MIFF banner

भारताला जागतिक सर्जनशीलतेचे ऊर्जाकेंद्र बनवण्याच्या संकल्पासह 19 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – मिफ्फ 2026 चा शुभारंभ


माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल. मुरूगन यांनी भारताची माध्यम अर्थव्यवस्था, जागतिक कथाकथन क्षमता आणि सर्जक- प्रणित भविष्य यांचे उर्जित होणारे यश केले अधोरेखित

मुंबई, 15 जून 2026

 

माहितीपट, लघुकथा आणि अॅनिमेशनपटांसाठीचा प्रमुख चित्रपट महोत्सव असलेल्या 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ्फ 2026 चे सोमवारी संध्याकाळी मुंबईत दादर इथल्या रवींद्र नाट्य मंदिरात शानदार सोहळ्यात उद्घाटन झाले. चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम, सांस्कृतिक विविधता आणि सर्जनशील कल्पना यांच्या भव्य उत्सवात आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा झाला.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले. आपल्या बीजभाषणातून त्यांनी, आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्याची रूपरेषा मांडली. भारत, कथाकथन, आशय निर्मिती आणि सर्जनशील उद्योजकता यांचे उदयोन्मुख जागतिक केंद्र होत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित. केले.

भारतातील मीडिया आणि मनोरंजन उद्योग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, अत्यंत वेगाने बहरत असल्याचे डॉ मुरूगन यांनी सांगितले.”भारत आज जगभरात, आशय निर्मितीचा एक विश्वासार्ह भागीदार आणि सर्जनशील ऊर्जाकेंद्र म्हणून ओळखला जात आहे. आपल्या कथांमधे, जगभरातील प्रेक्षकांना प्रेरणा देण्याची ताकद आहे, जगभरात आपल्यासारख्या गुणवत्तापूर्ण सर्जक शक्तीची कुठेही तुलना होऊ शकत नाही,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

“भारतातील माध्यम आणि मनोरंजन उद्योग, वर्ष 2025 मध्ये, 9 टक्क्यांनी वाढत, 2.78 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला,  यात वेगवान डिजिटल परिवर्तन आणि विस्तारत असलेल्या आशय लोकप्रियतेचा मोठा वाटा आहे. डिजिटल मीडिया हा या उद्योगातील सर्वात मोठा घटक बनला असून, प्रथमच त्याचे उत्पन्न एक लाख कोटींच्या टप्प्यापलीकडे गेले आहे.” असेही त्यांनी सांगितले.

वर्ष 2028 पर्यंत हा उद्योग, 3.3 लाख कोटींवर पोहोचण्याचा अंदाज असून, वार्षिक सरासरी सात टक्क्यांहून अधिक चक्रवाढ दराने, वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच, 2025 या वर्षात भारतात 1,900 हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यामुळे चित्रपटगृहांतील महसुलात 16 टक्क्यांची वाढ झाली आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई भारताची सर्जनशील राजधानी असल्याचे सांगत, मुरूगन यांनी, 2025 मध्ये मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) च्या यशस्वी आयोजनाची आठवण करून दिली. तसेच, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारखे व्यासपीठ भारताला जगातील आघाडीचे ‘सर्जनशील आशय केंद्र’ बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेला बळ देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले.

‘वेव्हज डॉक बाजार’  या उपक्रमाचे  माहितीपटकाराना निर्माते, वितरक, या उद्योग क्षेत्रातील तज्ञ आणि जागतिक प्रेक्षकांशी जोडणारा एक मोठा मंच म्हणून वाढते महत्वही डॉ. मुरुगन यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले.  हा उपक्रम उदयोन्मुख प्रतिभा आणि प्रस्थापित व्यावसायिक तज्ञांमधील दरी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरत असून, या माध्यमातून परिणाम साधणाऱ्या माहितीपटांची निर्मिती आणि अशा माहितीपटांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर वितरण करणे शक्य होऊ लागले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एनएफडीसी म्हणजेच राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि या महोत्सवाशी संबंधित इतर सर्व भागधारकांचे त्यांनी अभिनंदन केले. मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 (MIFF 2026) हा महोत्सव नवोन्मेष, सर्जनशिलता आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या भविष्याला नवा आयाम देण्यात महत्त्वाचे योगदान देईल, असा विश्वास डॉ. मुरुगन यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार हे देखील या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी शेलार यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या महोत्सवासाठी जगभरातून आलेल्या सर्व सहभागींचे त्यांनी मुंबईत स्वागत केले. सर्जनशील उद्योग क्षेत्राला पाठबळ देण्याप्रति राज्य सरकारची वचनबद्धताही त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली.इंडियन इंस्टीट्युट ऑफ क्रिएटीव्ह टेक्नोलॉजी मुंबईत स्थापन केल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. केंद्र सरकारच्या सहकार्याने मिडिया हब उभारण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे ते म्हणाले. जागतिक ऑडिओ व्हिज्यूअल अँड एन्टरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्हजचे मुंबईत आयोजन केल्याबद्दल, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली.    

