शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि युरोपमधील डीप टेक तंत्रज्ञानाशी संबंधित नवीन भागीदारीला गती देण्यासाठी निस येथे भारत इनोव्हेट्स 2026 या उपक्रमाचा प्रारंभ


या उपक्रमाच्या निमित्ताने जागतिक गुंतवणूकदार, नवोन्मेषक आणि शैक्षणिक क्षेत्र आले एकत्र

या कार्यक्रमात नवोन्मेषावर भर असलेल्या सामंजस्य करारांसह 30 पेक्षा जास्त भागीदारींवर तसेच संयुक्त जाहीरनाम्यांवर स्वाक्षऱ्या

नितीमूल्या़ंना महत्वाचे मानणारे संस्थापक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्व घडवण्यात उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची : एन.आर.नारायण मूर्ती

प्रविष्टि तिथि: 15 JUN 2026 10:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2026

​पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल संयुक्तपणे फ्रान्समधील निस इथल्या पॅलेस दे एक्स्पोझिशन्स इथे भारत इनोव्हेट्स 2026 या उपक्रमाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन केले.  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोठ्या प्रमाणावर परिणामकारक ठरणारा उपक्रम असून, देशातील डीप टेक तंत्रज्ञानाशी संबंधित नवोन्मेषक आणि जागतिक भागधारकांमधील नवोन्मेषाधारीत भागीदारीला पुढची दिशा देणारा एक प्रमुख मंच म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे.

​या उपक्रमाच्या निमित्ताने 120 भारतीय नवोन्मेषक, 15 पेक्षा जास्त उच्च शिक्षण संस्था आणि जागतिक पातळीवरील मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वे तसेच आघाडीच्या व्हेंचर कॅपिटल कंपन्यांसह 500 पेक्षा जास्त जागतिक भागधारक एकत्र आले. या उपक्रमातून वेगाने विस्तारत असलेल्या भारताच्या डीप टेक तंत्रज्ञान परिसंस्थेचे जगाला दर्शन घडवले जात आहे. हा उपक्रम प्रगत संगणन, सेमीकंडक्टर्स, अंतराळ तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, ऊर्जा, आरोग्य सेवा आणि उत्पादन यांसह 13 महत्त्वाच्या क्षेत्रांमधील प्रगती ठळकपणे अधोरेखित केली गेली आहे. 

​भारत इनोव्हेट्स 2026 च्या पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय नवोन्मेष कॉरिडॉर तसेच डीप टेक क्षेत्राअंतर्गतच्या भागीदारीला बळकटी देण्याच्या उद्देशाने बीज भाषणे, धोरणात्मक संवाद आणि जागतिक उद्योग क्षेत्रासंबंधीच्या चर्चां असे व्यापक आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत दुपारच्या सत्राची सुरुवात इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या बीज भाषणाने झाली. त्यांनी जागतिक पातळीवर स्पर्धात्मक तंत्रज्ञान उद्योगाच्या उभारणीत शैक्षणिक संस्थांची भूमिका अधोरेखित केली. नीतीमूल्या़ंना महत्वाचे मानणारे संस्थापक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्व घडवण्यात उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थांची भूमिका किती महत्त्वाची भूमिका असते याबाबतची मांडणीही त्यांनी केली. अशा रितीने घडलेली प्रतिभा ज्ञानाचे नवोन्मेषात, नवोन्मेषाचे उद्योगात आणि उद्योगाचे दीर्घकालीन सामाजिक परिणामकारतेत रूपांतर घडवून आणू शकतात, असेही त्यांनी अधोरेखित केले.

