नौवहन मंत्रालय
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल मुंबई बंदरातील स्वच्छता अभियानात सफाई कर्मचाऱ्यांसोबत सहभागी
जवाहर द्वीप प्लास्टिकमुक्त सागरी तेल टर्मिनल घोषित
Posted On:
02 OCT 2026 7:12PM by PIB Mumbai
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबई पोर्ट प्राधिकरणातर्फे आज ग्रे गेट, इंदिरा डॉक येथे ‘स्वच्छता अभियान 2026’ राबवण्यात आले. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान आयोजित करण्यात आले. यावेळी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगामुथू, आयएएस आणि उपाध्यक्ष रवीश कुमार सिंह, आयआरटीएस उपस्थित होते.
दीपप्रज्वलन आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर स्वच्छतेची शपथ देण्यात आली. गेल्या वर्षभरात मुंबई बंदराने राबवलेल्या स्वच्छता उपक्रमांची माहिती देणारे लघुपटही यावेळी दाखवण्यात आले. बंदर परिसर स्वच्छ ठेवण्यात आणि बंदराचे कामकाज सुरळीत राखण्यात दिलेल्या योगदानाबद्दल केंद्रीय मंत्री आणि अध्यक्षांच्या हस्ते बंदरातील सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
शाश्वत बंदर कार्यपद्धतीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या अखत्यारीतील जवाहर द्वीप सागरी तेल टर्मिनल प्लास्टिकमुक्त तेल टर्मिनल म्हणून घोषित करण्यात आले.
उपस्थितांना संबोधित करताना सर्बानंद सोनोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ संकल्पनेतील स्वच्छतेच्या महत्त्वावर भर दिला. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी आणि प्रभावी कचरा व्यवस्थापनासाठी मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. केंद्रीय मंत्र्यांनी सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले तसेच त्यांच्यासाठी आयोजित चहापान कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांनी ओएसआर सुविधाही राष्ट्राला समर्पित केल्या.
अभियानाचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी बंदर परिसरातील साऊथ ऑफ 18 आयडी, ओएसआर सुविधा, समुद्र स्वच्छता क्षेत्र, बीपीएक्स उत्तर क्षेत्रातील व्हार्फ आणि मूरिंग स्टाफच्या स्वच्छतागृहासह विविध ठिकाणी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. याद्वारे स्वच्छतेसाठी सामूहिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला.
यावेळी डॉ. एम. अंगामुथू यांनी स्वच्छता अभियानामुळे बंदरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. शाश्वत आणि जबाबदार बंदर कार्यपद्धतीसाठी प्राधिकरणाची बांधिलकी त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.
मुंबई बंदरे प्राधिकरणाने वर्षभर बंदरातील जागा, निवासी वसाहती आणि किनारी भागांमध्ये स्वच्छता अभियान सुरू ठेवण्याची तसेच एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याची बांधिलकी व्यक्त केली आहे. दैनंदिन कामकाजात स्वच्छता, शाश्वतता आणि कर्मचाऱ्यांचे कल्याण यांचा समावेश करण्यावर प्राधिकरणाने भर दिला आहे.


***
शैलेश पाटील/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2318484)
अभ्यागत कक्ष : 9