त्याआधी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भारताची नागरी संस्कृती ही विचारांची मुक्त देवाणघेवाण आणि सर्जनशील अभिव्यक्ती या मूल्याचा विश्वास जोपासणारी आहे, आणि मिफ्फ महोत्सव या विश्वासाचाच सोहळा आहे ही बाब त्यांनी आपल्या स्वागतपर भाषणातून अधोरेखित केली. चारही  दिशांनी उदात्त विचार आपल्याकडे यावेत, या ऋग्वेदातील चिरंतन आवाहनाचा संदर्भही त्यांनी मांडला. हा महोत्सव जगभरातील चित्रपट, विचार आणि चित्रपटकर्त्यांना एकत्र आणणारा महोत्सव आहे असे ते म्हणाले. अधिक सखोल दडलेले वास्तव शोधण्याचे धाडस करणाऱ्या आणि ते प्रभावीपणे सिनेमॅटिक मांडणीच्या माध्यमातून सादर करणाऱ्या चित्रपटकर्त्यांसाठी महत्त्वाचा मंच उपलब्ध करून देण्याची जबाबदारी हा महोत्सव सातत्याने पार पाडत राहील असेही त्यांनी सांगितले. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, मिफ्फ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “भारतात सर्जन करा” ह्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दिसते, असे माहिती प्रसारण सचिवांनी यावेळी सांगितले. या महोत्सवामुळे, ज्यांना वास्तवाचा शोध घेऊन, सिनेमाच्या माध्यमातून ते मांडायचे आहे, अशा धाडसी चित्रपट निर्मात्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. 

भारतीय चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी जयदीप अहलावत यांचा गौरव

यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी प्रख्यात अभिनेते जयदीप अहलावत यांचा गौरव केला गेला. हा या कार्यक्रमातील एक महत्वाचा क्षण ठरला. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

या सन्मानानासाठी अहलावत यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. अर्थपूर्ण कथात्मक मांडणीला अवकाश मिळवून देण्यात तसेच मुख्य प्रवाहातील मांडणीच्या पलीकडे जाऊन सिनेमॅटिक अभिव्यक्तिला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मिफ्फसारखे महोत्सव महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.

उद्घाटनपर चित्रपटांमधील कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान

या सोहळ्यात महोत्सवाच्या उद्घाटनपर चित्रपटांच्या पडद्या मागील सर्जनशील चमूचा देखील गौरव करण्यात आला. 'अगापितो' (Agapito) हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा लघुपट आणि ‘टाईम ॲण्ड वॉटर’ (Time & Water) या माहितीपटाच्या प्रतिनिधींचा व्यासपीठावर सत्कार करण्यात आला.

'अगापितो' (Agapito) मधील अभिनेता अँटोन नोलास्को आणि कास्टिंग डायरेक्टर मा. ख्रिस्तीना सायमन यांचा गौरव करण्यात आला. तसेच, प्रेक्षकांपर्यंत प्रभावी जागतिक कथानक पोहोचवल्याबद्दल 'टाइम अँड वॉटर' (Time & Water) शी संबंधित नॅशनल जिओग्राफिक आणि जिओस्टार (JioStar) च्या टीममधील सदस्यांचाही सन्मान करण्यात आला.

परीक्षकांचा सत्कार

उद्घाटनाच्या आणखी एका भागात, महोत्सवातर्फे आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षक (ज्युरी), राष्ट्रीय स्पर्धा परीक्षक आणि 'फिप्रेस्की' (FIPRESCI) परीक्षकांचे औपचारिक स्वागत आणि सत्कार करण्यात आला.

ज्युरी पॅनेलमध्ये भारत आणि जगभरातील चित्रपट निर्माते, समीक्षक, अभ्यासक, प्रोग्रॅमर आणि माध्यम व्यावसायिकांचा समावेश असून, त्यांच्यावर माहितीपट, लघुपट आणि ऍनिमेशन चित्रपटांच्या वैविध्यपूर्ण निवडीचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

