गृह मंत्रालय
जनगणना 2027 अंतर्गतचा महाराष्ट्रातील पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण
प्रविष्टि तिथि:
15 JUN 2026 6:41PM by PIB Mumbai
मुंबई, 15 जून 2026
जनगणना 2027 साठी महाराष्ट्रात गृहसूची आणि गृह गणनेचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण; राज्यभरात 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत हा पहिला टप्पा राबवला.
या टप्प्यादरम्यान प्रगणकांनी त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या गृह सूची क्षेत्रातील कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची उत्तरे एका मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून संकलित केली.
हे प्रश्न प्रामुख्याने घरांची स्थिती, त्या त्या कुटुंबांना उपलब्ध असलेल्या सुविधा आणि कौटुंबिक मालमत्ता या बाबींशी संबंधित होते. जनगणनेच्या अनुषंगाने कुटुंबांनी पुरवलेली सर्व वैयक्तिक माहिती कायद्याद्वारे सुरक्षित असून, ही माहिती पूर्णतः गोपनीय असणार आहे.
या टप्प्यात राबवल्या गेलेल्या गृह सूची प्रक्रियेमुळे घरांची स्थिती, कौटुंबिक सुविधा आणि मालमत्तांची उपलब्धता याबद्दलची माहिती संकलित होणार आहे. यासोबतच फेब्रुवारी 2027 मध्ये होणाऱ्या मुख्य लोकसंख्या प्रगणनेसाठी (Population Enumeration) आवश्यक असलेला आराखडाही यामुळे आखता येणार आहे. त्यामुळे या जगगणनेत प्रत्येक घटकाची नोंद होईल याची सुनिश्चिती होमार आहे.
महाराष्ट्रातील जनगणना 2027 चा हा पहिला टप्पा सर्व 36 जिल्हे आणि 29 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये राबवला गेला. यासाठी मुख्य जनगणना अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही प्रगणना प्रक्रिया सुरळीत आणि नियोजनबद्धतीने पार पडावी याण्यासाठी एकूण 2,20,514 गृह सूची क्षेत्रांची आखणी केली गेली होती, आणि त्यासंबंधीची जबाबदारी वैयक्तिक प्रगणकांकडे सोपवण्यात आली होते. या अंतर्गत प्रत्येक सहा प्रगणकांच्या गटाच्या कामाची देखरेख करण्याची जबाबदारी प्रत्येकी एका पर्यवेक्षकाने पार पाडली.
ही मोहीम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये 34 जिल्हाधिकारी आणि 29 महानगरपालिका आयुक्तांसह 63 मुख्य जनगणना अधिकारी, 947 चार्ज अधिकारी, 141 मुख्य प्रशिक्षक, 3,850 क्षेत्र प्रशिक्षक आणि सुमारे 2.45 लाख प्रगणक तसेच पर्यवेक्षक तैनात करण्यात आले होते.
देशातली याआधीची अखेरची जनगणना 2011 मध्ये झाली होती. आगामी जनगणना 2027 ही देशातील 16 वी आणि स्वातंत्र्योत्तर काळातील 8 वी जनगणना ठरणार आहे.
ही मोहीम निर्धारित मुदतीत यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व प्रगणक, पर्यवेक्षक आणि जनगणनेशी संबंधित इतर कर्मचाऱ्यांबद्दल महाराष्ट्र जनगणना संचालन संचालनालयाने आभार व्यक्त केले आहेत. यासोबतच जनगणना 2027 च्या या गृह सूची आणि गृह गणना करण्याच्या टप्प्यात मोलाचे सहकार्य आणि पाठबळ दिल्याबद्दल संचालनालयाने राज्यातील नागरिक, महाराष्ट्र राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि प्रसारमाध्यम संस्थांचेही आभार मानले आहेत.
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2273172)
आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English