वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारत-यूके ‘सीईटीए’ कराराचे फायदे व्यवसायांना जास्तीत जास्त मिळवून देण्यासाठी देशभरात एक हजार  सल्लागारांच्या नियुक्तीची  केली घोषणा


भारत-यूके भागीदारी व्यापारापलीकडे तंत्रज्ञान, एआय, संरक्षण आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात विस्तारत आहे -  पीयूष गोयल

पीयूष गोयल यांनी बर्मिंगहॅम-गुजरात आणि मँचेस्टर-महाराष्ट्र संबंधांना द्विपक्षीय विकासाचे चालक असल्याचे केले अधोरेखित

Posted On: 26 JUN 2026 6:46PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यवसायांना कराराचे फायदे जास्तीत जास्त मिळवून देण्यासाठी देशभरात एक हजार सल्लागार कर्मचाऱ्यांच्या तैनातीची आणि व्यापार पोर्टलच्या अद्ययावतीकरणाची घोषणा केली.   गोयल यांनी आज लंडनमध्ये 10  व्या वार्षिक युके-भारत सप्ताहादरम्यान अनेक उच्चस्तरीय कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी 15 जुलै, 2026 रोजी होणाऱ्या सीईटीए म्हणजेच भारत-युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराच्या  आगामी अंमलबजावणीमुळे निर्माण होणाऱ्या संधींवर प्रकाश टाकला.

भारताचा आतापर्यंतचा सर्वात सर्वसमावेशक मुक्त व्यापार करार म्हणून, भारत-युके सीईटीएमुळे द्विपक्षीय व्यापारात दरवर्षी 25.5 अब्ज पौंडांची वाढ होईल, असा अंदाज आहे.

इंडिया ग्लोबल फोरमच्या ‘ कॅपिटल फ्रंटियर्स फोरम’ला संबोधित करताना गोयल म्हणाले की, भारत-युके भागीदारी पारंपरिक व्यापाराच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञान,  एआय, महत्त्वपूर्ण खनिजे, संरक्षण आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या धोरणात्मक क्षेत्रांपर्यंत विस्तारली आहे.  ही विकसित होत असलेली भागीदारी द्विपक्षीय आर्थिक संबंधांची वाढती खोली आणि विविधता दर्शवते, असे ते म्हणाले. 

भारताचा उच्चायोग आणि 'फिक्की'  द्वारे आयोजित एका स्वागत समारंभात,  मंत्र्यांनी  युनायटेड किंगडमचा दौरा करणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण भारतीय व्यापार शिष्टमंडळाचे स्वागत केले. या शिष्टमंडळात दुस-या आणि तिस-या स्‍तराच्या   शहरांमधील उद्योगांचा तसेच पहिल्यांदाच निर्यात करणाऱ्या अनेक उद्योजकांचा लक्षणीय सहभाग होता.

भारतीय व्यावसायिकांसाठी 'भारत-यूके सीईटीए' (सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार) चे फायदे गोयल यांनी अधोरेखित केले.  हा करार युनायटेड किंगडममध्ये काम करणाऱ्या पात्र भारतीय व्यावसायिकांना 'सामाजिक सुरक्षा योगदाना'तून  पाच वर्षांची सवलत देतो;  यामुळे त्यांना ही बचत भारतातील व्याज मिळवून देणाऱ्या आणि करमुक्त असलेल्या भविष्य निर्वाह निधी  खात्यांमध्ये वळवणे शक्य होते.

गोयल यांनी यावेळी दोन्ही देशांच्या प्रांतांमधील आर्थिक भागीदारी बळकट करण्याच्या महत्त्वावरही भर दिला आणि भविष्यातील द्विपक्षीय विकासाचे महत्त्वाचे घटक म्हणून बर्मिंगहॅम-गुजरात आणि मँचेस्टर-महाराष्ट्र यांच्यातील प्रादेशिक संबंधांचा विशेष उल्लेख केला.

जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय होत असल्याचे अधोरेखित करत, पीयूष  गोयल यांनी उद्योगांना 'ब्रँड इंडिया' आत्मविश्वासाने सादर करण्यास, तसेच वस्तुनिर्माण, सेवा आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधील, देशाच्या सामर्थ्याचा लाभ घेण्यास आणि युनायटेड किंगडममधील व्यवसायांशी दीर्घकालीन भागीदारी निर्माण करण्यास प्रोत्साहित केले.  'भारत-यूके ‘सीईटीए' मुळे बाजारपेठ पोहोच वाढेल, भारतीय उद्योगांची स्पर्धात्मकता सुधारेल, व्यावसायिकांची गतिशीलता सुलभ होईल आणि वस्तू, सेवा आणि  गुंतवणूक या क्षेत्रांत नवीन संधी निर्माण होतील, असे गोयल यांनी सांगितले. 

आज भारत हा विश्वास, कौशल्य, सर्वसमावेशक विकास आणि स्थिर वातावरणाचे प्रतिनिधित्व करतो; तसेच हा देश जागतिक भागीदारी आणि सह-निर्मितीसाठी  प्रचंड संधी उपलब्ध करून देतो, असे गोयल यांनी नमूद केले.  भारताचा निरंतर आर्थिक विकास आणि विस्तारत असलेला जागतिक सहभाग यांतून निर्माण होणाऱ्या संधींचा उद्योगांनी लाभ घेतला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

भारत-यूके भागीदारीमध्ये विकासाची प्रचंड क्षमता आहे, असे गोयल यांनी यावेळी नमूद केले. 

***

सोनाली काकडे/सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2278298) अभ्यागत कक्ष : 50