वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युनायटेड किंगडम मधील यशस्वी भेटींगाठींनंतर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखालील उच्च-स्तरीय व्यावसायिक शिष्टमंडळ ग्रीसला रवाना.

प्रविष्टि तिथि: 28 JUN 2026 7:35PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली: 28 जून 2026

युनायटेड किंगडममध्ये झालेल्या यशस्वी भेटीगाठीनंतर, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखालील उच्च-स्तरीय  व्यावसायिक शिष्टमंडळ  ग्रीसची राजधानी, अथेन्स भेटीवर गेले आहे. द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करणे हा शिष्टमंडळाच्या या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.

युनायटेड किंगडममधील भेटीगाठींपाठोपाठ होत असलेल्या आताच्या या ग्रीस भेटीतून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारची जागतिक आर्थिक भागीदारी बळकट करणे, नवोन्मेषाच्या आधारे विकासाला चालना देणे आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये भारताची व्यापार आणि गुंतवणूक मुत्सद्देगिरी पुढच्या टप्प्यात नेण्याप्रती असलेली निरंतर कटिबद्धता दिसून येते.

ग्रीस भेटीदरम्यान, हे शिष्टमंडळ 'द अथेन्स स्टार्टअप बिझनेस इनक्यूबेटर' (टीएचइए) येथे होणाऱ्या सादरीकरणात आणि स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीचे आवाहन करण्यासाठी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे, टीएचइए पुढच्या पिढीतील उद्योग प्रदर्शित करण्यासाठी आणि सीमापार नवोन्मेषविषक भागीदारींना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते.

हे शिष्टमंडळ 'अथेन्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री' (एसीसीआय) येथे भारत आणि ग्रीसच्या उद्योग क्षेत्रातील अग्रणींशी विशिष्ट विषयांवर केंद्रित गोलमेज चर्चाही करणार आहे. या चर्चांमध्ये पायाभूत सुविधा, डिजिटलायझेशन, संरक्षण, तसेच अन्न आणि कृषी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा शोध घेण्याबरोबरच खासगी क्षेत्रातील भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल.

या कार्यक्रमात दोन्ही देशांतील प्रमुख हितधारकांचा सहभाग असलेल्या उच्च-स्तरीय व्यावसायिक चर्चेचाही समावेश असेल; याद्वारे प्राधान्याच्या क्षेत्रांमध्ये वाढीव गुंतवणूक आणि व्यावसायिक भागीदारीच्या संधींचा शोध घेतला जाईल. तसेच, प्रगत उत्पादन आणि तंत्रज्ञान-आधारित क्षेत्रांमधील सहकार्याच्या शक्यता पडताळण्यासाठी तसेच दोन्ही देशांमधील औद्योगिक परस्पर-पूरकता अधिक बळकट करण्यासाठी हे शिष्टमंडळ ग्रीसमधील आघाडीच्या उद्योगांना भेटी देणार आहे.

प्रमुख व्यावसायिक आणि संस्थात्मक भागधारकांसमवेत होणाऱ्या संवादाने या दौऱ्याची सांगता होईल; उद्योग क्षेत्रातील भागीदारी अधिक दृढ करणे आणि द्विपक्षीय व्यापार संबंधांचा विस्तार करणे हा या संवादाचा उद्देश असेल.

***

सुषमा काणे/मंजिरी गाणू/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2278694) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Malayalam