आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते 'नवोन्मेष आणि सर्वसमावेशकता : भारताच्या आरोग्य भविष्याला आकार देणाऱ्या सर्वोत्तम पद्धती' यावरील 10 व्या राष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन
Posted On:
30 APR 2026 9:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 एप्रिल 2026
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी आणि हरियाणाच्या आरोग्य मंत्री आरती सिंह राव यांच्या उपस्थितीत 'नवोन्मेष आणि सर्वसमावेशकता: भारताच्या आरोग्य भविष्याला आकार देणाऱ्या सर्वोत्तम पद्धती' या विषयावरील 10 व्या राष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन केले.
ही शिखर परिषद राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी आरोग्य क्षेत्रातील पथदर्शी नवकल्पना आणि सर्वोत्तम पद्धती प्रदर्शित करण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करते. यात देशभरात सर्वसमावेशक, सुलभ आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवेला चालना देण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
या प्रसंगी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांचे महत्त्व नड्डा यांनी अधोरेखित केले. हे उपक्रम आघाडीच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी कामाचे वातावरण सुलभ करण्याच्या, सेवा वितरण वाढवण्याच्या आणि आरोग्यविषयक परिणाम सुधारण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहेत. त्यांनी यावर जोर दिला की, सेवा पुरवठादार आणि लाभार्थी या दोघांच्याही गरजांना प्रतिसाद देणाऱ्या कार्यक्षम, एकात्मिक आणि कार्यक्षम प्रणालींची योजना करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

नड्डा यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुधारित नियोजन आणि अंमलबजावणीच्या गरजेवरही भर दिला. संसाधनांचा इष्टतम वापर होण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) आणि सामुदायिक आरोग्य अधिकारी (सीएचओ) यांच्यासह क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या तरतुदींविषयी अधिक जागरूकता असणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. उत्तरदायित्व आणि उत्तम परिणाम सुनिश्चित करण्यासाठी निधीचा वेळेवर वापर, सर्व संबंधित घटकांमध्ये अधिक मजबूत समन्वय आणि लोकप्रतिनिधींसोबत सक्रिय सहभाग यांच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.
आपल्या भाषणाचा समारोप करताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की, आर्थिक संसाधने उपलब्ध असली तरी त्यांचा प्रभावी आणि वेळेवर वापर करणे हे फार महत्त्वाचे आहे. भारतासाठी एक मजबूत, सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सज्ज आरोग्यसेवा प्रणाली निर्माण करण्याचे ध्येय साध्य व्हावे, यादृष्टीने सुशासन मजबूत करणे, संवाद वाढवणे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत अंमलबजावणी सुनिश्चित करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

या प्रसंगी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अनुकरणीय नवकल्पनांवरील सर्वोत्तम कार्यपद्धती संग्रह, 17 व्या सामायिक पुनरावलोकन अभियानाचा (सीआरएम) अहवाल, स्वस्थ भारत पोर्टल, जननी पोर्टल, प्राथमिक आरोग्य पथकांसाठी एकात्मिक प्रशिक्षण मॉड्यूल आणि आरबीएसके 2.0 यांसोबतच लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमधील मधुमेहावरील मार्गदर्शनपर दस्तऐवज यांसारखे अनेक महत्त्वाचे उपक्रम सुरू करण्यात आले.

* * *
सोनाली काकडे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257147)
अभ्यागत कक्ष : 14