रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय रेल्वे मंत्री व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे–साईनगर, शिर्डी रेल्वे सेवेला सुरुवात


पुणे यार्ड पुनर्रचना व इतर रेल्वे पायाभूत सुविधांच्या कामांचे देखील भूमिपूजन

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी हडपसर येथून पुणे–दानापूर अमृत भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखविला

प्रविष्टि तिथि: 17 JUN 2026 8:24PM by PIB Mumbai

पुणे, 17 जून 2026 

आज रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला; सोबतच पुणे यार्ड पुनर्रचना व इतर रेल्वे पायाभूत सुविधांच्या कामांचे भूमिपूजन केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग)उपस्थित होते.

या प्रसंगी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 70 लाखांहून अधिक लोकसंख्या व वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता पुण्यासाठी मेगा टर्मिनलची आवश्यकता आहे. पुणे येथे सुमारे ₹600 कोटींच्या गुंतवणुकीत विविध पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे यार्ड पुनर्रचना, विद्यमान 6 फलाटांच्या विस्तारासह आणखी 6 नवीन फलाटांची उभारणी करून एकूण 12 फलाटांची निर्मिती, पुणे स्थानकासाठी नवीन प्रवेशद्वार, आळंदी येथे टर्मिनल तसेच घोरपडी येथे कोचिंग मेंटेनन्स डेपोची उभारणी यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे पुण्यातून 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविणे शक्य होणार आहे.

महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कामे वेगाने सुरू असून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), पुणे, हडपसर, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक रोड, नागपूर आदी स्थानकांचा समावेश आहे. भारतात विद्यमान रेल्वे सेवा सुरळीत सुरू ठेवत विकासकामे केली जातात, त्यामुळे ही प्रक्रिया इतर देशांच्या तुलनेत अधिक आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी याप्रसंगी नमूद केले.

प्रवाशांना दिलासा देताना त्यांनी पुणे–नाशिक रोड रेल्वेमार्गाचा आराखडा अंतिम झाल्याची माहिती दिली. तसेच नांदेड–मुंबई दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात लवकरच वंदे भारत स्लीपर रेल्वेगाडी सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली.

भविष्यातील उच्चगती रेल्वे प्रकल्पांचा आढावा देताना वैष्णव यांनी सांगितले की, बुलेट ट्रेन सेवेमुळे पुणे–मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटांत तर पुणे–हैदराबाद प्रवास 2 तास 08 मिनिटांत पूर्ण होईल. मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 मध्ये सुरू होणार असून या प्रकल्पामुळे हैदराबाद, पुणे, ठाणे, वापी, मुंबई आणि अहमदाबाद ही शहरे अधिक जवळ येतील.

यानंतर हडपसर येथे आयोजित कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे–दानापूर अमृत भारत एक्सप्रेसची पाहणी केली, तसेच शालेय विद्यार्थी व रेल्वे कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तसेच पुणे–दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

पीआयबी पुणे | रेल्वे पीआरओ/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2274267) आगंतुक पटल : 32