शिक्षण मंत्रालय
आय. आय. एम. नागपूरच्या सहकार्याने पूर्ण होणार देशाचे हरित ऊर्जेचे लक्ष्य
आयआयएम नागपूर आणि ओएनजीसी ग्रीन यांच्यात सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
20 DEC 2025 8:32PM by PIB Mumbai
नागपूर: २५ डिसेंबर २०२५
स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेची निर्मिती करत देशाला भारताने वर्ष २०७० पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन करण्याचे ध्येय पुढे ठेवले आहे. हे साध्य करण्यासाठी, कोळसा आधारित उर्जा पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. यासाठी २०३० पर्यन्त १० गीगावॅट हरित ऊर्जा क्षमता उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी आय. आय. एम. नागपूर आणि ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) आता एकत्रितपणे कार्य करणार आहेत.
भारतीय प्रबंध संस्थान (आय. आय. एम.) नागपूर आणि ओएनजीसी ग्रीन लिमिटेड यांच्यात २० डिसेंबर रोजी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हरित व भविष्यकालीन ऊर्जेच्या क्षेत्रात संशोधन, क्षमतावृद्धी आणि धोरणात्मक उपक्रम राबविण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे.

या करारावर आयआयएम नागपूरच्या वतीने संचालक श्री. भिमराया मेत्री यांनी, तर ओएनजीसी ग्रीन लिमिटेडच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री हर्षनूपुर जोशी यांनी स्वाक्षरी केली. यावेळी आयआयएम नागपूरचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. निकुंज कुमार जैन (एक्झिक्युटिव्ह एमबीए इन एनर्जी मॅनेजमेंटचे अध्यक्ष) आणि प्रा. आलोक कुमार सिंह (अधिष्ठाता– एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन प्रोग्राम्स) उपस्थित होते. ओएनजीसीच्या वतीने दीपक कुमार, महाव्यवस्थापक (इलेक्ट्रिकल) यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.
यावेळी बोलताना जोशी म्हणाले, “ऊर्जा क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. भारताला २०७० पर्यंत नेट-झिरो बनविण्याच्या दिशेने आम्ही एकत्रितपणे काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ऊर्जा साठवण, जैवइंधन आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या भविष्यकालीन ऊर्जेच्या प्रकल्पांवर आम्ही विशेष लक्ष देणार आहोत. ग्रीन हायड्रोजन भारतासाठी खऱ्या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरणार आहे.”
डॉ. मेत्री यांनी या सहकार्याचे आंतरराष्ट्रीय महत्त्व अधोरेखित केले. “हरित ऊर्जेच्या दिशेने भारत करत असलेल्या प्रयत्नांकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. संशोधन, नेतृत्व विकास आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून भारताच्या भविष्यातील ऊर्जा परिसंस्थेला आकार देण्याचे काम या सहकार्याद्वारे होईल,” असे ते म्हणाले.
या सामंजस्य कराराअंतर्गत पर्यावरणीय शाश्वतता व ESG चौकट, नवीकरणीय ऊर्जेचे वीजप्रणालीत एकत्रीकरण, कार्बन व ग्रीन क्रेडिट बाजार, ऊर्जा साठवण, ई-मोबिलिटी धोरणे तसेच नेतृत्व विकास या प्रमुख क्षेत्रांमध्ये संयुक्तपणे काम करण्यात येणार आहे. आयआयएम नागपूरचे शैक्षणिक व धोरणात्मक कौशल्य आणि ओएनजीसी ग्रीनचा प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव यांची सांगड या उपक्रमात घातली जाणार आहे.
या सहकार्याचे फायदे थेट सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतील. स्वच्छ आणि विश्वासार्ह वीजपुरवठा, परवडणारे व शाश्वत ऊर्जा पर्याय, हरित रोजगारनिर्मिती आणि आरोग्यदायी जीवनमान यामध्ये या उपक्रमामुळे सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. भारताच्या हरित ऊर्जा परिसंस्थेला बळकटी देत, आयआयएम नागपूर–ओएनजीसी ग्रीन भागीदारी देशाच्या भविष्यातील ऊर्जा गरजा शाश्वत आणि सर्वसमावेशक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
***
सौरभ खेकडे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2207082)
आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English