उद्घाटन समारंभात भारताचा कलात्मक वारसा दर्शवणारा एक बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला. या समारंभाला प्रख्यात चित्रपट निर्माते आणि इफ्फी 2026 चे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर, एनएफडीसीचे अध्यक्ष कृष्णकुमार जी, इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्यूसर्स असोसिएशन (आयडीपीए) चे अध्यक्ष संस्कार देसाई, मिफ्फ आणि एनएफडीसीचे महोत्सव संचालक प्रकाश मगदूम, उद्योग क्षेत्रातील धुरीण, चित्रपट निर्माते, ज्युरी सदस्य आणि भारतातील तसेच परदेशातील मान्यवर पाहुणे उपस्थित होते.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे दर दोन वर्षांनी आयोजित केला जाणारा आणि एनएफडीसीद्वारे अमलात आणला जाणारा यंदाचा सात दिवसांचा महोत्सव, चित्रपट निर्माते, चित्रपटसृष्टीतील व्यावसायिक आणि चित्रपटप्रेमींना नक्कीच समृद्ध अनुभव देणारा ठरेल. यंदाच्या महोत्सवासाठी एकूण 1,459 प्रवेशिका प्राप्त झाल्या असून, 46 देशांच्या सुमारे 350 चित्रपटांची प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. त्यामुळे मिफ्फ 2026, हा सर्वात भव्य महोत्सावांपैकी एक ठरेल. प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील प्रतिभेचा अविष्कार सादर करण्यासाठी आणि भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करण्यासाठी, यंदाच्या इफ्फी महोत्सवात, 'मराठी चित्रपट' (Marathi Films) आणि 'ईशान्येकडील प्रतिध्वनी' (Echoes from North East) हे दोन नवीन विभाग समाविष्ट करण्यात आले आहेत.

यंदाच्या मिफ्फमध्ये भारत आणि जगभरातील चित्रपट, आवाज आणि दृष्टिकोनांचा एक अद्भूत संग्रह एकत्र आणण्‍यात आला आहे; या पॅकेजविषयीच्या अधिक तपशीलांसाठी येथे क्लिक करावे...  

Please find the high resolution photos of the MIFF events here

 

19 व्या मिफ्फविषयी

नॉन फिचर फिल्म्सना समर्पित असलेला हा महोत्सव दक्षिण आशियातला सर्वात जुना आणि सर्वात मोठा चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) हा माहितीपट, लघुकथा-चित्रपट आणि ॲनिमेशन चित्रपट निर्मितीचा एक चैतन्यमयी उत्सव ठरला आहे. वर्ष 1990 मध्ये सुरू झालेला आणि केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत आयोजित केला जाणारा हा महोत्सव आता एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय मंच बनला असून तो जगभरातल्या चित्रपट निर्माते, कलाकार आणि रसिकांना आकर्षित करतो.

19 वा मिफ्फ प्रेक्षकांना तल्लीन आणि समृद्ध करणाऱ्या चित्रपटांच्या अनुभूतीची ग्वाही देतो. विचारपूर्वक निवड केलेले आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि चित्रपट क्षेत्रावर  केंद्रित अनेक उत्तमोत्तम, उत्कंठावर्धक उपक्रम या महोत्सवात आहेत.

या वर्षी महोत्सवाच्या स्पर्धा विभागात भारतासह 46 देशांच्या 1,459 चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या. महोत्सवात 42 हून अधिक भारतीय भाषांमधले तसेच 30 हून अधिक परदेशी भाषांमधले चित्रपट असून यातून महोत्सवाची जागतिक व्याप्ती आणि सांस्कृतिक विविधता प्रतिबिंबित होते. जगभरातील प्रसिद्ध चित्रपटनिर्मात्यांच्या कलाकृतींचा समावेश असलेल्या या महोत्सवात उत्कृष्ट माहितीपट, लघुकथा-चित्रपट, ॲनिमेशन, नवोदित दिग्दर्शकांचे चित्रपट आणि विद्यार्थ्यांचे चित्रपट सादर केले जातील.

चित्रपटांसोबतच डॉक बझार, ज्ञानवर्धक मास्टरक्लासेस आणि आयडीपीएद्वारे (भारतीय माहितीपट निर्माते संघ) आयोजित ओपन फोरम, यामुळे महोत्सवातील चित्रपटविषयक, सर्जनशील आदानप्रदान अधिक समृद्ध होईल.

प्रभावी चित्रपट, सर्जनशील मने आणि भारून टाकणारे आवाज, यांच्या संगमातून निर्माण होणारा  माहितीपट, ऍनिमेशन आणि लघुपट यांचा अविस्मरणीय सोहळा - मिफ्फ 2026!  कथा सादर करण्याच्या या अद्भुत विश्वात तुमचे स्वागत आहे -मिफ्फ 2026!

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/ आशिष सांगळे/ हर्षल अकुडे/ सुवर्णा बेडेकर/ राधिका अघोर/ तुषार पवार/ राजश्री आगाशे/ सोनाली काकडे/ दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2273271   |   Visitor Counter: 26

इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Gujarati , Tamil , हिन्दी