अर्थ मंत्रालय
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी – प्रादेशिक केंद्र, मुंबईच्या वतीने स्वच्छता ही सेवा 2026 च्या निमित्ताने स्वच्छता मोहीम आणि जनजागृतीपर पथनाट्य
Posted On:
02 OCT 2026 6:46PM by PIB Mumbai
मुंबई, 02 ऑक्टोबर 2026
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी – प्रादेशिक केंद्र (एनएडीटी-आरसी), मुंबईने ‘स्वच्छता ही सेवा 2026’ अभियान राबविण्यासाठी अकादमीच्या परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन केले. स्वच्छता, नागरी जबाबदारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रति आदराची भावना वाढीस लागावी, हे या उपक्रमांचे उद्देश होते.
स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व एनएडीटी-आरसी, मुंबईचे प्रधान अतिरिक्त महासंचालक, नवनीत मनोहर यांनी केले. ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या भावनेतून अकादमीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने या मोहिमेत सहभाग घेतला. त्यांनी अकादमीच्या परिसराची स्वच्छता केली तसेच रोपांची लागवड केली. स्वच्छ परिसर राखणे ही सर्वांची सामायिक जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमाने अधोरेखित केला.



अकादमीमध्ये ‘स्वच्छता कुरुक्षेत्र’ या शीर्षकाचे जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याचे नेतृत्व प्राप्तीकर निरीक्षक मदन कुमार यांनी केले. प्रभावी आणि मनोरंजक सादरीकरणातून पथनाट्याच्या चमूने कार्यालयाचा परिसर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. सार्वजनिक स्वच्छता राखण्यात साफसफाई कर्मचाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेत त्यांना आदरांजली वाहून त्यांचा सन्मान आणि आदर करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.


या विविध उपक्रमांच्या माध्यमातून एनएडीटी-आरसी, मुंबईने स्वच्छतेला दैनंदिन सवय आणि सामूहिक जबाबदारी म्हणून अंगिकारण्याच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. तसेच भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत – स्वस्थ भारत’ या संकल्पने योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
***
शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2318480)
अभ्यागत कक्ष : 14