पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांना ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ या सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित करण्यात आले

प्रविष्टि तिथि: 28 JUN 2026 3:07PM by PIB Mumbai


एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते  ‘गार्डियन ऑफ द... ब्लू होरायझन’ हा सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्वासाठी, तसेच विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न आणि 'ब्लू इकॉनॉमी' (सागरी अर्थव्यवस्था), हवामान कृती, सागरी साधनसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि छोट्या बेट-विकसनशील देशांच्या विकासविषयक आकांक्षांना चालना देण्यासाठी केलेल्या त्यांच्या प्रदीर्घ बांधिलकीची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पंतप्रधानांनी हा सन्मान पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या सर्व देशांना समर्पित केला. दोन्ही देश राजनैतिक संबंधांच्या 50 वर्षांचा टप्पा साजरा करत असताना मिळालेली ही मान्यता, परस्परांतील विशेष मैत्री अधिक दृढ करणारा मैलाचा दगड ठरेल, यावर त्यांनी भर दिला. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, मिशन लाईफ, 'एक पेड माँ के नाम' (आईच्या नावाने एक झाड) आणि आंतरराष्ट्रीय व्याघ्र आघाडी यांसारख्या उपक्रमांद्वारे अधिक हरित पृथ्वीच्या निर्मितीसाठी पंतप्रधानांनी जपलेल्या दीर्घकालीन वचनबद्धतेची दखल म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधानांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सन्मानांच्या मालिकेतील हा सर्वांत अलीकडील बहुमान आहे. यापूर्वी त्यांना एफएओ या संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेचे 'अग्रिकोला पदक' , 'सोल शांतता पुरस्कार'  आणि संयुक्त राष्ट्रांचा 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.
क्षमता बांधणी, पर्यावरणीय कृती, शाश्वत विकास उपक्रम आणि हिंदी महासागरातील सामायिक प्राधान्यक्रमांना पुढे नेण्यासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताच्या वाढत्या भूमिकेला सेशेल्सने दिलेल्या महत्त्वाची ही सन्मानपूर्वक पावती आहे.

***

सुषमा काणे/आशुतोष सावे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2278624) आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Gujarati , Odia , Tamil , Kannada