ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
सणासुदीच्या काळात साखरेचा सुरळीत पुरवठा होत राहील हे सुनिश्चित करण्यासाठी तसेच साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने केली साखर साठा मर्यादा विषयक नियमांमध्ये दुरुस्ती
Posted On:
01 OCT 2026 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2026
1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखरेच्या नवीन हंगामाच्या पार्श्वभूमीवर, सणासुदीच्या काळात ग्राहकांना किफायतशीर दरात साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या उपाययोजना अधिक भक्कम केल्या आहेत.
याअंतर्गत सरकारने साखर व्यापाऱ्यांसाठी साठा ठेवण्याचा कालावधी कमी करून तो 15 दिवसांवर आणला आहे. यासोबतच 15 ऑक्टोबर 2026 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत साखरेचा साठा ठेवण्याची मर्यादा देखील 1,000 क्विंटल इतकी निश्चित केली आहे. कोलकात्यासह, कोलकत्त्याचा विस्तारित महानगर परिसर आणि आसाम राज्य वगळता संपूर्ण देशासाठी हे नियम लागू असणार आहेत.
या सुधारित तरतुदींनुसार, 15 ऑक्टोबर 2026 पासून साखर व्यापाऱ्यांना खाली नमूद नियमांचे पालन करावे लागेल:
- साखरेचा साठा प्राप्त झाल्याच्या तारखेपासून तो 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी साठवून ठेवता येणार नाही.
- देशभरात कुठेही आणि कोणत्याही वेळी 1,000 क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा राखता येणार नाही.
- या प्रदेशांतील बाजारपेठाची विशिष्ट गरज विचारात घेऊन, कोलकाता आणि त्याचा विस्तारित महानगर परिसर तसेच आसाम राज्यासाठी ही साठा मर्यादा 2,000 क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली आहे.
कोलकाता हे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून साखरेची खरेदी करते आणि तिथून देशाच्या ईशान्येकडील प्रदेशासह देशाच्या पूर्व भागात साखरेचा पुरवठा केला जातो.
वितरण साखळीत साखरेचा अनावश्यक साठा अडकून राहणार नाही तसेच, साखर कारखान्यांपासून व्यापाऱ्यांमार्फत अंतिम ग्राहकांपर्यंत पुरवठा सुरळीतपणे पोहोचेल, याची सुनिश्चित करणे हा या सुधारित नियमांमागचा उद्देश आहे. साठेबाजीला आळा घालणे, सट्टेबाजीला आळा घालणे तसेच साखरेची साठेबाजी करण्याच्या व्यापाऱ्यांच्या प्रवृत्तीला आळा घालणे हा या निर्णयाचा मुख्य हेतू आहे.
साखरेच्या सरासरी किरकोळ किमतींमध्ये ऑगस्ट महिन्यातील उच्चांकाच्या तुलनेत 15 टक्क्यांनी घसरण झाली आहे. कारखान्यांमधून पुरवठा होणाऱ्या (एक्स-मिल) साखरेच्या कमी झालेल्या किमतींचा फायदा पुरवठा साखळीद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याने या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारखान्यातील साखरेच्या किमतींमध्ये सुमारे 28 टक्क्यांनी घट झाली असून, गेल्या तीन आठवड्यांपासून या किमती स्थिर राहिल्या आहेत.
किंमतींमध्ये झालेल्या या घसरणीतून, साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तसेच, बाजारात साखरेची सुलभ देवाणघेवाण व्हावी यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या विविध उपाययोजनांचा झालेला सकारात्मक परिणाम दिसून येतो.
साखर कारखान्यांना त्यांच्या भागातील कृषी हवामान विषयक परिस्थितीनुसार गाळप हंगाम सुरू करण्याचा सल्ला याआधीच जारी करण्यात आला आहे.
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2317626)
अभ्यागत कक्ष : 19
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam