माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून तीन नवीन उपक्रमांचे अनावरण; सुलभ तंत्रज्ञान आणि बळकट 'डिजिटल आशय' परिसंस्थेवर सरकारचा भर
Posted On:
23 MAR 2026 7:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2026
माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज भारताच्या माध्यम, प्रसारण आणि डिजिटल क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी तसेच 'सर्जनशील अर्थव्यवस्थेला' चालना देण्यासाठी तीन महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ केला. 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी' (IICT) द्वारे गुगल आणि यूट्यूब यांच्या सहकार्याने राबवण्यात येणारा नॅशनल एआय स्किलिंग इनिशिएटिव्ह, वेव्हज ओटीटीवरील मायवेव्हज हा एक नागरिक निर्मिती मंच आणि डीडी मोफत डिश सेवेची उपलब्धता अधिक सुलभ करणारे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक कार्यक्रम मार्गदर्शक आणि दूरचित्रवाणी संचामधील इन बिल्ट सॅटेलाईट ट्यूनर हे ते तीन उपक्रम असून प्रामुख्याने 'ऑरेंज इकॉनॉमी' ला प्रोत्साहन देण्यासाठी, सार्वजनिक प्रसारणाचे बळकटीकरण करण्यासाठी आणि माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात एआय-कुशल कार्यबळ तयार करण्यासाठी त्यांची रचना करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी, 'यूट्यूब इंडिया'चे प्रमुख आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांसाठी किफायतशीर तंत्रज्ञान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याच्या संकल्पनेवर भर देताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, या उपक्रमांमुळे तंत्रज्ञान अधिक स्वस्त आणि सुलभ होईल. 'इन-बिल्ट सॅटेलाईट ट्यूनर' आणि प्रगत 'प्रोग्राम गाईड'मुळे नागरिक आता कोणत्याही अतिरिक्त उपकरणाशिवाय सहजपणे विविध कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतील, असे त्यांनी नमूद केले.
दुसऱ्या उपक्रमाबद्दल बोलताना त्यांनी 'मायवेव्हज्' चे वर्णन आशय निर्मात्यांसाठी एक शक्तिशाली मंच म्हणून केले. हा मंच त्यांना आशय तयार करण्यास, अपलोड करण्यास आणि सामायिक करण्यास सक्षम करेल, ज्यामुळे भारताची डिजिटल परिसंस्था अधिक बळकट होईल, असे ते म्हणाले. केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणांचा संदर्भ देत त्यांनी 'ऑरेंज इकॉनॉमी' अर्थात सर्जनशील अर्थव्यवस्था आणि सर्जनशील क्षेत्राला पाठबळ देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला.
यूट्यूबच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय एआय कौशल्यनिर्मिती उपक्रमांतर्गत सुमारे 15,000 तरुणांना कोणतेही शुल्क न घेता विनामूल्य प्रशिक्षण दिले जाईल, असे त्यांनी अधोरेखित केले.

‘क्रिएटर्स कॉर्नर’ या उपक्रमाविषयी देखील त्यांनी माहिती दिली. या उपक्रमाची लोकप्रियता वाढत असून, काही आशयांना आधीच 30 लाखांहून अधिक दर्शकपसंती मिळाली आहे. त्यांनी देशभरातील आशय निर्मात्यांना भारताची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि प्रादेशिक विविधता दर्शवण्यासाठी दूरदर्शन आणि माय वेव्हज सारख्या मंचांचा सक्रीय वापर करण्याचे आवाहन केले.
या मंचांचा लाभ घेण्याचे आवाहन करत, त्यांनी निर्मात्यांना त्यांच्या प्रदेशातील कथा मांडण्यासाठी आणि एक चैतन्यमय तसेच सर्वसमावेशक माध्यम क्षेत्र घडवण्यासाठी योगदान देण्यास प्रोत्साहित केले.
सर्जकांचे बळकटीकरण, उपलब्धतेचा विस्तार
राष्ट्रीय एआय कौशल्यविकास उपक्रम, मायवेव्हज मंच आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक कार्यक्रम मार्गदर्शकासह दूरचित्रवाणी संचांमध्ये इनबिल्ट उपग्रह ट्युनर्स बसवण्याची सुरुवात या तीन उपक्रमांविषयी बोलताना, माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी या तिन्ही उपक्रमांतून सामायिक धोरणात्मक दिशेचे दर्शन होत आहे यावर अधिक भर दिला. गुणवत्तापूर्ण प्रसारणाच्या अधिक विस्तृत उपलब्धतेची सुनिश्चिती करतानाच सर्जकांसाठी सशक्त परिसंस्था उभारणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे.
राष्ट्रीय एआय कौशल्यविकास उपक्रम सर्जकांना क्षमता निर्मिती करण्यासाठी तसेच नव्याने उदयाला येत असलेल्या डिजिटल परीदृश्यात त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत करतो. मायवेव्हज हा मंच नागरिकांना कार्यक्रम निर्मिती, अपलोड तसेच सामायिक करणे शक्य करत चैतन्यपूर्ण डिजिटल परिसंस्थेच्या निर्मितीला बळ देतो. तर डीडी मोफत डिश हा तिसरा उपक्रम नागरिकांना सेट-टॉप बॉक्सची गरज न लागता कार्यक्रम उपलब्ध करून देऊन, दुर्गम भागांमध्ये कार्यक्रमांची पोहोच सुधारतो.
थोडक्यात सांगायचे तर, पहिला उपक्रम जनतेला सक्षम बनवेल, दुसरा संधींचा विस्तार शक्य करेल तर तिसरा कार्यक्रमांची सर्वांसाठी उपलब्धता सुनिश्चित करेल.

एआयच्या माध्यमातून सर्जकांचे सक्षमीकरण
भागीदारीचा सर्जकांवर होणाऱ्या परिणामांबाबत बोलताना, यु ट्यूब वाहिनीचे भारतासाठीचे व्यवस्थापकीय संचालक गुंजन सोनी म्हणाले, “भारताच्या चैतन्यपूर्ण सर्जक अर्थ्यव्यवस्थेसाठी उल्लेखनीय संधी खुल्या करण्याची क्षमता एआय मध्ये आहे यावर आमचा विश्वास आहे. केंद्रोय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच आयआयसीटी यांच्याशी केलेल्या सहयोगाच्या माध्यमातून सर्जक तसेच व्यावसायिकांना भविष्यातील साधनांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्यांनी सुसज्जित करणे, अधिक मनोरंजक कथा सांगण्यासाठी एआयचा वापर करणे, नव्या प्रेक्षकांपर्यंत त्यांची पोहोच विस्तारणे आणि माध्यमांच्या भविष्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
राष्टीय एआय कौशल्यविकास उपक्रम
गुगल तसेच यु-ट्यूबशी भागीदारी करत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्जनशील आणि माध्यम क्षेत्रांतील 15,000 सहभागींना प्रशिक्षित करण्यासाठी राष्ट्रीय एआय कौशल्यविकास उपक्रमाची घोषणा केली आहे.
हा एआय कौशल्यविकास कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये राबवण्यात येईल. पहिल्या टप्प्यात, दिनांक 23 मार्च ते 30 जून 2026 या कालावधीत गुगल करियर प्रमाणपत्र आणि गुगल क्लाऊड जनरेटिव्ह एआय अध्ययन मार्गांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मूलभूत एआय शिक्षणावर लक्ष केंद्रित करेल. यात सहभागी झालेल्यांना एआय ईसेन्शियल्स, प्रॉम्पटिंग ईसेन्शियल्स, जनरेटिव्ह एआयची ओळख आणि जनरेटिव्ह एआय नेतृत्व मार्ग यांसारखे अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. पुढील टप्प्याकडे वाटचाल करण्यासाठी हा टप्पा यशस्वीरीत्यापूर्ण करणे अनिवार्य असेल.
दुसरा टप्पा जुलै ते डिसेंबर 2026 या कालावधीत आयोजित केला जाणार असून यात सर्जनशील उद्योगासाठी प्रगत, प्रत्यक्ष कृतीवर आधारित आणि प्रकल्प-केंद्रित विशेष प्रशिक्षणावर भर दिला जाईल. या अभ्यासक्रमात कथाकथनाची कला, YouTube वरील सर्वोत्तम कार्यपद्धती आणि Gemini 3, Nano Banana, Veo व Vertex AI यांसारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांचा वापर करून दिले जाणारे प्रगत प्रशिक्षण यांवरील मॉड्यूल्सचा समावेश असेल. हे प्रशिक्षण देशभरातील प्रमुख शहरांमध्ये आयोजित केले जाईल.

