेस्ट’  येथे येणाऱ्या प्रवाशांना खऱ्या जंगलासारखा एक विस्मयचकित करणारा अनुभव देते.

हे टर्मिनल प्रवाशांच्या सोयी आणि डिजिटल नवोपक्रमाच्या बाबतीत नवे मापदंड स्थापित करते. वेगवान, बिनधोक सुरक्षा तपासणीसाठी फुल-बॉडी स्कॅनर, डिजीयात्रा-सक्षम संपर्करहित प्रवास, स्वयंचलित सामान हाताळणी, फास्ट-ट्रॅक इमिग्रेशन आणि कृत्रिम प्रज्ञा-आधारित विमानतळ कार्यप्रणाली यांसारखी वैशिष्ट्ये सुरळीत, सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासाची खात्री देतात.

***

सुषमा काणे/तुषार पवार/निखिलेश चित्रे/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/संपदा पाटगावकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2207041) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Gujarati , Odia , Tamil , Malayalam