श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईपीएफओद्वारे 19 जून रोजी नागपूर आणि चंद्रपूर येथे 'पीएम-व्हीबीआरवाय' प्रोत्साहनपर भत्ता वितरण समारंभाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
17 JUN 2026 8:52PM by PIB Mumbai
नागपूर, 17 जून 2026
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना - ईपीएफओ, प्रादेशिक कार्यालय, नागपूर आणि जिल्हा कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने 19 जून 2026 रोजी दुपारी 4:30 वाजल्यापासून नागपूर आणि चंद्रपूर येथे 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' (पीएम-व्हीबीआरवाय) अंतर्गत प्रोत्साहनपर भत्ता वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
'पीएम-व्हीबीआरवाय' योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनिमित्त या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या संदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील मुख्य कार्यक्रम 19 जून 2026 रोजी भारताच्या पंतप्रधानांच्या सन्माननीय उपस्थितीत, नवी दिल्ली विज्ञान भवन येथे पार पडणार आहे. या मुख्य कार्यक्रमादरम्यान, योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अंदाजे ₹ 2,400 कोटी रुपयांच्या लाभांचे (इन्सेन्टिव्हज) वितरण केले जाईल.
याच वेळी देशभरात, विशेषतः प्रमुख औद्योगिक आणि रोजगार केंद्रांमध्ये सुमारे 200 कार्यक्रमांचे प्रादेशिक स्तरावर आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमांमध्ये नियोक्ते, कर्मचारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि इतर भागधारक सहभागी होतील. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, नियोक्ते नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांना औपचारिकपणे नियुक्ती पत्रे सुपूर्द करतील. हे पाऊल, रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण कामगारांना औपचारिक अर्थव्यवस्थेत सामावून घेण्यासाठी या योजनेची असलेली भूमिका अधोरेखित करते.
नागपूर येथील कार्यक्रम, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, प्रादेशिक कार्यालय, केडीके कॉलेज रोड, टेलिफोन एक्सचेंज समोर, नंदनवन, नागपूर येथे होईल. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल आणि जिल्हाधिकारी तसेच जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांसह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
ईपीएफओ जिल्हा कार्यालय, चंद्रपूर तर्फे आयोजित हा कार्यक्रम 'दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड', नागपूर रोड, सिव्हिल लाईन्स, चंद्रपूर येथे होईल. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आणि चंद्रपूरच्या महापौर संगीताताई खांडेकर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
'पीएम-व्हीबीआरवाय' हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, याचा मुख्य उद्देश रोजगार निर्मितीला चालना देणे, रोजगारक्षमता वाढवणे आणि अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक सुरक्षा कवचाचा विस्तार करणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरात 3.5 कोटींपेक्षा जास्त रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत, पहिल्यांदाच नोकरी मिळवणारे कर्मचारी ₹15,000 पर्यंतच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी पात्र आहेत, तर नियोक्त्यांना अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहनपर मदत दिली जाते. या योजनेमुळे अधिकाधिक कामगार संघटित रोजगार क्षेत्रात दाखल होऊन शाश्वत रोजगारनिर्मितीला बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
सुषमा काणे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2274297)
आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English