हा उपक्रम क्रिएटर्स, प्रसारमाध्यम क्षेत्रातील व्यक्ती, विद्यार्थी आणि डेव्हलपर्स यांना भविष्यासाठी सज्ज करणारी कौशल्ये विकसित करण्यास मदत करेल; तसेच, डिजिटल आशय आणि नवोन्मेषाचे जागतिक केंद्र म्हणून भारताच्या उदयामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल.
MyWaves- वेव्ह्ज ओटीटीअंतर्गत नागरिक निर्मिती मंच
मंत्रालयाने वेव्ह्ज ओटीटी मंचावर 'मायवेव्ह्ज' (MyWaves) या नवीन वैशिष्ट्याची घोषणा केली, जे नागरिकांना आशय तयार करण्यास, अपलोड करण्यास आणि सामायिक करण्यास सक्षम करेल. मायवेव्ह्ज हे वापरकर्त्यांनी तयार केलेल्या आशयसाठी (UGC) एक संरचित मंच म्हणून तयार करण्यात आले असून ते 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज' सारख्या राष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभागास देखील साहाय्य करेल.
हा मंच आशय पाहण्यापासून सक्रिय सहभागाकडे बदल घडवतो. वेव्ह्ज ओटीटी केवळ पाहण्यासाठीच नव्हे, तर निर्मितीसाठीही एक मंच पुरवतो. शॉर्ट व्हिडिओ, व्हर्टिकल व्हिडिओ आणि एपिसोडिक कंटेंटसह बहुविध स्वरुपांना मायवेव्ह्ज पाठबळ पुरवेल आणि भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक इंटरफेस प्रदान करेल. मायवेव्ह्ज देशभरातील उदयोन्मुख क्रिएटर्स आणि स्टोरीटेलर्ससाठी एक महत्त्वाचा मंच म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे.
दूरचित्रवाणी संचांमध्ये प्रगत ईपीजी आणि अंतर्निहित उपग्रह ट्यूनर
दूरचित्रवाणी पाहण्याचा अनुभव अधिक सुलभ आणि सहज व्हावा, यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 'अंतर्निहित उपग्रह ट्यूनर' (built-in satellite tuners) असलेले दूरचित्रवाणी संच, तसेच एक नवीन आणि वापरकर्त्यांसाठी अत्यंत सोपी अशी 'कार्यक्रम मार्गदर्शिका' (ईपीजी ) सादर केली आहे. या उपक्रमामुळे, प्रेक्षकांना 'डीडी फ्री डिश' वरील वाहिन्या पाहण्यासाठी कोणत्याही स्वतंत्र 'सेट-टॉप बॉक्स'ची आवश्यकता भासणार नाही; ते या वाहिन्या थेट आपल्या दूरचित्रवाणी संचावरच पाहू शकतील. परिणामी, अतिरिक्त खर्च, वायरींचा पसारा आणि अनेक रिमोट हाताळण्याचा त्रास यामुळे वाचणार आहे. तसेच ही नवी प्रगत कार्यक्रम मार्गदर्शिका वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी, अत्यंत साध्या आणि सहज समजणाऱ्या इंटरफेसद्वारे, विविध वाहिन्या आणि कार्यक्रमांचे वेळापत्रक सहजपणे पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देईल, यामुळे देशभरातल्या घरांमध्ये दूरचित्रवाणी पाहण्याचा एकूणच अनुभव अधिक सुविधाजनक होईल.

माहिती आणि प्रसारण मंत्रालय, 'ऑरेंज इकॉनॉमी' म्हणजेच सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या, सार्वजनिक प्रसारणास बळकटी देण्यासह त्याची सुलभता वाढवण्याच्या आणि माध्यम व मनोरंजन क्षेत्रासाठी एआय तंत्रज्ञानात कुशल व भविष्यासाठी सज्ज कार्यदल निर्माण करण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, हे प्रयत्न पुढे नेत आहे. सार्वजनिक प्रसारणाच्या सुधारणेमध्ये 'प्रसार भारती' आपली महत्त्वाची भूमिका सातत्याने बजावत आहे; तर 'आयआयसीटी' हे सर्जनशील क्षेत्रासाठी एआय कौशल्य विकास कार्यक्रमाचे संचालन करेल आणि 'वेव्ह्ज ओटीटी', क्रिएट इन इंडिया चॅलेंज समन्वयासह नागरिक सहभाग व आशय निर्मितीसाठी मंच पुरवेल.
* * *
सुषमा काणे/शैलेश पाटील/संजना चिटणीस/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2244112)
अभ्यागत कक्ष : 14