रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बांबू पासून मोठ्या प्रमाणावर उत्पादन निर्मिती होणे आवश्यक असून बांबूची उत्पादने ही लोकप्रिय होण्यासाठी ती किफायतशीर दरामध्ये उपलब्ध  व्हावीत - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

Posted On: 21 FEB 2026 10:00PM by PIB Mumbai

 

नागपूर 21 फेब्रुवारी 2026

संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने एकात्मिक दृष्टिकोन ठेवून बांबू पासून मोठ्या प्रमाणावर उत्पादन निर्मिती होणे आवश्यक असून बांबूची उत्पादने ही लोकप्रिय होण्यासाठी ती किफायतशीर दरामध्ये उपलब्ध होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नागपूर एम्स येथील सभागृहात इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन एज्युकेशन अँड आर्किटेक्चरल स्टडीज- आयडियाज नागपूर तसेच कॅटलायझर फाउंडेशन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'राष्ट्रीय बांबू उत्सव 2026' चे उद्घाटन आज गडकरी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आयडियाज नागपूरचे संस्थापक उदय गडकरी,  कॅटलायझर फाउंडेशनचे आशिष कसावा,  राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे प्रामुख्याने उपस्थित होते

चीन सारख्या देशाने बांबू आधारित  अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून त्या देशातील लाखो लोकांना रोजगार दिला हे भारतात अनुकरणीय आहे असे   सांगून बांबूचे उत्पादने ही लोकप्रिय होण्याकरिता यामध्ये मूल्य वर्धन करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे कौशल्य आधारित तंत्रज्ञानाच्या साह्याने याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे ही काळाची गरज आहे असे गडकरी यांनी यावेळी  स्पष्ट  केले  . बांबूपासून वाद्य, उपकरणे ,दागिने ,वस्त्र ,लोणची यासारखे अनेक उत्पादने भारतामध्ये तयार होत असून ह्या वस्तू ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आणि किफायतशीर दरात  उपलब्ध झाल्यास  या वस्तूंना सुद्धा मोठी बाजारपेठ मिळेल .कृषी क्षेत्रात देखील   संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेताभोवती जर बांबूचे कुंपण लावले तर त्यामधून त्यांना प्राण्यांच्या त्रासापासून देखील मुक्तता मिळेल आणि बांबूची देखील निर्मिती झपाट्याने होईल असे त्यांनी सांगितले.  नागपूरपासून जवळ  असणाऱ्या बेला या गावांमध्ये 'स्मार्ट व्हिलेज प्रकल्प' तयार होणार असून यासाठी बांबूचे  रुफटॉप, दरवाजे यासारख्या वस्तू निर्माण करता आला तर या प्रकल्पातील  घराची किंमत अजून कमी होईल अशी माहिती त्यांनी दिली.

येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात   “बॅम्बू बीट्स अँड बिर्याणी”   बांबू ऑर्केस्ट्राआणि बांबू फूड शो सादर केला जाणार आहे. या महोत्सवात बांबूचा वापर करुन बांधकाम, उत्पादन डिझाईन, दागिने निर्मिती अशा विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आलेआहे. तसंच शाश्वत बांबू शेती, कार्बन ऑफसेट आणि  5 दिवसांचा प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमही होणार आहे. या महोत्सवात २५ फेब्रुवारीला   शिवारभेट कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र बांबू उद्योग धरण 2025 लागू झाल्यानंतर राष्ट्रीय बांबू उत्सव 2026 या महोत्सवात देखील पारंपारिक हस्तकलेपासून ते आधुनिक औद्योगिक उपयोगांपर्यंत संपूर्ण बांबू मूल्य साखळीचे प्रदर्शन करण्यात येणार आहे या माध्यमातून उद्योग क्षेत्र, उद्योजक, स्टार्ट अ‍प गुंतवणूकदार यांना   बांबू व्यवसायातील विविध पैलू कळणार आहेत

***

धनंजय वानखेडे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2231397) अभ्यागत कक्ष : 97