छायाचित्रण ही प्रेक्षकांना जगावर विश्वास ठेवायला लावण्याची कला आहे: 19व्या मिफ्फ मधील कार्यशाळेत मधुरा पलित यांचे प्रतिपादन
प्रकाशापासून लेन्सपर्यंत: मिफ्फ मध्ये मधुरा पलित यांनी उलगडला छायाचित्रण कलेचा आत्मा
मुंबई, 17 जून 2026
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) आज “कोअर क्राफ्ट आणि व्हिज्युअल लँग्वेज: द सोल ऑफ सिनेमॅटोग्राफी” नामक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि दिग्दर्शक तसेच कान्स चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित अशा पिएर अन्जेनिक्स एक्सेल्लेंस पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय मधुरा पलित यांनी या कार्यशाळेत भाग घेतला.
चित्रपट निर्माते, विद्यार्थी आणि चित्रपट रसिक यांना संबोधित करताना पलित यांनी छायाचित्रण कलेचे वर्णन, प्रेक्षकांसाठी विश्वसनीय विश्व निर्माण करण्याची कला, असे केले. त्या म्हणाल्या की छायाचित्रणकला ही केवळ प्रतिमांचे रेकॉर्डिंग करण्यापेक्षा अधिक काही असून त्यामध्ये हालचाल, प्रकाश, प्रतिमाबद्धता तसेच कथाकथनाला पाठबळ देणाऱ्या रचना यांचा वापर करून भावना जागृत करण्याचा समावेश आहे.

छायाचित्रकाराची भूमिका विषद करताना त्यांनी नमूद केले की छायाचित्रकार दिग्दर्शकाची कल्पना दृश्य भाषेत रुपांतरित करतो. कॅमेऱ्याच्या हालचालीपासून लेन्सच्या निवडीपर्यंत प्रत्येक सर्जनशील निर्णय प्रेक्षक त्या कथेचा अनुभव कशा प्रकारे घेतील आणि त्यातील पात्रांशी कसे जोडले जातील हे निश्चित करण्यात मदत करतो असे त्यांनी सांगितले.
दृश्य घटक प्रेक्षकांच्या दृष्टिकोनावर कसा प्रभाव पाडतात याचा शोध सदर कार्यशाळेत घेण्यात आला. कॅमेऱ्याच्या विविध हालचाली वेगवेगळे भावनात्मक परिणाम कसे निर्माण करतात आणि प्रतिमाबद्धता, रचना आणि अवकाशाचा वापर सूक्ष्मपणे नातेसंबंध, एकाकीपणा किंवा ताणतणाव कसे व्यक्त करतात याचे प्रात्यक्षिक पलित यांनी करून दाखवले. वातावरणनिर्मिती करण्यात तसेच पात्रांची अंतर्गत मनोवस्था दाखवण्यात प्रकाशयोजनेचे महत्व देखील त्यांनी अधोरेखित केले.
छायाचित्रणकला ही तंत्रज्ञानापेक्षा कलात्मक हेतूने सादर केली जाते यावर अधिक भर देत मधुरा म्हणाल्या की, कॅमेरा आणि उपकरणे ही केवळ साधने आहेत, तर सर्जकता आणि निरीक्षण हे दृश्य कथाकथनाच्या हृदयस्थानी आहेत.
वेळापत्रकाचे व्यवस्थापन करणे, उपकरणे, हवामानाची स्थिती आणि निर्मितीविषयक आव्हाने यांच्याबद्दल सुद्धा पलित यांनी चर्चा केली. त्यांच्या व्यावसायिक अनुभवांच्या जोरावर त्यांनी या कलेमध्ये जुळवून घेण्याची वृत्ती तसेच प्रत्येक चित्रिकरण स्थळाचे अनोखे दृश्य वैशिष्ट्य यांच्या महत्त्वावर अधिक भर दिला.

संवादात्मक प्रश्नोतर सत्रादरम्यान, हाती धरण्याच्या कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण, दिग्दर्शकांशी सहयोग आणि चित्रपट निर्मिती प्रक्रियेत स्मार्टफोन कॅमेऱ्यांचा वाढता वापर यांसारख्या विषयांवर सहभागींनी विस्तृत चर्चा केली. तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देताना, मधुरा यांनी असे निरीक्षण नोंदवले की, स्मार्टफोन्सनी चित्रपट निर्मिती अधिक सोपी झाली असली तरीही उद्देश, अर्थगर्भता आणि कथाकथन यांच्या माध्यमातून छायाचित्रणकलेचा आविष्कार होत राहिला आहे.
होतकरु चित्रपटनिर्मात्यांसाठी छायाचित्रणाकडे अर्थपूर्ण चित्रपटीय अनुभवाची निर्मिती करण्यासाठी सर्जनशीलता, निरीक्षण आणि भावनिक समज यांचा मिलाफ करणारी कला म्हणून बघण्याचा प्रोत्साहनपर संदेश देत हे सत्र संपन्न झाले.
19व्या मिफ विषयी
19 वा मिफ्फ प्रेक्षकांना तल्लीन आणि समृद्ध करणाऱ्या चित्रपटांच्या अनुभूतीची ग्वाही देतो. विचारपूर्वक निवड केलेले आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि चित्रपट क्षेत्रावर केंद्रित अनेक उत्तमोत्तम, उत्कंठावर्धक उपक्रम या महोत्सवात आहेत.
- या वर्षी महोत्सवाच्या स्पर्धा विभागात भारतासह 46 देशांच्या 1,459 चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या.
- महोत्सवात 42 हून अधिक भारतीय भाषांमधले तसेच 30 हून अधिक परदेशी भाषांमधले चित्रपट असून यातून महोत्सवाची जागतिक व्याप्ती आणि सांस्कृतिक विविधता प्रतिबिंबित होते.
- जगभरातील प्रसिद्ध चित्रपटनिर्मात्यांच्या कलाकृतींचा समावेश असलेल्या या महोत्सवात उत्कृष्ट माहितीपट, लघुकथा-चित्रपट, ॲनिमेशन, नवोदित दिग्दर्शकांचे चित्रपट आणि विद्यार्थ्यांचे चित्रपट सादर केले जातील.
- चित्रपटांसोबतच डॉक बझार, ज्ञानवर्धक मास्टरक्लासेस आणि आयडीपीएद्वारे (भारतीय माहितीपट निर्माते संघ) आयोजित ओपन फोरम, यामुळे महोत्सवातील चित्रपटविषयक, सर्जनशील आदानप्रदान अधिक समृद्ध होईल.
प्रभावी चित्रपट, सर्जनशील मने आणि भारून टाकणारे आवाज, यांच्या संगमातून निर्माण होणारा माहितीपट, ऍनिमेशन आणि लघुपट यांचा अविस्मरणीय सोहळा - मिफ्फ 2026! कथा सादर करण्याच्या या अद्भुत विश्वात तुमचे स्वागत आहे -मिफ्फ 2026!
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/संजना चिटणीस/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2274317
| Visitor Counter:
7