भारतीय आणि जागतिक नवोन्मेष परिसंस्थांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेले नवोन्मेष केंद्रित सामंजस्य करार  तसेच संयुक्त घोषणांसह  30 हून अधिक भागीदारी करारांवर झालेल्या  स्वाक्षऱ्या ही या कार्यक्रमाची प्रमुख उल्लेखनीय बाब होती. यामध्ये नवोन्मेष, उद्योजकता, संशोधन सहकार्य आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याकरिता पाठबळ देण्यासाठी भारतीय उच्च शिक्षण संस्था/इन्क्यूबेटर्स आणि फ्रेंच/जागतिक इन्क्यूबेटर्स यांच्यात झालेल्या 12 करारांचा, तसेच भारतीय नवोन्मेषकांसाठी तंत्रज्ञान विकास, व्यापारीकरण आणि बाजारपेठ प्रवेश सुलभ करण्यासाठी आघाडीच्या जागतिक कॉर्पोरेशन्सबरोबर करण्यात आलेल्या 16 करारांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, विद्यार्थी आदान-प्रदान, संयुक्त संशोधन, नवोन्मेषासाठी पाठबळ, शैक्षणिक सहयोग आणि प्रतिभा विकास या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यासाठी 13 फ्रेंच विद्यापीठांनी 11 भारतीय तंत्रज्ञान संस्थांशी (आयआयटी) आणि भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) यांच्याशी भागीदारी करार केले. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग आणि ला फाउंडेशन दसॉ सिस्टेम्स यांनी स्थापन केलेला भारत-फ्रान्स एटीएल ब्रिज,फ्रान्समध्ये पहिली स्कूल इनोव्हेशन लॅब स्थापन करून आणि दोन्ही देशांतील तरुण नवोन्मेषकांदरम्यान सहकार्याला वाव देऊन भारताच्या अटल टिंकरिंग लॅब फ्रेमवर्कचा फ्रान्समध्येही विस्तार करेल.

“जागतिक कल्याणासाठी एआय: विश्वसार्ह, समावेशक आणि विस्तारक्षम एआयसाठी मार्गिकेची उभारणी” या विषयावरील परिसंवादात, कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर तसेच सार्वभौम तंत्रज्ञान विकासासाठी सहकार्यात्मक दृष्टिकोन अवलंबण्याच्या मार्गांचा शोध घेण्याच्या उद्देशाने उद्योग, गुंतवणूक आणि संशोधन संस्थांमधील प्रमुख व्यक्तींनी एकत्र येऊन त्याबाबत आपले विचार मांडले.

या परिसंवादानंतर “इंडिया अँड युरोप: डीप टेक विदाऊट बॉर्डर्स” आणि “ग्लोबल डीप-टेक कॅपिटल कॉरिडॉर्स” या विषयांवर चर्चासत्रे पार पडली, त्यामध्ये सीमेपलीकडील नवोन्मेष परिसंस्था, उद्यम वित्तपुरवठा, व्यापारीकरणाचे मार्ग आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी जागतिक बाजारपेठ प्रवेश हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून त्यावर चर्चा करण्यात आली.

“जागतिक कल्याणासाठी एआय” या विषयावरील भारत इनोव्हेट्स 2026 या विषयावरील महाचर्चेत, भारत आणि फ्रान्समधील उद्योग आणि धोरणकर्त्यांनी विश्वासार्ह, सर्वसमावेशक आणि स्केलेबल एआय कॉरिडॉर  तयार करण्याची गरज व्यक्त केली. या चर्चेत परवडण्यायोग्य, स्थानिक एआय सोल्यूशन्समधील भारताची बलस्थाने, सार्वभौम एआय क्षमतांचे वाढते महत्त्व आणि तांत्रिक मक्तेदारीऐवजी मुक्त-स्रोत (ओपन सोर्स) सहकार्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

उच्च-स्तरीय सहभाग, धोरणात्मक संवाद आणि सहयोगाच्या नवीन संधींच्या सादरीकरणासह,'भारत इनोव्हेट्स 2026'च्या पहिल्या दिवशी संपूर्ण नवोन्मेष परिसंस्थेतील जागतिक सहभाग अधिक वाढवण्याच्यादृष्टीने  पायाभरणी केली गेली.

या उपक्रमाबद्दल आणि सहभागी स्टार्टअप्सबद्दल अधिक माहितीसाठी www.bharatinnovates.in ला भेट द्या.


निलीमा चितळे/सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2273308) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam