सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘ब्रह्मनाद’कार्यक्रमात व्हायोलिनचे सुर आणि चित्रकलेच्या थेट सादरीकरणाने नागपूरकर मंत्रमुग्ध

Posted On: 02 NOV 2026 4:59PM by PIB Mumbai

‍नागपूर, 2 नोव्हेंबर 2026

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीने आज सकाळी 6.30 वाजता केंद्राच्या सिव्हिल लाइन्स परिसरातल्या टेम्पल रोड इथल्या आवारात ‘ब्रह्मनाद’ या  सकाळच्या मासिक संगीत कार्यक्रमांतर्गत व्हायोलिन वादन आणि चित्रकलेचे थेट सादरीकरण असा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला संगीतप्रेमी, कलाकार आणि कलारसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रसिद्ध व्हायोलिनवादक पंडित कमल कमले, ज्येष्ठ चित्रकार ज्ञानेश्वर (नाना) मिसाळ, तबलावादक राहुल बेणे आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहायक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दीपक कुलकर्णी, गजानन शेळके आणि प्रसिद्ध पाकतज्ञ विष्णू मनोहर यांनी पुष्पगुच्छ देऊन निमंत्रित कलाकारांचे स्वागत केले.

कार्यक्रमात पंडित कमल कमले यांनी आपल्या भावपूर्ण आणि सुरेल व्हायोलिन वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी राग बैरागी भैरवने वादनाला सुरुवात केली. विलंबित एकताल, मध्य लय तीनताल आणि आकर्षक द्रुत रचनेतून त्यांनी या रागाचा सुरेल विस्तार सादर केला. त्यानंतर ‘याद पिया की आये’ आणि ‘सांवरा ऐजैयो’ या ठुमऱ्या सादर करून आपल्या अभिव्यक्तिपूर्ण वादनातून प्रेम आणि विरहाच्या भावना जिवंत केल्या.

यानंतर ‘कानडा राजा पंढरीचा’ हा अभंग, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हे मराठी नाट्यगीत आणि राग जंगला भैरवीमधली ‘नैना मोरे बरस गये’ ही रचना त्यांनी सादर केली. अखेर राग भैरवीमधल्या ‘साजन मोरा छोड़ गये’ या रचनेने त्यांनी आपल्या वादनाची सांगता केली. भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्धी आणि खोली अनुभवून श्रोते भारावून गेले.

या कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे ज्येष्ठ चित्रकार ज्ञानेश्वर (नाना) मिसाळ यांचे चित्रकलेचे थेट सादरीकरण. व्हायोलिनच्या मधुर सुरांच्या साथीने त्यांनी आपल्या कलात्मक अभिव्यक्तीतून कॅनव्हासवर आध्यात्मिक भावविश्व उलगडणारी कलाकृती साकारली. संगीत आणि रंग यांचा हा अनोखा संगम उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेला. त्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळे कलात्मक परिमाण लाभले.

राहुल बेणे यांनी तबल्याची उत्कृष्ट साथ देत आपल्या तालबद्धतेने आणि कुशल लयकारीने व्हायोलिन वादन अधिक समृद्ध केले. व्हायोलिन, तबला आणि दृश्यकला यांचा हा अनोखा संगम उपस्थितांसाठी संस्मरणीय सांस्कृतिक अनुभव ठरला. सादरीकरणाची कला आणि दृश्यकला यांच्यातले सुसंवादी नातेही यातून अधोरेखित झाले.

कार्यक्रमाच्या अखेरीस कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल उपस्थितांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. ‘ब्रह्मनाद’ अंतर्गत सादर करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमातून भारतीय शास्त्रीय संगीत आणि दृश्यकला यांचा सर्जनशील संगम अनुभवायला मिळाला. भारताच्या समृद्ध कलात्मक वारशाच्या संवर्धनात सांस्कृतिक उपक्रमांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हेही यातून अधोरेखित झाले.

कलात्मक उत्कृष्टतेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि भारताच्या विविध सांस्कृतिक परंपरांविषयी रसिकांमध्ये अभिरुची निर्माण करणे, या आपल्या बांधिलकीची दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने या कार्यक्रमातून पुन्हा एकदा प्रचिती दिली.


पीआयबी मुंबई | नितीन फुल्लुके/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2331672) अभ्यागत कक्ष : 23
Read this releasein: English